मालधक्का स्थलांतरासाठी टोलवाटोलवी

    दिनांक : 06-Sep-2020
Total Views |
धुळीच्या त्रासाने हजारो नागरिकांना जडले श्वसनाचे विकार
 

sdf_1  H x W: 0
 
संदीप माळी, जळगाव : भोईटे नगरातील रेल्वे मालधक्क्यावर रेल्वे प्रशासनाने रस्ता आणि गटारीच्या कामाला सुरुवात केली आहे. परंतु, हा मालधक्का नेमका कुठे स्थलांतरीत होणार आहे हा प्रश्‍न अजूनही कायम असून मालधक्का स्थलांतराबाबत प्रशासनाकडून टोलवाटोलवी होत आहे. तसेच येथे सिमेंट उरविण्यात येत असल्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना श्वसनाचे अनेक विकार होत आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
मालधक्का स्थलांतरासाठी पाळधी, शिरसोली आणि आता तरसोद अशा ठिकाणांची नावे पुढे येत आहे. त्यामुळे या स्थलांतराची प्रक्रिया अजून किती वर्षे सुरु राहील हे कळत नाही. मात्र याकाळात परिसरातील धूळग्रस्त नागरिकांना मुक्त श्‍वास कधी मिळणार, याबाबत प्रशासनसुद्धा गप्प आहे.
 
दररोज ६०० ट्रक्सची आवक-जावक
शहरातील भोईटे नगर, भिकमचंद नगर, म्हाडा कॉलनी, दूध फेडरेशन आदी परिसरातील सुमारे ५ हजार नागरिकांना धुळीमुळे त्रास होत आहे. दररोज येथे ५०० ते ६०० ट्रक्सची आवक-जावक होते. त्यात असलेल्या सिमेंटचे कण परिसरात दिवसभर असतात. त्यामुळे रस्त्यावरील ये-जा करणार्‍या प्रवाशांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
नागरिकांच्या जीवाशी खेळ
मालधक्का येथील प्रदूषण पातळी अतिउच्चतम असून श्वसनास अतिशय घातक असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वेळा दिला आहे. असे असूनसुद्धा आणखी किती वर्ष स्थलांतराचा प्रश्‍न शासकीय लालफितीत अडकून पडेल हे कळत नाही. हा मालधक्का लवकरात लवकर प्रशासनाने कुठल्याही ठिकाणी स्थलांतरीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
 
मालधक्क्याला धक्का मिळावा
यापूर्वी मालधक्का पाळधी येथे स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरु होत्या. कारण, सुरत लाईनवरील पाळधी येथे ६० टक्के इन्फ्रास्ट्रक्चर आधीच आहे. या लाईनवर रेल्वे मंत्रालय आधीच व्यवहार करीत आहे. राष्ट्रीय मार्ग लागून आहे, अशा अनेक बाबी स्थलांतरासाठी अनुकूल आहेत. मात्र आता स्थलांतरासाठी शिरसोली आणि तरसोद हे ठिकाण पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा रेल्वे मंत्रालय संबंधित व्यापारी, जागा, परवानगीसाठी शून्यातून सुरुवात करेल. म्हणजे नागरिकांच्या श्वसनाशी खेळच होणार आहे. हजारो नागरिकांना या धुळीतून सुटका मिळावी आणि मालधक्क्याला धक्का द्या, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने येथे सिमेंट न उतरवता अन्य साहित्य उतरवावे, अशी मागणी आहे.
 
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक
धूळकण नेहमी श्वसनमार्गात आल्यामुळे तो मार्ग कालांतराने ब्लॉक होतो. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे श्वसनाचे आजार उद्भवतात. अधिक धूळ कण असलेल्या ठिकाणी रहिवास किंवा काम करीत असलेल्या नागरिकांना श्वसनाचा आजार होणार ही बाब सामान्य आहे. अशा नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच चांगल्या प्रतीचे मास्क लावणेही बंधनकारक असून नियमित व्यायाम आणि श्‍वसनाचे योग केले पाहिजे. असे केल्यावरसुद्धा श्‍वसनाचा त्रास झाल्यास निवास बदलावा लागेल, हाच शेवटचा पर्याय आहे.
-निलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर, भुसावळ
 
अन्यथा उपोषणास बसणार
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर रेल्वे मंत्रालयाने स्थलांतराची प्रक्रिया सुरु केली असून धक्क्यासमोरील रस्ता आणि गटारीचे काम रेल्वेने सुरु केले आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. तरी येथील सिमेंट लोडिंग इतर ठिकाणी हलविण्यासंदर्भात ४० नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेली ही प्रत आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अहवाल, नागरिकांना श्वसानाचा त्रास झाल्याबाबतच्या डॉक्टर्सच्या फाईल्स, एक्स-रे आदी कागदपत्रे केंद्रीय रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, रेल्वे प्रबंधक, भुसावळ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत. ही तक्रार गांभीर्याने घेऊन सिमेंटचे लोडिंग - अनलोडिंग ‘न्यु गुडसशेड भोईटे नगर’ येथे न करता, अन्य ठिकाणी करावे. अन्यथा मालधक्क्यावरच उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी दिला आहे.
  
sourabh_1  H x
अनेक वर्षांपासून भोईटे नगरात राहत असून घरासमोरच मालधक्का आहे. येथे सिमेंट, धान्य, युरिया अशा साहित्याची लोडिंग होते. त्यामुळे घरात सर्वत्र धूळ असते. मागील एक वर्षापासून कायम सर्दी असून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यावर डॉक्टरांकडे गेलो असता धुळीमुळे हा त्रास होत असून ऑपरेशन करावे लागणार आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून ऑपरेशनसाठी पुन्हा आर्थिक संकट येणार आहे.
- सौरभ कारलेे, त्रस्त नागरिक
 
prarth11_1  H x
 
२००३ पासून भोईटे नगरात राहत असून मालधक्क्यावरुन निघणारी धूळ घरात जमा होते. काही काळानंतर नियमित सर्दी होण्यास सुरुवात झाली. २०१६ मध्ये श्‍वास घेण्यास त्रास खूप वाढू लागल्याने डॉक्टरांनी अनेक प्रकारच्या टेस्ट केल्या. त्यात धूळ, गव्हातून निघणारे कण याच्या ऍलर्जीमुळे हा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सतत खिशामध्ये औषधी सोबत ठेवावी लागत असून तोंडाला मास्क, रुमाल कायस्वरुपी असतो. सहा-सहा महिन्यातून तपासणीही करावी लागते.
-पार्थ ठाकर, त्रस्त नागरिक