पहूर येथील संगमेश्वर मंदिरातचोरीप्रकरणी आरोपीला अटक

    दिनांक : 12-Sep-2020
Total Views |

pahur _1  H x W 
पहूर ता. जामनेर : पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या खोलीचा दरवाजा तोडून कंपाउंडसाठी भाविकांनी दिलेल्या तारेचे जाळी बंडल चोरणार्‍या आरोपीस पहुर पोलिसांनी शिताफीने अटक केली.
 
लोकवर्गणीतून श्री.क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे.मंदिराच्या खोलीमध्ये कंपाउंडसाठी भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या तारेच्या जाळीचे बंडले ठेवलेले होते. ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास भाविकांनी मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांना मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळून आल्याची माहिती दिल्याने महाराजांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता खोलीचा दरवाजा तोडून आतील तारेच्या जाळीचे बंडल चोरून नेल्याचे आढळून आल्याने त्यांनी तात्काळ पहूर पोलिस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार अर्ज सादर केला.
 
पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हे आरोपीच्या मागावर होते. ११ रोजी रात्री गस्तीवर असताना सांगवी रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ अलीम वजीर तडवी (रा .सांगवी ) हा इसम खाट घेऊन जात असताना संशयास्पद आढळून आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यास ताब्यात घेतल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संगमेश्वर महादेव मंदिर केलेल्या चोरीची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या स्वाधीन करण्यात आला. पथकामध्ये पोलीस हवलदार शशिकांत पाटील, पो.कॉ. अनिल देवरे, पो. कॉ .श्रीराम धुमाळ आदींचा सहभाग होता. मंदिरावर झालेल्या चोरीचा छडा लावल्याने पूजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी पोलीसांचे आभार मानले.