सेवा क्षेत्राचा आश्वासक वृद्धीपथ कायम

आगामी काळात देशांतर्गत व्यवसायांना नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ कायम राहणार आहे.

    दिनांक : 07-Dec-2021
Total Views |
नवी दिल्ली : वाढलेले कर संकलन, ‘जीडीपी’तील वाढ आणि निर्मिती क्षेत्रातील सुखावणाऱ्या आकडेवारीपाठोपाठ सेवा क्षेत्रातही तोच कित्ता गिरवत, नोव्हेंबरमध्ये गेल्या साडेदहा वर्षांतील सर्वोच्च गतिमानता नोंदविल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने नमूद केले. व्यवसायांकडे नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर या क्षेत्राने आश्वासक वाढ कायम राखली आहे.

Service Sector_1 &nb 
 
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ५८.१ नोंदला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी म्हणजे ५८.४ असा नोंदला गेला होता. सलग चौथ्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल सुरू आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.