‘संपुआ’च्या मुळावर ममता

    दिनांक : 03-Dec-2021
Total Views |
पार्थ कपोले
पवारांच्या कथित राष्ट्रीय नेतृत्त्वाच्या मृगजळापुढे ममतांचे प्रत्यक्षात असलेले राजकीय सामर्थ्य हे अनेक अर्थांनी उजवेच ठरते. मात्र, तरी देखील ममतांची सध्याची घाई पाहता, त्या २०२४ सालापर्यंत एवढ्याच तडफेने उभ्या राहू शकतील की, त्यांचा चंद्राबाबू नायडू होईल, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर त्यांना आता आकाशही ठेंगणे झाले आहे. अर्थात, तसे वाटण्यास वावगे काहीही नाही. कारण, भाजपने ममतांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या विजयाची अपेक्षा होती, त्यात काही अंशी भाजप यशस्वीही ठरला. मात्र, बंगालचा विजय हा ममतांसाठी त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा जागृत करणारा ठरला.
 
Mamta Bannerjee targeted
 
त्यामुळे तेव्हापासून त्यांनी देशभरात दौरे सुरू केले आहेत, गोव्याची विधानसभा निवडणूक त्यांचा पक्ष लढविणार आहे. सोबतच काँग्रेसमधील नेते वगैरे आपल्या पक्षात घेण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परदेश सहलींवर त्यांनी टीका केली. “देशाच्या राजकारणात आता ‘संपुआ’ वगैरे काहीही अस्तित्वात नसून सर्व भाजपविरोधी पक्षांनी आता आपल्या नेतृत्वाखाली एकत्र यावे,” असे अप्रत्यक्ष सांगण्यासही त्यांनी प्रारंभ केला आहे. भरीस भर म्हणून देशातील कथित पुरोगामी मंडळींची एक ‘इकोसिस्टीम’ही आता ममतांना शरण गेली आहे. त्यामुळे आता भाजपला सत्तेतून खाली खेचायचे असेल, तर ममता बॅनर्जी यांचेच एकमेव नेतृत्त्व आहे, असा प्रचार अगदी उत्साहाने होतो आहे.
 
आता ममतांची अशी लगीनघाई किमान महाराष्ट्रातील जनतेला तरी नवीन नाही. वरील वर्णन मराठी जनतेला अगदी चांगलेच माहिती आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस या कथित राष्ट्रीय मात्र, मुळात केवळ पुणे महसूल विभागापुरतेच प्राबल्य असलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गेली अनेक वर्षे ठरावीक काळाने असेच वातावरण तयार केले जात असते. आज जसे ममता बॅनर्जी करीत आहेत, अगदी तसेच शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. म्हणजे, सोनिया गांधी आणि ‘संपुआ’वर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, राहुल गांधी यांच्या राजकीय शैलीवर टीका करणे, मर्जीतील माध्यमांना हाताशी धरून आपणच कसे सत्ताधारी भाजपला धारेवर धरतो आणि काँग्रेस कशी शरणागती पत्करते, हे रंगवून सांगणे, अन्य राज्यांचे दौरे करून तेथील प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न करणे, असा प्रकार शरद पवार वरचेवर करीत असतात. त्यांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे काँग्रेसवर दबाव आणणे आणि राष्ट्रीय राजकारणातील आपले महत्त्व कायम राखणे. कारण, शरद पवार यांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रात त्यांचा पक्ष स्वबळावर सत्तेत येणे शक्य नाही आणि लोकसभेत दोन आकडी खासदार निवडून येणे शक्य नाही, हे सत्य किमान शरद पवार यांनी तरी मनोमन मान्य केले आहे. त्यामुळे पवार आणि ममता यांच्यामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. कारण, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर स्वबळावर राज्याची सत्ता मिळविली, लोकसभेत दोन आकडी खासदार निवडून आणले. खरे तर पवारांच्या कथित राष्ट्रीय नेतृत्वाच्या मृगजळापुढे ममतांचे प्रत्यक्षात असलेले राजकीय सामर्थ्य हे अनेक अर्थांनी उजवेच ठरते. मात्र, तरीदेखील ममतांची सध्याची घाई पाहता, त्या २०२४ सालापर्यंत एवढ्याच तडफेने उभ्या राहू शकतील की, त्यांचा चंद्राबाबू नायडू होईल, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे.
 
त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्याकडे पाहणे आवश्यक आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. याच दौऱ्यात त्यांनी ‘संपुआ’च्या अस्तित्त्वाविषयी टिप्पणी केली. त्यांचा हेतू अगदी स्वच्छ होता, तो म्हणजे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी आपले नेतृत्त्व स्वीकारावे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘संपुआ’चा जुना सहकारी, तर शिवसेनेचे ‘संपुआ’मध्ये असणे हे अगदीच धूसर आहे. मुळात, काँग्रेसला शिवसेनेची कितपत गरज आहे, हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या राजकीयदृष्ट्या अतिशय अडचणीत असलेले शरद पवार यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणून ममतांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे अगत्य केले, हे स्पष्ट आहे. एकीकडे ममता बॅनर्जी या पवारांचे नेतृत्त्व मान्य न करता, त्यांनाच आपले नेतृत्व मान्य करण्यास भाग पाडत आहेत, तर दुसरीकडे ममतांना चुचकारून पवार आपले राजकीय महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ममतांचे राजकारण पाहता त्या शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही आपल्याहून मोठे होऊ देणार नाही; हे अगदीच स्पष्ट आहे.
 
अर्थात, पवार आणि त्यांच्यासारखे प्रादेशिक नेते ममतांसाठी खरी डोकेदुखी अजिबातच नाही. कारण, प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना भूमिका बदलण्यास भाग पाडणे हे अगदी सहज शक्य असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबद्दल तर ते आणखीनच सोपे असते. मात्र, प्रादेशिक पक्षांना वाकविण्यासाठी प्रथम राष्ट्रीय नेतृत्त्व देणे अथवा आपण तसे नेतृत्त्व देऊ शकतो, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. त्यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आता काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे सर्वेसर्वा गांधी कुटुंबास लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. ममतांना २०२४ साली ‘दीदी विरूद्ध मोदी’ अशी लढत अपेक्षित आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना प्रथम दिल्लीत ‘दीदी विरुद्ध सोनिया’ ही लढत जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, ती लढत जिंकल्याशिवाय प्रादेशिक पक्ष ममतांसोबत उभे राहणार नाहीत. त्या लढाईची सुरूवातही ममतांनी अगदी व्यवस्थितपणे केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ होण्यापूर्वी ममता दिल्लीत दोन दिवसीय दौऱ्यासाठी आल्या होत्या. मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी त्या आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अशी मोट वगैरै बांधण्यासाठी त्यांना काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे वाटले नाहीत. त्यामुळेच यावेळी प्रथमच दिल्लीत येऊनही त्यांना सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. त्याविषयी विचारले असता, “दिल्लीत आल्यावर प्रत्येक वेळी सोनिया गांधी यांची भेट घेतलीच पाहिजे का? तसे संविधानात लिहिले आहे का?” असे रोखठोक उत्तर त्यांनी दिले.
 
एकूणच ममता बॅनर्जी सध्या मोदी आणि भाजपविरोधाचा नवा चेहरा बनण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांचा प्रयत्न सध्या तरी जरा आततायीपणाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेस सध्या अगदीच क्षीण झालेला पक्ष असला तरीदेखील काँग्रेसच्या वळचणीला असलेल्या प्रादेशिक पक्षांना तेच सोयीस्कर आहे. कारण, त्यामुळे आपापल्या राज्यांमध्ये सुखनैवपणे राजकारण करणे त्यांना शक्य होत आहे. मात्र, उद्या ममतांच्या मागे हे पक्ष गेल्यास त्यांना आपल्या मर्जीला मुरड घालावी लागेल. कारण, चार लोकांना सोबत घेऊन राजकारण करणे ममतांना जमेल, असे म्हणणे हे अतिशय धाडसाचे आहे. त्यामुळे आज मोदीविरोध करीत असलेल्या ममतांना डोक्यावर घेऊन नाचणारी मूळची काँग्रेसची ‘इकोसिस्टीम’ लवकरच (पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर) ममता बॅनर्जी यांना भाजपची ‘बी टीम’ ठरविण्याची शक्यताच सर्वाधिक आहे.