एकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा करार अन् दुसर्‍यासोबत फरार

    दिनांक : 03-Sep-2020
Total Views |
मुलीला घरी घेवून जातांना घडला प्रकार; तरुणासह कुटुंबियांची शहर पोलिसात धाव
 
car_1  H x W: 0
 
 
जळगाव : मुक्ताईनगरातील तरुणी शहरातील एका महिलेसोबत गुजरातला गेली होती. गुजरातमधील ज्या कुटुंबीयांकडे ही तरुणी गेली होती, तेथील तरुणासोबत तिची ओळख झाली अन् ती तरुणी त्या मुलाला आवडल्याने त्याने त्या तरुणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मध्यस्थी असलेल्या महिलेने त्या तरुणाकडून पैसे घेवून त्या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा करार केला. मात्र ती तरुणी गुजरातला जातांना शहरातील पेट्रोलपंपावरुन दुसर्‍याच तरुणासोबत रफूचक्कर झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
काही दिवसांपूर्वी शहरातील एक महिला मुक्ताईनगर येथील तरुणीसोबत गुजरातला परिचीत असलेल्या कुटुंबाकडे गेली होती. या कुटुंबातील तरुणाचे लग्नासाठी नियोजन सुरु होते. यातच महिलेसोबत आलेली तरुणी या तरुणाला आवडली होती. त्यातच दोघे दोन दिवस सोबतच गुजरातमध्ये फिरले.
 
त्यानंतर ती महिला त्या तरुणीसोबत आपल्या घरी परतली. दोन दिवस सोबत राहिलेली ती तरुणी त्या तरुणाला आवडल्याने त्याने तिच्यासोबत लग्न करण्याबाबत घरी सांगितले. त्यानुसार कुटुंबियांनी देखील त्या तरुणीसोबत असलेल्या महिलेशी संपर्क करुन लग्नाबाबत बोलणी केली.
 
पैसे घेतल्यानंतर केली नोटरी
फोनवर लग्नाची बोलणी झाल्यानंतर त्या महिलेने त्या तरुणाच्या कुटुंबियांना पैसे घेवून येण्यास सांगितले. हे कुटुंबीय पैसे घेवून शहरात आले. त्या महिलेने तरुणाच्या कुटुंबीयांकडून लिव्ह इन रिलेशनशीपचा करार करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर त्या महिलेने ६० हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर शहरातील एका वकिलाकडे जावून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपची नोटरी देखील करुन घेतली.
 
पोलिसांकडे कथन केली आपबीती
तरुणाच्या कुटुंबियांच्या हातावर तुरी देवून तरुणी रफूचक्कर झाल्यानंतर त्या तरुणाने मध्यस्थी असलेल्या महिलेसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या महिलेसह त्या तरुणीचा मोबाईल बंदच येत असल्याने आपली फसवणूक झाली असे त्यांच्या लक्षात आले. त्या तरुणासह त्याचे मेव्हणे व कारचालक यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांसमोर त्यांच्योबत झालेली घटना कथन केली. याबाबत पोलिसांकडून या प्रकाराची चौकशी सुरु आहे.
 
लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपचा करार...!
मुलगी मुक्ताईनगरची आणि मुलगा गुजरातचा तुम्ही मुलीला गुजरातला घेवून गेलात आणि तिचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण? असे म्हणत त्या महिलेने त्या दोघांचे लग्न न लावता त्यांना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्ला दिला.तसेच त्या तरुणाच्या कुटुंबियांकडून रिलेशनशिपच्या करारासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. परंतु त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने तरुणाच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला ६० हजार रुपये देऊ केले.
 
भाऊ आल्याचे सांगून दुचाकीस्वारासोबत पलायन
नोटरीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या तरुणाचे कुटुंबीय कारने तरुणाला घेवून गुजरातला रवाना होण्यासाठी निघाले. शहरातून बाहेर पडण्याअगोदर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी कार गणेश कॉलनी परिसरातील पंपावर थांबविली. याठिकाणी एक दुचाकीस्वार आला. ‘माझा भाऊ आल्याचे‘ सांगून मी त्याच्यासोबत बोलून येते, असे सांगून ती तरुणी त्या दुचाकीस्वाराकडे गेली. मात्र अवघ्या काही सेकंदातच ती तरुणी त्या दुचाकीस्वारासोबत रफूचक्कर झाल्याचे त्या तरुणाच्या कुटुंबियांच्या लक्षात आले.