नवनव्या व्हेरिएंटना किती घाबरायचं?

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
प्रा. नंदकुमार गोरे
 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं शुक्लकाष्ठ काही सुटायला तयार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून जग पूर्वपदावर यायला लागलं असताना आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू होण्याच्या मार्गावर असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराने चिंतेत भर घातली. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला. या नव्या बी.१.१.५२९ विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन' हे ग्रीक नाव दिलं. संघटनेनं या विषाणूचा समावेश ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे. या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञाने त्याचं वर्णन ‘भयावह विषाणू' असं केलं तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वात वाईट प्रकार असल्याचं म्हटलं. या दोन शास्त्रज्ञांनी केलेलं वर्णन पाहिलं तर कोरोनाचा हा प्रकार किती घातक आहे आणि त्याला आळा घालणं किती आवश्यक आहे, हे लक्षात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर तातडीची बैठक घेण्यामागे जगाने या कोरोनाच्या नव्या प्रकाराची घेतलेली धास्ती हेच आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र पाठवलं असून राज्यातली कोरोना टास्क फोर्ससुद्धा सतर्क झाली आहे.
 
corona_1  H x W 
 
या विषाणूची प्रकरणं आढळण्याची नुकतीच सुरुवात झाली असून याची लागण झालेले रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतल्या एकाच प्रांतामधले आहेत; मात्र याचा संसर्ग इतर ठिकाणीही झाला असण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हटल्यानं आता जगभरातले देश या विषाणूसाठीचा ‘जीनोम सिक्वेन्स' एकमेकांसोबत शेअर करतील. जगभरात कुठेही ‘ओमिक्रॉन' व्हेरिएंटचे रुग्ण वा क्लस्टर्स म्हणजे एकाच वेळी, एका भागात अनेक रुग्ण सापडले तर त्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येईल. या भागात तपासण्या आणि संशोधन करण्यात येईल. जगाने नव्या प्रकारची साथ पसरू नये म्हणून दखल घ्यायला सुरुवात केली आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडासह अनेक देशांनी आता आफ्रिकेतल्या देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्स बंद करण्याचं ठरवलं आहे. हा नवा विषाणू किती वेगानं पसरतो? लसीपासून मिळालेल्या संरक्षणाला बायपास करण्याची त्याची क्षमता किती आहे आणि यावर तातडीने काय उपाय करावेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण त्याबाबत अत्यंत मोजकी माहिती उपलब्ध आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल (म्युटेशन्स) झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळे इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे.
 
या नव्या विषाणूमध्ये एकूण ५० म्युटेशन्स आढळले आहेत. त्यापैकी ३० पेक्षा अधिक स्पाईक प्रोटिनवर आढळले. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. रिसेप्ट बाईंडिंग डोमेनचा (आपल्या शरीरातील पेशींच्या या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो.) अभ्यास केला असता यात १० म्युटेशन्स आढळले. संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ दोन म्युटेशन्स झाले होते. हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लसी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत. काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळले आहेत. त्यावरून या विषाणूतल्या त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते. यापैकी काही विषाणूंमुळे शरीरातल्या अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठीण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत. या विषाणूच्या संसर्गाची क्षमता वाढण्याची शक्यता असल्यानं, काळजीचं कारण असू शकतं. यात एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची क्षमताही वाढलेली असू शकते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित यंत्रणेतही त्याची वाढ झालेली असू शकते, अशी शक्यता दक्षिण आफ्रिकेतल्या क्वाझुलू नटाल विद्यापीठातले प्रा. रिचर्ड लेसेल्स यांनी व्यक्त केली आहे.
 
अनेक अशीही उदाहरणं आहेत, जी कागदावर अत्यंत धोकादायक वाटतात; मात्र प्रत्यक्षात त्याचा परिणाम कमी असतो. बीटा व्हेरिएंटबाबत प्रचंड चिंता आणि भीती होती. कारण रोगप्रतिकार शक्तीच्या तावडीतून तो सुटू शकत होता; पण त्याऐवजी डेल्टा व्हेरिएंटचाच वेगाने प्रसार झाला आणि त्याचे रुग्ण वाढले. बीटा व्हेरिएंटचा विषाणू केवळ रोगप्रतिकार यंत्रणेच्या तावडीतून सुटणारा होता तर डेल्टा व्हेरिएंट मात्र या क्षमतेबरोबरच अधिक प्रभावीदेखील होता. त्यामुळे त्यांच्या संसर्गाचं प्रमाण उच्च पातळीवर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतामध्ये या नव्या विषाणूची लागण झाल्याची ७७ प्रकरणं समोर आली आहेत. त्याशिवाय बोस्तवानामध्ये चार आणि हाँगकाँगमध्ये एक (सर्वांची दक्षिण आफ्रिकेतल्या प्रवासाची नोंद) रुग्ण आढळला आहे. त्यावरून गौतेंग प्रांतात असलेली ९० टक्के प्रकरणं या विषाणूची असू शकतात आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतरही अनेक प्रांतांमध्ये सध्या त्याचं अस्तित्व असू शकतं.
दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या ठिकाणी पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण २४ टक्के आहे. यापेक्षा अधिक लसीकरणाचं प्रमाण असलेल्या देशांमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग कसा पसरेल, हेही यावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवून केव्हा आणि काय करायला हवं, याचा विचार करावा लागणार आहे. या साथीतून मिळालेला सर्वात महत्त्वाचा धडाच हा आहे की, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वाट पाहू शकत नाही. आधीच्या व्हेरिएंटमध्ये कमी म्युटेशन होतं; पण याची पसरण्याची क्षमता जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि मोनोक्लोनल अँटिबॉडीजना चकवा देण्याची क्षमता यामध्ये आहे. यातले काही म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणारे आहेत; ज्यामुळे त्यांची संसर्ग क्षमता जास्त आहे. आपण सतर्क राहायला हवं आणि वेळीच योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. या विषाणूच्या पुनर्संसर्गाचा धोका वाढला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. काळानुसार विषाणूमध्ये म्युटेशन किंवा बदल होणं यात काही नवीन किंवा असामान्य नाही. मात्र, जेव्हा अशा प्रकारच्या म्युटेशनमुळे संसर्गाचं प्रमाण, त्याची घातकता आणि लसीच्या क्षमतेवर परिणाम होत असेल, तेव्हा तो व्हेरिएंट काळजीचं कारण ठरत असतो.
 
या नव्या व्हेरिएंटचं संक्रमण नेमकं कशा प्रकारे होत आहे, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. त्यामुळे याचा नेमका परिणाम कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागू शकतो. कोरोनाच्या या नव्या विषाणूचा प्रभाव पाहता लसीकरण करण्यात आलेल्या लसींचा प्रभाव अत्यंत कमी राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी दिला आहे. अर्थात त्याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. याबाबत परिपूर्ण अभ्यास होत नाही, तोपर्यंत कोरोना विषाणूच्या धोक्यांपासून बचाव करणाऱ्या अँटिबॉडी यावर प्रभावी ठरतात की अँटिबॉडीचा विषाणूवर प्रभावच होत नाही, हे सांगता येणार नाही. प्रामुख्याने हवाई आणि प्रवास किंवा पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मोठा फटका बसला. त्यांचे शेअर्स आपटले. या निर्णयामुळे नव्या विषाणूच्या संभाव्य क्षमतेबाबत शास्त्रज्ञांची चिंता अधिक ठामपणे पुढे येत असली, तरी त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती किंवा तथ्य बदलत नाही. ताजं संशोधन या दिशेने सतत भाष्य करीत असलं, तरी कोरोनाचा नवा भीतिदायक आविष्कार समोर आला आहे म्हणून घाबरायचं का तो वाटतो तितका भयावह नाही, असं मानून स्वत:ला दिलासा द्यायचा, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. मात्र, परिस्थिती कशीही असली, तरी स्वत:चा बचाव स्वत:लाच करायचा आहे, याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवं. कारण असे अनेक व्हेरिएंट, म्युटेशन्स यापुढेही समोर येत राहणार आहेत. मात्र, पूर्ण खबरदारी हेच अंतिमत: रास्त पाऊल ठरणार आहे.