कोरोना संक्रमितांची संख्या २१ लाखांच्या उंबरठ्यावर

    दिनांक : 08-Aug-2020
Total Views |
नवी दिल्ली : देशातील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसागणित नवा रेकॉर्ड मोडणारी आकडेवारी समोर येत आहे. दररोज ५० हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ६० हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासात आढळून आलेल्या रुग्णवाढीनंतर देशातील कोरोना संक्रमितांची संख्या २१ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
 
 

Corona_1  H x W 
 
 
गेल्या २४ तासात देशभरात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या आता २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. दरम्यान, काल एका दिवसात ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले असून कोरोनाबळींची एकूण संख्या ४२ हजार ५१८ वर पोहोचली आहे.
 
 
 
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, गेल्या २४ तासात ४८ हजार ९०० रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण १४ लाख २७ हजार ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १५ जूनपर्यंत देशातील कोरोना संक्रमितांचा रिकव्हरी रेट ५१.०८ इतका होता. ७ ऑगस्टपर्यंत तो वाढून आता ६७.९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
 
 
 
दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २ कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी काल एका दिवसात ५ लाख ९८ हजार ७७८ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.