नोकराचा मालक झालो... यापेक्षा आणखी काय भाग्य हवे ?

जालना येथील मुंदडा ट्रेडर्सचे सहप्रमुख प्रमोद प्रल्हाद शिरसाळे यांचा स्वानुभव !

    दिनांक : 13-Dec-2021
Total Views |
मंत्र यशाचा 
 
जळगाव : घरच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे शिक्षणात मन लागेना म्हणून जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेतले. आई - वडिलांना अपार कष्ट करतांना पाहून वाईट वाटायचे... तेव्हा शिक्षण - बिक्षण सोड भाऊ ,तू काहीतरी कामच करून घरी मदत कर अशा विचारांची सतत मनात गर्दी व्हायची. त्यामुळे मिळेल ते काम केले. अगदी गवंडी कामापासून तो इलेक्ट्रिक दुकानात काम करण्यापर्यंत... एवढेच नव्हे तर रामेश्वर कॉलनीत चहाची टपरीही चालवली पण स्थिती काही सुधारेना.. तेव्हा रेवणनाथ शितोळे हा मित्र मला मुंदडा ट्रेडर्समध्ये घेऊन आला आणि पॅकिंग विभागात कामाला लावले.. तेथे वेगवेगळ्या प्रकारची कामे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने करता - करता आज मला जालना येथील याच फर्मचा अर्धा मालक बनविण्यात आले आहे. मी नोकराचा मालक झालो आहे... सांगा,यापेक्षा आणखी काय भाग्य हवे ? दोन्ही डोळ्यात अश्रू आणि गहिवरून आलेल्या स्वरात प्रमोद प्रल्हाद शिरसाळे विचारत होते...
 

Mundada_1  H x  
 
प्रमोद मूळचे जळगावचे. मेहरुणमधील दत्तनगर झोपडपट्टीमध्ये ते राहायचे. मात्र त्यांचा जन्म पुण्याचा. १ जून १९७६ ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील प्रल्हाद शिरसाळे पिंपरी - चिंचवड (पुणे) येथे स्वस्तिक रबर कंपनीत काम करायचे. राहायचे मात्र ३५ कि.मी अंतरावरील आळंदी रोडला. दररोज सायकलने कंपनीत ये-जा करायचे. आई सुमनबाई गृहिणी होती. आई-बाबा,४ बहिणी,आजी-आजोबा आणि मी असा आमचा परिवार... पुढे १९७९ मध्ये ’स्वस्तिक’ बंद पडल्याने वडिलांना कंपनीने फरिदाबादला जाण्यास सांगितले. जळगावला आजी-आजोबा एकटेच राहत असल्याने बाबांनी तेथे जाण्यास नकार देत सरळ जळगाव गाठले. जळगावला त्यांनी अशोक इंडियात काम सुरु केले. मात्र मिळणारा पगार आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या,त्यांच्या गरजा यांचा ताळमेळ बसेना. मिळकत कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती होती. त्यातही ’वेळ पडली तर भीक मागू,पण तुला शिकवूच’ असा आई-बाबांचा निर्धार होता.माझ्या डोळ्यासमोर मात्र त्यांचे कष्टच दिसायचे. त्यातही अधिक पसे मिळवण्यासाठी त्यांनी परंपरागत इस्त्रीचा धंदा सुरु केला. बाबा तासनतास उभे राहून कपडे इस्त्री करायचे तर आई कपडे धुवून धुवून पुरती दमून जाई. १९८३ ते २००० म्हणजे १७ वर्षे ते असे राबत होते - हे सांगतांना प्रमोद यांना हुंदका आवरणे अवघड झाले होते.
 

Pramod Shirsale_1 &n 
 
नोकरीचा निर्णय
 
आई-बाबांचे हे कष्ट पाहून मी सुद्धा नोकरीच करण्याचा निर्णय घेतला असे सांगून प्रमोद शिरसाळे म्हणाले की, जळगावला मुंदडा ट्रेडर्समध्ये रेवणनाथ किसन शितोळे नावाचा एक मित्र काम करायचा. एके दिवशी तो मला या फर्मच्या मालकांकडे घेऊन गेला. त्यांचे नाव भगवतीप्रसादजी. मात्र सर्वजण त्यांना ’भायजी’ या नावानेच संबोधत असत. मीही भायजीच म्हणायचो. तेथे पॅकिंग विभागात काम सुरु केले,मात्र तेथे महिला कर्मचारी अधिक असल्याने लवकरच मी ते काम सोडण्याचे ठरवले. तेव्हा रेवणनाथ आणि जगन वखरे या तेथील कर्मचार्‍याने समजावले की , असू दे महिला अधिक,तू आपल्या कामाकडे लक्ष दे- मलाही ते पटले आणि पाहता-पाहता मी तेथे रुळलो... आणि रुजलोही.
 
गाडीवर क्लिनर होण्याची संधी
 
पुढे काही दिवस भायजींच्या गाडीवर क्लिनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात मी बराचसा वेळ त्यांच्यासोबत असे. त्यामुळे त्यांचा स्वभाव आणि व्यवहार कुशलता जवळून पाहू शकलो. ते बोलायला जेवढे परखड आणि स्पष्टवक्ते तेवढेच व्यवहारातही काटेकोर. गंभीर चुकीशिवाय त्यांना कधी कुणावर रागावलेले पाहिले नाही. याच काळात मकरंद धर्माधिकारी या सहकार्‍याने मला बुलढाणा जिल्ह्यात टूरवर नेले होते. तेथे पीव्हीसी पाईप आणि फिटींग्ज यांच्या बुकिंग आणि बिलाच्या वसुलीचे काम असे, असे सांगून प्रमोद म्हणाले की, या कामात मी लवकरच तरबेज झालो. त्यामुळे दुसर्‍यावेळी मात्र मालकांनी मला एकट्यालाच टूरवर पाठवून माझी जणू परीक्षाच घेतली. मी सुद्धा निर्धार केला होता की, त्यांच्या परीक्षेत पासच व्हायचे आणि झालोही..
 
मी या परिवाराचा ’मानसपुत्र’
 
या परिवारात मी इतका एकरूप झालो आहे की ,सर्वजण मला त्यांचा मानसपुत्रच म्हणतात. भायजींचा वडिलांसारखा तर माझ्या ’मॉं’ चा आईसारखा स्नेह मिळाला, असे सांगून प्रमोद म्हणाले की, भायजींचे सुपुत्र योगेशदादा,मामा सत्यनारायजी तापडिया आणि भाचे सनील बिर्ला यांनी मला सर्व कामे शिकवली.त्यामुळे तंत्रज्ञानाचा गंध नसूनही सर्व व्यवहार,वसुली,अकाउंट्सची कामे कॉम्प्युटरवर स्वतः करू शकतो. माझी स्थिती भगवान श्रीकृष्णा सारखी आहे,असे गंमतीने सांगत ते म्हणाले की, श्रीकृष्णाप्रमाणेच मलासुद्धा दोन - दोन पालक आहेत. एक जन्म देणारे तर दुसरे पालन पोषण करणारे. आपल्या परिवाराचे काय ?असे विचारता ते म्हणाले की, अमळनेर तालुक्यात माहेर असलेल्या पुष्पा यांच्याशी २००३ मध्ये विवाह झाला असून आम्हाला ओम आणि रुपेश अशी दोन मुले आहेत. असा माझा आटोपशीर संसार असल्याचे ते म्हणाले.
 
अन नोकराचा झालो मालक
 
जालना येथे २०१३ मध्ये ’मुंदडा ट्रेडर्स’ या फर्मचे काम सुरु झाले आणि पाहता पाहता ग्राहकांचा विश्वास आणि व्यवहारातील सचोटी,पारदर्शीपणा व परिश्रम यामुळे उत्तरोत्तर प्रगती होत गेली. येथे सोबत होते योगेशदादा आणि बिर्लाजी... पुढे २०१६ मध्ये येथे मलाही भागीदार करून घेण्यात आले आणि एका नोकराचा मालक झाला.. माझा जणू संपूर्ण कायापालट झाला.. आणि त्याचे संपूर्ण श्रेय जाते भायजी आणि त्यांच्या परिवाराला. जळगावसह औरंगाबाद,बीड,जालना,वाळुंज, कन्नड,वैजापूर-याशिवाय राजस्थानमधील बुंदी येथेही ’मुंदडा ट्रेडर्स’ ने सचोटीच्या व्यवहारासाठी ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. माझ्यासारख्या कोळशाला त्यांनी हिरा बनवला अशा शब्दात ते आपली कृतज्ञता व्यक्त करतात. सध्या त्यांचे ७६ वर्षीय वडील आणि मुलगाही त्यांना मदत करतात. २००५ पासून शालक मुकेश वाल्हे येथे आहेत तर एक शालक वैजापूरला मदतीला असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ध्यानसाधना दूर करते ताण - तणाव
 
मो. रफी,किशोर कुमार,लता मंगेशकर,आशा भोसले,मन्ना डे यांनी गायिलेल्या जुन्या गाण्यांचे शौकिन असलेल्या प्रमोद यांनी एकेकाळी एकाच दिवशी पाच - पाच सिनेमे पाहिले आहेत. भायजींचा या परिवारावर एवढा प्रभाव आहे की, त्यांच्या प्रमाणेच हे कुटुंबीयसुद्धा ’गायत्री’चे उपासक आहेत. व्यवसायात ताण - तणाव आल्यास तो घालवण्यासाठी ध्यानसाधना हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचा आणि दररोज दोन जपमाळ पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले. मागील काळात ’कोरोनाग्रस्त’ झाल्यावर मला आणि वडिलांनाही त्याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले. मी आता जालनावासी झालो असलो तरी जळगावच्या मातीचा सुगंध आणि संस्कार आजही प्रत्येक श्वासात अनुभवतो. माझ्या वयोवृद्ध आई-वडिलांना त्यांच्या उतारवयात सुखाचे दिवस अनुभवता आले आणि माझी प्रगती ते प्रत्यक्ष पाहू शकले याचे अधिक समाधान आहे अशी नम्र भावनाही त्यांनी व्यक्त केली.
 
कौतुकाऐवजी मिळाली फटकार
सकाळी ६ वा. माझा प्रवास सुरु होई तो रात्री उशिरा संपत असे. विशेष म्हणजे, मी टूरवरून परत येईपर्यंत भायजी माझी वाट पहात जागत असायचे. एकदा असाच टूरवर गेलो असता त्यादिवशी अपेक्षेपेक्षाही अधिक वसुली झाली होती. त्यामुळे माझ्याजवळची रक्कम भली मोठी होती. तशाच स्थितीत मी प्रवास करीत होतो. रात्री उशिरा परतल्यावर ती भली मोठी रक्कम त्यांच्यापुढे ठेवली. या कामगिरीबद्दल ते आता आपले कौतुकच करतील असे वाटत होते, मात्र झाले उलटेच... ते इतक्या जोरात रागावले की, मी घाबरलोच. त्यांच्या मते,एवढी मोठी रक्कम सोबत घेऊन मी प्रवास करायची काय गरज होती ? पैसे कुठे जाणार होते ? ते आज ना उद्या मिळणारच होते. मात्र तुझ्या जीवाचे काही बरे - वाईट झाले असते तर काय भाव पडले असते ? त्यांच्या या शब्दात रागापेक्षाही त्यांना माझी किती काळजी आहे ही भावनाच अधिक होती. त्यानंतर अधिक जबाबदारीने काम करण्याचा तेव्हा दिलेला शब्द मी आजही पाळतो आहे असेही प्रमोद म्हणाले.