ग्रामीण भागात कोरोना रोखण्यातकोरोना योध्यांचे मोलाचे योगदान

    दिनांक : 07-Aug-2020
Total Views |
 
jalgoan _1  H x
‘तरूण भारत’च्या सदिच्छा भेटीत
जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील यांचे प्रतिपादन
भा वृत्तसेवा
जळगाव, ७ ऑगस्ट
जिल्ह्यात कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाल्यानंतर त्याच्यावर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि शासनातील ‘कोरोना योध्दे’ कसोशीने युध्दपातळीवर काम करीत असून त्यांना नागरिकांचेही तसेच सहकार्य मिळाल्यास जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणता येईल, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील यांनी ‘तरूण भारत’ कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले.
 
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यासाठी रॅपिड चाचणी करण्याची गरज लक्षात घेता जि.प.च्या सेसमधून २० लाखांचा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे नुकताच सुपूर्द केल्याचे सांगून त्या म्हणाल्या, त्यामुळे ग्रामीण भागात तपासणीसाठी टेस्ट वाढल्या आहेत. परिणामी, रुग्णांना वेळेत उपचार मिळून मृत्यूचे प्रमाणही घटत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कोविड सेंटरला अचानक भेटी देत असून सावदा येथे कोविड सेंटरला रात्री अचानक भेट दिल्याने आरोग्य विभागातील रुग्णांना मिळणार्‍या सेवा - सुविधांबाबत माहिती जाणून घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.
 
नागरिकांचे सहकार्य अपेक्षित
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे असून त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बाबींचे कटाक्षाने पालन करण्याची गरज असल्याचेही जि.प.अध्यक्षा रंजनाताई म्हणाल्या. जि.प.च्या अध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर काही काळानंतरच कोरोनाचे संकट निर्माण झाले. मात्र लोकप्रतिनिधी हा लोकांच्या सेवेचा मोठा अविभाज्य घटक असतो. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकांच्या अडचणी, समस्या जाणून घेणे हे माझे आद्य कर्तंव्य आहे, असे मी समजते. त्याच भूमिकेतून ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जि.प.तील कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याचे आदेश जि.प. सीईओंनी दिले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जि.प.च्या सभाही ऑनलाईन घेण्यात येत आहेत. त्यामुळे जि.प.सदस्यांच्या समस्या, अडचणी त्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही आवर्जून सांगितले.
मार्गदर्शक हरवल्याची खंत
भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. हरिभाऊ जावळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्या म्हणाल्या की, त्यांच्या निधनाने भाजपातील माझा पितृतुल्य ज्येष्ठ मागदर्शक हरविला आहे. त्यांची कमतरता मला पावलोपावली जाणवेल. स्व. हरिभाऊंनी वेळोवेळी मला जे मार्गदर्शन केले त्यामुळे माझ्या राजकीय वाटचालीस प्रेरणा मिळल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रारंभी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे यांनी ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
 
कोरोना योध्यांच्या कार्याला सलाम
पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने या काळात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली असून त्याबद्दल त्यांना सलाम करायला हवा, असे सांगत त्या म्हणाल्या, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. सध्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कोविड रुग्ण शोध मोहीम सुरू आहे. मात्र नागरिकांनी त्यांची वाट न पाहता स्वत:हून लक्षणे आढळल्यास आपली तपासणी करून घ्यावी. जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. प्रशासन, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचारी हे कोरोना योध्दे असून त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या कार्याला मी मनापासून सलाम करीत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
 
मंदिर भूमिपूजनाने मनस्वी आनंद
अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचे भूमिपूजन ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. मंदिराच्या निर्माण कार्यास प्रारंभ झाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. श्रीरामचंद्र यांच्या मंदिर निर्माणाने वर्षानुवर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे जनतेत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. सर्वांनी जल्लोषात तो क्षण साजरा केला आहे. हे आयुष्यभर लक्षात राहील, असेही त्या म्हणाल्या.