राममंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ

    दिनांक : 12-Aug-2020
Total Views |
देणगी देण्यासाठी ट्रस्टकडून आवाहन
 
देणगीसाठी बँक खात्याचा क्रमांकही केला जाहीर
 
 
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर, आज बुधवारपासून मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या शुभकार्याची चित्रफीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज सादर केली.
 
 
Ram_Mandir_1  H
 
 
अयोध्येत आजपासून राममंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या बांधकामाची गती जास्त नसली, तरी नजीकच्या काळात गती वाढेल आणि तीन वर्षांमध्ये येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे झालेले असेल, असे चंपत राय यांनी सांगितले. राममंदिरासाठी देणगी देण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांनी आपल्या क्षमतेनुसार दान करावे, असे सांगताना त्यांनी न्यासचे बँकेतील खाते क्रमांक आणि अन्य माहिती सादर केली.
 
 
 
देश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांना मंदिराच्या बांधकामात आपले योगदान देण्याची इच्छा आहे, अनेकांनी ती आमच्याकडे व्यक्तही केली आहे. त्यांसाठी मी न्यासचा खाते क्रमांक आणि अन्य माहिती आम्ही आज सादर केली आहे. आम्हाला केवळ देणगीच नको, तर तुमचे पाठबळ आणि आशीर्वादही हवे आहेत. हे राममंदिर भव्य आणि अद्‌भूत असेच असेल, असे ते म्हणाले.
 
 
 
खोदकाम सुरू
एल अॅण्ड टी या नामांकित बांधकाम अद्योग समूहाकडे राममंदिराच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी येथे दाखलही झाले आहेत. या परिसरात आता खोदकामाला सुरुवात झाली आहे. 10 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या धक्कातही मंदिराला काहीच होणार नाही, इतका मजबूत मंदिराचा पायवा असेल, तसेच मंदिराचे सौंदर्य आगामी कित्येक दशक टिकून राहावे, यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.