नवीन शैक्षणिक धोरणाने लॉर्ड मेकॉलेच्या जोखडातून शिक्षण होईल मुक्त

    दिनांक : 05-Sep-2020
Total Views |
  • विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित वेबसंवादात डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन
  • वेबसंवादात अनेक मान्यवरांचा सक्रिय सहभाग; मोठ्या प्रमाणात मिळाला प्रतिसाद

sdf_1  H x W: 0
 
जळगाव : पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व आहे, त्यात गुरुची भूमिका अतिशय महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा रोल असतो. नुकतेच घोषित करण्यात आलेले नवीन शैक्षणिक धोरण हे लॉर्ड मेकॉलेच्या जोखडातून मुक्त करणारे दस्तावेज असून गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या मातीचा सुगंध या शिक्षणाला यावा असा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावर ऑनलाईन वेबसंवादात मुख्य प्रवक्ते म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
 
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमशील योजनांसह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेने, प्रतिष्ठानने शनिवारी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील या वेबसंवादाचे आयोजन केले होते. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाठक हे वेब संवादाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे माजी उच्च तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आयआयटी, आयआयएम, एमडी सीप अकॅडमी चेन्नईचे दिनेश व्हिक्टर आदी होते.
 
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने वर्षभराच्या सकारात्मक व्यापक विचार मंथनानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. या नवीन धोरणांची अंमलबजावणी खूपच महत्वपूर्ण असून त्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यांकन करून त्यांच्या प्रगतीचा उंचावणार्‍या आलेखाचा शिक्षकाचा अभ्यास असणं गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, दिव्यांगांना समान वागणूक देणे ,नवीन तंत्रज्ञानाचा आणि कोरोनाच्या काळात डिस्टसिंगचा अवलंब करून व्हर्चुअल शिक्षण प्रभावी करण्याचे प्रयत्न कसे करता येतील याबद्दल या धोरणात विचार केला गेला आहे. त्याचबरोबर शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कराव्या लागणार्‍या कामांपासून मुक्त करून केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रीत करता यावं या संदर्भात उल्लेख यात आहे. शिक्षक वर्गात कशा पद्धतीने शिकवतात, याचा फीडबॅक हा विद्यार्थ्यांकडूनही घेतला जावा, शैक्षणिक संस्थेत आवश्यकतेनुसार नियुक्ती केली जावी त्याच प्रमाणे शिक्षकाला स्वायत्तता देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात काय करता येईल? याचादेखील समावेश आहे. बी.एड.साठी वेगळे कॉलेज असण्याची जरुरी नाही तर सामान्य युनिव्हर्सिटीसुद्धा हे कॉलेज चालवू शकणार असल्याचे डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
 
विनोद तावडे
या ऑनलाईन चर्चासत्रात विनोद तावडे म्हणाले की, शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थी मग ते शालेय शिक्षण, हायर एज्युकेशन, विदेशी शिक्षण या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा या धोरणात विचार केला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच असल्याचे सांगत, जे विद्यार्थी विदेशात जाऊन ५० लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करतात ते शिक्षण कमीत कमी खर्चात या देशात उपलब्ध करून देणे हे राज्यकर्त्यांचे काम असल्याचे ते म्हणाले. एकविसाव्या शतकात भारत हा महासत्ता देश म्हणून नावारूपास येत असताना शिक्षणाच्या राईट स्पिरिट’विचारांनी एक वेगळा भारत निर्माण होऊ शकतो आणि त्यात विवेकानंद प्रतिष्ठानचे कार्य हे अतिशय समर्पक असल्याचेही विनोद तावडे म्हणाले.
 
सीप अकॅडमी चेन्नईचे दिनेश विक्टर
दिनेश विक्टर म्हणाले की, वर्गात शिक्षक-विद्यार्थ्यांचा रेशो हा एकास ५० होतांना दिसत आहे तर लाखो शिक्षकांची शिक्षण क्षेत्रात आवश्यकता असताना एवढी शिक्षक सरकारला घेणे शक्य नाही, तर शिक्षकांनाच मास्टर ट्रेनर बनवता येऊ शकते. तसेच नर्सरी ते हायर एज्युकेशन पर्यंत सर्व शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याने सर्व शिक्षकांना समान वेतन हा आराखडा बदलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 
प्रकाश पाठक
वेब संवादाच्या शेवटी प्रकाश पाठक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चरित्र निर्माणावर देखील भर दिला पाहिजे तसेच शिक्षकांनी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे . विज्ञानाला अध्यात्मिकता ,वाणिज्य आणि मानवता याची सांगड घालण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो असे सांगितले.
 
या वेब संवादात विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील यांच्यासह, मुळजी जेठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी सहभागी झालेल्या काही शिक्षकांच्या विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब आणि झूम वर लाईव्ह दाखविण्यात आला. सूत्रसंचालन विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र नन्नवरे यांनी केले तर माजी विद्यार्थी अमित सोळुंके यांच्यासह टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह करण्यात आला.