शिरपूर वरवाडे नगरपरिषदेमार्फत पर्यावरण दूतांची निवड

    दिनांक : 17-Dec-2021
Total Views |
शिरपूर : महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात माझी वसुंधरा अभियान २.० ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्षा भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण दूत यांची निवड करुन नियुक्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी पार पडला.
 
shirpur1_1  H x 
 
कार्यक्रमाची सुरुवात शहर समन्वयक दिव्या तोरीस यांनी केली. प्रस्तावना व स्वरुप आरोग्य सहायक दीपाली साळुंके यांनी मांडले. सेंद्रिय खत निर्मितीबाबत नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
 
सदर कार्यक्रमात नगरपरिषदेतील उत्कृष्ट कार्य करणारे सफाई कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे यांची निवड करण्यात आलेले पर्यावरण दूत यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या अभियानात सक्रिय सहभागासाठी पर्यावरणदूत यांना प्रोत्साहित करण्यात आले. पर्यावरण सुधारणा व संरक्षणा बाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ई प्लेज आणि माझी वसुंधरा अंतर्गत जागरुकता निर्माण होणे, आठवड्यातील प्रत्येक बुधवार वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करणे, कचरा विलगीकरण करणे, प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत तयार करणे, कापडी पिशवीचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत म्हणून सोलर पॅनलचा वापर करणे, घराच्या आसपास रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, वृक्ष लावणे, त्याचे संवर्धन व संगोपन करणे, तसेच पर्यावरणपूरक सण साजरे करणे बाबत सर्व पर्यावरण दूत यांना जाहीर आवाहन केले. सदर कार्यक्रम शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र आहिरे, आरोग्य सहायक दिपाली साळुंके, कर प्रशासक अधिकारी नेहा निकम, शहर समन्वयक दिव्या तोरीस, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, जयेश भोंगे, विनय माळी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला.
 

Advt_1  H x W: