'पुण्यनगरी' परिवाराचे अध्वर्यू मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांचे देहावसान

    दिनांक : 06-Aug-2020
Total Views |

sdf_1  H x W: 0 
 
ओतूर (पुणे): वृत्तपत्र विक्रेता ते दैनिकाचे मालक असा अलौकीक, अचंबीत करणारा प्रवास करणारे दैनिक 'पुण्यनगरी' परिवाराचे आधारस्तंभ, संस्थापक-संपादक मुरलीधर (बाबा) अनंता शिंगोटे यांचे गुरुवारी (दि. ६) दुपारी एक वाजता देहावसान झाले. ते ८२ वर्षांचे होते. अवघ्या वीस वर्षांच्या काळात बाबांनी सामान्य वाचक आणि विक्रेत्यांच्या पाठबळावर पुण्यनगरीचा महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला. इतक्या कमी कालावधीत एखाद्या दैनिकाने मिळवलेले उत्तुंग यशाचे हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. बाबांच्या निधनामुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
 
महाराष्ट्रातील वाचक चळवळीचा इतिहास घडविणारा सच्चा माणूस हरपला असल्याच्या भावना असंख्य मान्यवरांनी आपल्या शोकसंदेशाद्वारे कळवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या गावी गायमुखवाडी (ता. जुन्नर) येथे वास्तव्यास होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले अरविंद, प्रवीण व संदीप, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदरणीय बाबांच्या पार्थिवावर सायंकाळी उंब्रज १ येथे पुष्पावती नदीच्या तीरावरील अमरधाम येथे सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
मराठी वृत्तपत्रसृष्टीत आपल्या कार्यकतृर्त्वाने अढळ स्थान प्राप्त करणारे मुरलीधर शिंगोटे हे अवघ्या महाराष्ट्रात 'बाबा' म्हणूून ओळखले जात. वितरक ते वृत्तपत्राचा मालक-संपादक असा व्यापक अवकाश कवेत घेणाऱ्या बाबांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. कर्तव्यकठोर असणारे बाबा अत्यंत संवदेनशीलही होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आयुष्यभर अंगीकार करणाऱ्या बाबांनी पुण्यनगरी परिवाराचा वटवृक्ष उभा केला. वर्तमानपत्र वितरणाची गुरुकिल्ली आणि वाचकांची आवड हेरण्याची कल्पकता या आपल्या कौशल्याला अपार कष्टाची जोड देत बाबांनी मराठी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध केली.
 
कामावर प्रचंड श्रद्धा असणारे बाबा अगदी अलीकडच्या काळापर्यंत दैनिकाच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय भाग घेत असत व मार्गदर्शन करीत असत. वाचकाची नस कशी ओळखावी, हे देखील शिकवत असत. वृद्धापकाळामुळे काही दिवसांपासून ते विश्रांती घेत होते. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अवघा पुण्यनगरी परिवार पोरका झाला!
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
आदरणीय बाबांच्या पार्थिवावर उंब्रज १ येथील पुष्पावती नदीच्या काठावरील गयाबाई अनंता शिंगोटे अमरधाम येथे सायंकाळी साडेपाच वाजता सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबांचे पुत्र संदिप शिंगोटे यांनी बाबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
 
अल्पपरिचय
बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी सात मार्च १९३८ ला झाला. इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या बाबांनी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई गाठली. मुंबईत प्रारंभीच्या काळात फळविक्री करून त्यांनी उदरनिर्वाह केला. तद्नंतर बाबांनी बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले, त्या क्षणाचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न बाबांनी उराशी बाळगले होते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी बाबांनी पाच मे १९९४ मध्ये 'मुंबई चौफेर' हे सायंदैनिक सुरू केले. त्यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तमीळ टाइम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणाऱ्याचा एकमेव सन्मान बाबांनाच लाभला.