प्रशासकीय यंत्रणेवर विश्‍वास ठेवून त्वरित उपचार घ्या : डॉ.दिलीप पाटोडे

    दिनांक : 27-Aug-2020
Total Views |
 
 
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटोडे यांचे ‘तरुण भारत’ भेटीत आवाहन
 
जळगाव : जिल्हयात कोरोना संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासकीय यंत्रणेवर संपूर्ण विश्‍वास ठेवून रुग्णांनी उपचार घ्यावेत. कुठल्याही सोशल मिडीयातून निर्माण केल्या जाणार्‍या अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जि.प.चे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटोडे यांनी केले. ‘तरूण भारत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्यांनी मनमोकळेपणे कोविड संदर्भातील विविध विषयावर सहकार्‍यांशी संवाद साधला.
 
 
 

ZP_DHO_Interview_1 & 
 
 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्या कोविड संदर्भातील प्रभावी कार्यपध्दतीचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ग्रामीण भागातही कोविड संदर्भात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जिल्हाधिकारी, जि.प.सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात कोविडबाबतच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
कोरोनावर यशस्वी मात अन् पुन्हा सेवेत
डॉ.दिलीप पाटोडे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे कोरोना योध्यांचे प्रमुख म्हणून कायर्र्रत आहेत, त्यासंदर्भात विचारता जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरूवातीपासून धडपड होती. मात्र गत महिन्यातच जिल्ह्याभरात कोरोना संदर्भात कामकाज सुरू असतांनाच मला कोरोनाची बाधा झाली, असे सांगून ते म्हणाले, मी त्वरित उपचार आणि काळजी घेतल्याने कोरोनावर विजय मिळवत पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी हजर झालो आहे. कोरोनाला यशस्वी मात दिली आहे. पुन्हा ग्रामिणच्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जिल्हाभरातील तालुका वैद्यकीय केंद्रांना भेटी, मार्गदर्शन आणि खासगी डॉक्टरांच्या बैठका घेऊन त्यांना कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
खासगी डॉक्टरांना आवाहन
ग्रामिण भागातील खासगी डॉक्टर माहिती देत नसल्याची तक्रार असल्याचे सांगून ते म्हणाले, उपचार घेणार्‍या रुग्णासंदर्भात खासगी डॉक्टरांनी वेळेत माहिती दिल्यास रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. त्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी माहिती न लपविता कोविड संशयित रुग्ण असल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. त्यासाठी खासगी डॉक्टरांच्या सहकार्यांची गरज आहे. अन्यथा माहिती न देणार्‍या ग्रामीण भागातील अशा डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामिण भागातील खासगी डॉक्टरांच्या बैठका घेऊन कोविड संशयित रुग्णांबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वेळेत उपचार करणेही शक्य होईल. परिणामी ग्रामिणमधील कोविडची रुग्णसंख्या रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 
सकस आहार घ्यावा
कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्यावा. कारण प्रतिकारकशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी आहार हा सकस आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा असावा, असेही ते म्हणाले. रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी अर्सेनिक अल्बम या औषधीचे वितरणही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.पाटोडे यांनी दिली.
 
 
उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी
ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कोविड ऍन्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून रुग्णांनी लक्षणे आढळताच चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पूर्वी रुग्णांना चाचणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र गावातच चाचणीची सुविधा उपलब्ध झाल्याने भीती न बाळगता तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. रुग्णांवर तातडीने उपचार सुरू झाल्यास धोका कमी होतो. जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील यांचेही ग्रामिण भागाातील राबविल्या जाणार्‍या उपाययोजनांसाठी योगदान मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
 
जिल्ह्यात ७०० खेड्यांमध्ये रुग्ण
जिल्ह्यात सध्या ७०० पेक्षा जास्त खेड्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. लक्षणे दिसताच स्वत:वर उपचार करून घेतल्यास कोरोना हा सामान्य आजाराप्रमाणे बरा होतो. मात्र चाचणी व उपचारास उशिर झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. रुग्णांनी कुठल्याही इतर बाबींवर विश्‍वास न ठेवता उपचाराला प्राधान्य द्यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी जनतेला केले. ग्रामिणमध्ये सुरूवातीला कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र लॉकडाऊन काहीअंशी शिथिल झाल्यानंतर इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येण्याचे स्थलांतरितांचे प्रमाण वाढल्याने ग्रामिण भागात कोरोनाचा अमळनेरमधून प्रवेश झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन गरजेचे
ग्रामिण भागात कोरोनाबाबत जनजागृती चांगल्या प्रकारे झाली आहे. मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे होत नसल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. ग्रामिण भागातील नागरिकांचा इतर ठिकाणी कामानिमित्त संपर्क येतो. परिणामी कोरोनाचे ग्रामिण भागात रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यासाठी ग्रामिण भागातही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांनी पालन केल्यास कोरोनाचा फैलाव रोखता येणे शक्य होईल. कोरोना हा सामाजिक आजार आहे. सामाजिक बंधने लोकांनी पाळलीच पाहिजे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली.
 
 
थकवा, गंध, चव नसणे कोरोनाची लक्षणे
शरीरात खूप थकवा जाणवणे, अशक्तपणा, तोंडाची चव जाणे, नाकाला गंध न येणे ही लक्षणे कोविडची असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे रुग्णांनी दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावेत, असे सांगून ते म्हणाले, ग्रामिण भागात सर्दी, खोकला म्हणून रुग्ण दुर्लक्ष करतात. मात्र रुग्णांनी त्रास होत असल्यास त्वरित उपचार घेण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ.दिलीप पाटोडे यांनी शेवटी केले.
 
 
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटोडे यांच्या कोरोना काळातील कार्यांचा गौरव म्हणून ‘तरूण भारत’तर्फे त्यांना पुष्पगुच्छ तसेच ‘तरुण भारत’चा दिवाळी विशेषांक आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’हे पुस्तक देऊन माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव संजय नारखेडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.