रेल्वेची मंजुरी असतांना शहरातील बोगद्याचे काम अपूर्ण कसे - माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

    दिनांक : 16-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : समाजाची कामे करतांना भेदभावाचा विचार न केल्यास जिल्ह्याच्या विकास झपाट्याने होईल. पालिकेने निधी देऊनही रेल्वे बोगद्याचे काम रखडले आहे. इतर सर्व ठिकाणी रेल्वेचे कामे होत असतांना शहरातील बोगद्याचे ७ वर्षांपासून काम अपूर्ण कसे असा सवाल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
 
raghuvanshi_1   
 
नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर आयोजित कार्यक्रमात माजी आ.रघुवंशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गुर्जर महासभेचे अध्यक्ष दीपक पाटील, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, डॉ. हेगडेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, व्हीएसजीजीएमचे अध्यक्ष मोहन पटेल, केदारेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, हिरालाल पाटील, प्रभाकर चौधरी, गिरीविहार सोसायटीचे चेअरमन भरत शहा, सचिव अशोक सोमाणी,इंजि.किरण तडवी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, नगरसेवक कुणाल वसावे, परवेज खान, नगरसेविका ज्योती पाटील, मनीषा वळवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शहरातील नागरिकांची सोय व्हावी व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी नळवा रस्त्यावर उड्डाणपूलासाठी नगरपरिषदेने रेल्वे प्रशासनाला ३ कोटी रुपयांच्या निधी दिला. काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेची मंजुरीही मिळाली असताना अद्यापपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे दुर्दैव आहे.
 
पाणी पुरवठ्याची वेळ वाढविली
धरणात पाण्याचासाठा कमी असल्यामुळे शहरात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. १ मार्चपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच १ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. ४५ मिनिटांवरून १ तास पाणी पुरवठा होत असल्याची माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. विरोधकांकडून पाणीप्रश्नी समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून जनतेत संभ्रमावस्था निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना लोकांची साथ मिळाली नसल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.
 
 
 
 
ADVT_1  H x W: