भूतकाळात घडून गेलेल्या घटनाच ठरत असतात समाजासाठी दीपस्तंभ - भारती साठे

इतिहास संकलन संस्थेच्या प्रदेश महिला प्रमुख भारती साठे यांचे प्रतिपादन

    दिनांक : 28-Dec-2021
Total Views |
जळगाव : इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या केवळ तारीखवार नोंदी नव्हेत,तर त्या घटनांची कारणमिमांसाही त्यात दिलेली असते.त्यावरून कोणतीही व्यक्ती किंवा समाज बोध घेत पुढील वाटचाल करीत असतो.त्यादृष्टिने विचार करता अशा घटना किंवा इतिहास भविष्यकाळासाठी दीपस्तंभासमान ठरत असतात.त्यांच्या प्रकाशात आपल्याला वाटचाल करणे अधिक सुलभ होते, अशी भावना इतिहास संकलन संस्थेच्या प्रदेश महिला प्रमुख भारती साठे यांनी तरुण भारत शी बोलतांना व्यक्त केली.
 
bharati sathe_1 
 
मराठवाड्यातील आष्टी, जि.बीड येथे येत्या ३ आणि ४ जानेवारी,२०२२ रोजी इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रचे पहिले अधिवेशन होत आहे,त्या अनुषंगाने त्यांनी तरुण भारत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या.
अधिवेशनाच्या अनुषंगाने त्यांच्याशी झालेली मनमोकळी बातचित अशी...
 
 
logo_1 
 
प्रश्न :- इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनाचे प्रयोजन काय
 
इतिहासामध्ये राष्ट्रीयदृष्टया आणि सकारात्मकदृष्टिने विचार करणार्‍या, विखुरलेल्या पण एका विचाराने भारलेल्या आणि एका सूत्रात बांधलेल्या कार्यकर्त्याचे एकत्रिकरण व्हावे, त्यांच्याशी चर्चा व्हावी, विचारांचे आणि त्यांच्या कल्पना व संकल्पनांचे आदानप्रदान व्हावे हा एकमेव उद्देश या अधिवेशनामागे आहे. इतिहास क्षेत्रात परिषदा भरपूर आहेत,परिसंवादही खूप होत असतात.मात्र त्याचा उपयोग समजाला किती होतो हा एक यक्षप्रश्नच आहे. तो प्रश्न इतिहास संकलन संस्थेच्या माध्यमातून समाज पटलावर यावा असा दुसरा उद्देश यामागे आहे.तिसरा उद्देश म्हणजे, आपल्या देशात आक्रांताचा नव्हे तर पराक्रमांचा इतिहास आहे.असे अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि उद्देश घेऊन या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
प्रश्न :- संस्थेचे कार्य कधी सुरू झाले
 
खरे तर , सर्वप्रथम रा. स्व. संघाचे पहिले प्रचारक मा. बाबासाहेब आपटे यांनी सर्वप्रथम या देशाच्या इतिहासाकडे राष्ट्रीय विचारांनी कसे पाहता येईल असा दृष्टिकोन ठेवून व काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर ज्येष्ठ प्रचारक मा. मोरोपंत पिंगळे यांनी स्व. बाबासाहेब आपटे समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नावाने काम सुरू केले.त्यात स्व. सतीशचन्द्र मित्तल यांनी संपूर्ण देशभर काम सुरू केले.आपण महाराष्ट्रात इतिहास संकलन संस्थेच्या माध्यमातून काम करतो. या संपूर्ण प्रवासात मा.बालमुकुंदजी पांडे , मा.शरदराव हेबालकर, मा.अरविंद जामखेडकर, मा. अरुणचंद्र पाठक, मा. राधाकृष्ण जोशी, मा. रवींद्र पाटील, मा.नितीन सराफ यांचे योगदान खूप लक्षणीय आणि भरीव आहे हे विसरता येणार नाही.
 
प्रश्न:- आपण म्हणता १९७३ मध्ये काम सुरू झाले .१९९३ ला संस्थेला संघटनेचे स्वरूप आले.या ४९ वर्षांच्या वाटचालीत इतिहास संकलन संस्थेचे हे प्रथमच अधिवेशन कसे
 
खरे तर, हे एक प्रवाही कार्यकर्त्यांचे प्रवाही संघटन आहे. त्यात महाराष्ट्र प्रदेश हा खूप मोठा आणि विस्तीर्ण इतिहास असलेला भूभाग आहे. कधी विदर्भ, कधी कोकण प्रांत,कधी पश्चिम तर कधी देवगिरी प्रांत असे उपक्रम सुरू होते. पण गेल्या तीन वर्षात इतिहास संकलन संस्थेच्या माध्यमातून सक्रिय कार्यकर्त्याचे खूप विशाल जाळे विणल्या गेले आहे. त्यामुळे प्रांत आणि विभागश: उपक्रम सुरू केले गेले. त्यातून हा अधिवेशनाचा विचार आणि संकल्पनाही बाहेर आली. त्यानुसार येत्या ३ आणि ४ जानेवारी, २०२२ रोजी आष्टी येथे अधिवेशन होत आहे.
 
प्रश्न :-आज संघटना म्हणून महाराष्ट्रातील कामाचे स्वरुप कसे आहे?
 
प्रा. राधाकृष्ण जोशी आणि रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आज सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठ क्षेत्रात तसेच रचनात्मक ४८ परिक्षेत्रांपैकी ३८ परिक्षेत्रात संघटनेचे काम सुरू आहे.महिला विभाग, युवा विभाग,विद्वत विभाग, लेखन विभाग आदी आयामांच्या माध्यमातून काम सुरू आहे. इतकेच नव्हे तर, आता सामाजिक क्षेत्रातील अनेक अभ्यासकही इतिहास संकलन संस्थेच्या कार्याकडे आकर्षित होत आहेत, संस्थेशी जुळत आहेत, ही आमच्या कामाची पावती आहे असे वाटते.
 
प्रश्न:- संस्थेची आतापर्यंतची उपलब्धी आपण काय सांगू शकाल?
 
नक्कीच सांगता येईल. उदाहरणच द्यायचे झाले तर, आर्य नक्की कोण होते ? हे सर्वप्रथम तार्किक नव्हे तर, पुराणांतर्गत इतिहासाचा आधार घेऊन ते साधार सिद्ध केले आहे.सरस्वती नदीचा शोध आणि तिचे पुनर्जीवन यावर खूप सखोल अभ्यास केला आहे. राखीगढी असेल किंवा रामसेतू असेल - हे मानवनिर्मित आहे हे सिद्ध करण्यात इतिहास संकलन समितीची भूमिका खूप मोठी आहे.त्याचप्रमाणे मला इथे हेही सांगायला आवडेल की, १८५७ चे युद्ध हे स्वातंत्र्य समर होतं आणि हे मांडण्यात समिती खूप आग्रही आहे. भगतसिंग आणि चंद्रशेखर यांच्यावर प्रा. सतीशचंद्र मित्तल यांचे विस्तृत लेखन आहे आणि अनेक थोर इतिहासकारांनीही या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.
 
प्रश्न:- यात महाराष्ट्राचे नेमके योगदान काय?
 
आजपर्यंत एकूण सलग ५२ व्याख्यांनाच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित विषयांना महाराष्ट्रातील समितीने हात घातला आहे. नवरात्रीचे नव संदर्भ , आमच्या सणांच्या मागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच पुरातन क्षेत्रांना भेटी देऊन त्या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे आदींचा उल्लेख करता येईल. त्यात चंद्रपूरच्या प्रा.डॉ. पल्लवी ताजने अग्रेसर आहेत. ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबाबत नवे संदर्भ मांडण्यात नितीन सराफ प्रमुख आहेत. सावरकर आणि जैन साहित्य यात प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी तर छत्रपती शिवराय, जिजाऊ आणि शंभूराजे यांचे नवे संदर्भ रवींद्र पाटील मांडत आहेत. स्त्रीवादाची भूमिका मांडण्यात रश्मी पाटील आणि शांता गीते आघाडीवर आहेत.पेशवे काळाच्या अभ्यासात प्रा. डॉ. व्यंकटेश लांब हे अग्रेसर असून शिक्षण आणि इतिहास मांडण्यात प्राचार्य डॉ.लता मोरे - सुरवाडे प्रमुख नाव आहेत. असा सगळा गोतावळा महाराष्ट्र राज्यात काम करतो आहे. त्यात प्रा.डॉ. मुकुंद देवर्षी, बीड, प्रा. डॉ. गोपाळ राठोड, अकोट, प्रा. डॉ. विनोद रायपूरे आणि प्रा. डॉ. जयश्री शास्त्री ही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील.
 
प्रश्न:-महिला विभागाच्या काही खास कामगिरीवर प्रकाश टाकता येईल का ?
 
राष्ट्रीय महिला प्रमुख श्रीमती अनुराधा राजहंस यांच्या माध्यमातून महिला विभाग महाराष्ट्भर कार्यरत आहे. येत्या ८ मार्च , २०२२ रोजी महिला विभागातर्फे एका महिला विशेषांकाचे प्रकाशन आणि विमोचन करण्याचा संकल्प आहे. अजूनही बरेच उपक्रम आपण राबवणार आहोत. आपणही आमच्यासोबत असल्यास या चळवळीला अधिक गतिमान करता येईल असा विश्वास आहे..
 
 
 
 भारती साठे : अभाविप ते इतिहास संकलन संस्था 
प्रदेश महिला प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या भारती साठे या आधी अभाविपच्या कार्यकर्त्या होत्या.१९९२ ते ९४ दरम्यान त्यांनी शहर मंत्री भडगाव , जिल्हा समिती सदस्य जळगाव,१९९३ च्या मोर्च्यात सक्रिय सहभाग घेत सुमारे १३०० विद्यार्थिनींचे नेतृत्व त्यांनी केले होते. एका शाळेत पर्यवेक्षिका ही त्या होत्या.सध्या त्या भारती महिला गृहउद्योगाच्या संचालिका असून इतिहास प्रबोधन संस्थेच्या संस्थापक, इतिहास संकलन संस्थेच्या जळगाव जिल्हा प्रमुख, प्रदेश महिला सहप्रमुख आणि आता प्रदेश महिला प्रमुख अशी जबाबदारी त्या सांभाळत आहेत. प्रत्यक्ष संवाद आणि संपर्क ही त्यांची बलस्थाने आहेत.ज्याचा फायदा संघटनेचे कार्य वाढीत झाला आहे.