अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट : विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पाऊल!

    दिनांक : 29-Nov-2021
Total Views |
भारतात 1986 नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण (NEP) मध्ये प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत बरेच बदल केले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या एक वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा केली, त्यातीलच एक योजना म्हणजे "अकॅडमिक बँक क्रेडिट (ABC)".
  
bank_1  H x W:
 
 
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय?
 
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे शैक्षणिक विषयातील क्रेडिटची व्हर्च्युअल बँक जे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक डेटा स्टोअर करणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक संस्था कॉलेजेस आणि विद्यापीठांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट योजनेत आपली नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच त्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती येथे स्टोअर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव आपला अभ्यासक्रम मध्येच सोडावा लागला त्यांना या धोरणामुळे फायदा होणार आहे. कारण या धोरणामुळे त्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. महाविद्यालयीन शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष उत्तीर्ण झाल्यावर पदविका आणि तीन वर्षे किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी प्रदान केली जाईल. अकॅडमिक बँक ही एक व्यावसायिक बँकेसारखे कार्य करणार असून यात विद्यार्थी ग्राहक असणार आहे आणि अकॅडमिक बँकेत जमा होणाऱ्या क्रेडिटच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदवी किंवा डिप्लोमा मिळणार आहे.
 
अकॅडमिक बँकेची कार्यपद्धती
 
विद्यार्थ्यांचे अकॅडमिक बँकेत खाते उघडले जाईल, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना विशेष आयडी देण्यात येईल. अकॅडमिक बँकेच्या प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करावे लागेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे क्रेडिट त्यांच्या अकॅडमिक बँकेच्या खात्यात जमा केले जातील. ज्या शैक्षणिक संस्था महाविद्यालय विद्यापीठांची यामध्ये नोंदणी असेल त्या संस्थेचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो व वेगवेगळ्या संस्थांमध्ये सर्व अभ्यासक्रम असतात म्हणून कोणत्याही शैक्षणिक संस्थेला अकॅडमिक बँक मध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे.
 
अकॅडमिक बँकेची मुख्य जबाबदारी नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे खाते उघडणे, बंद करणे आणि विद्यार्थ्यांची माहिती व्हेरिफाय करणे ही असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण सोपे आणि सर्वसमावेशी बनविण्यासाठी अकॅडमिक बँक ही योजना महत्त्वाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपला अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करता येईल आणि आपल्या सोयीनुसार पूर्ण करता येईल. शिक्षणादरम्यान ज्या विद्यार्थ्यांना आणि विशेष करून महिला विद्यार्थिनींना आपले शहर सोडून इतर शहरात जावे लागते त्यांच्यासाठी अकॅडमिक बँक योजना आहे, अपूर्ण शिक्षण दुसऱ्या शहरातील दुसऱ्या कॉलेजेसमध्ये सुरू करता येईल. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मधल्या स्टोअर क्रेडिटची शेल्फ लाईफ ७ वर्षाची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येणार नाही. याव्यतिरिक्त विविध संस्थांचे वेगवेगळे नियम असल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.
 
अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषानुसार अभ्यासक्रमाचे क्रेडिट मान्य करणार आहे. अकॅडमिक बँक थेट नोंदणीकृत शिक्षण संस्थांनी दिलेले क्रिटच स्वीकारणार आहे आणि नोंदणीकृत शिक्षण संस्थांनी दिलेले क्रेडिट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातील. अकॅडमिक बँक थेट विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक क्रेडिट किंवा कागदपत्रे स्वीकारणार नाही. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अंतर्गत युजीसी मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्था अभ्यासक्रमासह अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांनी मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास वर्ष वाया जाणार नाही, कारण अकॅडमिक बँकमध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाच्या क्रेडिटची नोंद असणार आहे.
 
हर्षल विभांडीक
प्रदेश संयोजक, आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र उपक्रम