कोरोनाबाधितांनी पार केेला ३० हजारांचा टप्पा

    दिनांक : 04-Sep-2020
Total Views |
जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक १०६३ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

corona_1  H x W 
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजपर्यंतचे सर्वाधिक १०६३ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे. यात सर्वाधिक ३६९ रुग्ण जळगाव शहरात आढळून आल्याने जळगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यातील बाधितांनी ३० हजारांचा टप्पा पार केल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
 
जिल्ह्यात दररोज कोरोना विस्फोट होत असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच १०६३ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा ३० हजार ७४९ इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील असून शहरात आज ३६९ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात असून शहरातील बाधितांची संख्या ७ हजारपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे जळगाव शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
 
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ३६९, जळगाव ग्रामीण ८४, भुसावळ ३१, अमळनेर ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, भडगाव ३१, धरणगाव २२, यावल ११, एरंडोल ७७, जामनेर ५०, रावेर १९, पारोळा १७, चाळीसगाव ८१, मुक्ताईनगर २५, बोदवड १९ आणि अन्य जिल्ह्यातील १५ असे एकूण आज १०६३ नवे रुग्ण आढळून आले आहे.
 
आरोग्य यंत्रणेवर वाढतोय ताण
आज दिवसभरात ५०३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणार्‍यांची संख्या २१ हजार ८४५ इतकी झालेली आहे. वाढत जाणार्‍या संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या तुलनेत बरे होणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे.
 
दिवसभरात ९ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात दिवसभरात ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील ४, एरंडोल, चोपडा, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ८४९ जणांचा मृत्यू झाला आहे.