भक्तीमय वातावरणात श्रीगणेशाचे आगमन

    दिनांक : 22-Aug-2020
Total Views |
बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी, पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला अधिक मागणी
ganesh2_1  H x
 
जळगाव : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायांचे आगमन रविवार, २२ ऑगस्ट रोजी झाले. सार्वजनिक मंडळे व प्रत्येक घरात गणरायाची विधिवत पूजा, अर्चा करुन स्थापना करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवरही युवकांचा उत्साह दिसून आला. दुपारनंतर आलेल्या पावसामुळे गणेशभक्त आणि मूर्ती विक्रेत्यांची मोठी धावपळ झाली.
 
श्रीगणेश चतुर्थीनिमित्त शहरातील शिवतीर्थ मैदानावर ७५, सागर पार्क मैदानावर ७५ स्टॉल तर शहरातील विविध भागात ७० ते ८० स्टॉल असे एकूण अडीचशेहून अधिक विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहे. या स्टॉलवर दिवसभर गर्दी दिसून आली. दरम्यान, शिवतीर्थ मैदानावर पावसाने रस्ता चिखलमय झाला आहे. तरीसुद्धा भाविकांनी चिखलातून वाट काढत विघ्नहर्त्याला आपल्या घरी आणले.
 
सर्वत्र आनंदाचे वातावरण
गणपती बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी झाली होती. श्रीगणेशाच्या विविध रुपातील मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यावेळी सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
 
पर्यावरणपूरक मूर्ती खरेदीवर भर
अबालवृद्धांपासून कुटुंबातील सदस्यांनी गणेश मूर्तीचे मोठे आकर्षण असते. यावेळी नागरिकांनी पर्यावरणपूरक असलेल्या शाडू मातीची मूती खरेदीसाठी भर दिला. दरम्यान, पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्यामुळे गणेश भक्त चिखल तुडवताना दिसून आले. तसेच अनेक कुटुंबात पाल्यांनी तयार केलेल्या मूर्तीची स्थापनासुद्धा करण्यात आली आहे. गणेश बाप्पा... कोरोनाला पळवून लावण्याची प्रार्थना सर्वांकडून होत आहे.
 
मंडळांतर्फे ऑनलाईन कार्यक्रमांवर असणार भर
दरवर्षी विविध मंडळातर्फे मोठी आणि आकर्षण आरासची निर्मिती होत असते. परंतु, कोरोनामुळे केवळ गणेश मूर्तीसाठीच मंडप असणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अधिक काळ एका ठिकाणी थांबता येणार नाही. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगसाठीसुद्धा दोरीच्या सहाय्याने मंडळांतर्फे आखणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मंडळासमोर तोंडाला मास्क किंवा रुमाल बंधनकारक राहणार असल्याचे फलकसुद्धा लावण्यात आले आहेत. अनेक मंडळांतर्फे ऑनलाईन माध्यमाद्वारे समाजप्रबोधनावर भर देण्यात येणार आहे.
 
गणेश मंडळांचा उत्साह कायमच
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्याच्यादृष्टिने शासन व प्रशासनाने यावर्षी सर्वच सणोत्सव साजरे करतांना नियम व अटी घालून दिल्या आहेत. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी परवाना धारक गणेश मंडळाची संख्या निम्म्यावर आली असून मंडळांचा उत्साह कायम आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी दोन फुटाची असावी, असे आदेशीत केले आहे.