प्रगत अध्यापनशास्त्राच्या मदतीने मूल घडवा : डॉ जगराम भटकर

    दिनांक : 16-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : प्रगत अध्यापन शास्त्र याविषयी प्राप्त झालेल्या ज्ञानातून आपल्या मुलांना घडविण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मुले घडवावित, असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी केले. प्रगत अध्यापन शास्त्र विषयी आयोजित कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 
bhatakar_1  H x 
 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार, क्वेस्ट संस्था पालघर, ज्ञानप्रकाश फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवडक शिक्षकांसाठी भाषा व गणित प्रगत अध्यापन शास्त्र प्रशिक्षण घेण्यात आले. हा लघु मुदतीचा कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रम शहरातील एस ए मिशन हायस्कुल जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता.
 
जिल्ह्यातील भाषा व गणित विषयाच्या प्रत्येकी ३० शिक्षकांची या लघु मुदतीच्या कोर्ससाठी निवड करण्यात आली होती. संपर्क सत्र, सराव सत्र, प्रत्यक्ष वर्गकार्य व प्रत्याभरण असे या कोर्सचे स्वरूप होते. पालघर जिल्ह्यातील सोनाळे ता. वाडा येथे मुख्यालय असलेल्या क्वेस्ट संस्थेचे संचालक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर यांच्यासह संस्थेच्या तज्ञांनी या प्रशिक्षणासाठीची शैक्षणिक मदत दिली.
 
ज्ञानप्रकाश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे राज्यतज्ञ मधुकर माने व पल्लवी मुखेडकर तसेच जिल्हा समन्वयक सोनल शिंदे यांच्या मदतीने कोविड काळात शिक्षकांसाठी भाषा व गणित अध्यापन शास्त्राचे प्रशिक्षण हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बदलत्या काळासोबत शिक्षकांनाही बदलत्या व प्रभावी अध्यापन पद्धतींची माहिती या प्रशिक्षणातून झाली.
 
शिक्षकांना प्रशस्तीपत्र वाटप
कार्यक्रम प्रसंगी बोलतांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी प्रशिक्षितांचे अभिनंदन करतांनाच शिक्षकांनी नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. खाजगी स्तरावर क्वेस्ट ही संस्था राज्यातील शिक्षकांना विशिष्ठ मोबदला घेऊन उपलब्ध करून देत असलेला हा कोर्स जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी शिक्षण विभागाकडून शिक्षक समृद्धीसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची माहिती देतानाच प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान इतर शिक्षकांपर्यंत पोहचवून त्यांनाही अधिक समृद्ध करा, असे आवाहन त्यांनी केले.
 
शून्य आणि वर्तुळ हे सारखे दिसत असले तरी त्यात मोठा फरक असतो. शून्यात मनुष्य एकटा असतो तर वर्तुळात आपली माणसं असतात, याची जाणीव ठेऊन शिक्षकांनी वर्तुळातील सर्वांनाच सोबत घेऊन प्रगती साधावी, असे मत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी व्यक्त केले.
 
प्रशिक्षणार्थी शिक्षिका रोहिणी बाविस्कर यांनी सांगितले की, कोर्सच्या माध्यमातून आजवर विचारात न घेतलेल्या बारकाव्यांवर देखील चर्चा घडली. अनेक बाबींचा यातुन उलगडा झाला. नवनवीन क्लुप्त्या माहीत झाल्या, ज्या विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अतिशय उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर नंदुरबारच्या मिशन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या एलिना बिजू पराईल व रिया राजेश वासवानी या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
 
ADVT_1  H x W:
 
कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, सुभाष वसावे, एस. ए. मिशन हायस्कुलच्या मुख्याध्यापिका नूतन वर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, ज्युनिअर कॉलेजचे इंचार्ज सी. पी. बोरसे, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती देऊन, जिल्ह्यातील या प्रशिक्षित शिक्षकांचा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचा हातभार लागणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती आर. आर. पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.