अण्णाभाऊ साठे : मराठी साहित्यातील स्वयंप्रकाशित तारा

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
 
 
 निमित्त
 
 - अशोक पारधे
 
 
महाराष्ट्र भूमी अनेक साहित्यिकांची खाण आहे. याच मराठी साहित्यांच्या वैभवशाली प्रांगणात मराठी साहित्यिकांच्या ध्येयवादी वृत्तीच्या अनेक पणत्या होऊन गेल्या आहेत. अशाच मराठी साहित्याच्या मांदियाळीत उजळून उठणारी, आत्मतेजाने उठून दिसणारी, स्वयंप्रकाशित, स्वयंस्फूर्त, प्रकाशमान होणारी ज्वाला याच महाराष्ट्र भूमीत , मराठी साहित्याच्या प्रांतात होऊन गेली - त्या धगधगत्या ज्वालेचे नाव होते अण्णा भाऊ साठे.
 
 
 
Annabhau_Sathe_1 &nb
 
अण्णा भाऊ साठे विसाव्या शतकातील मराठीतील एक प्रतिभावंत साहित्यिक असून आजवर त्यांच्या जीवनपटाचा अनेक वाचकांनी, रसिकांनी, साहित्यिकांनी अभ्यास केलेला आहे. ज्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनाचा अभ्यास केलेला आहे, त्यांचे साहित्य वाचले आहे ते चकित झाल्याशिवाय राहिले नसतील.
 
 
 
सांगली जिल्हयातील वाटेगावसारख्या खेडयातून त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला. पोटाच्या विवंचनेसाठी साठे कुटुंबियांनी मुंबईला आपलेसे केले. अतिशय कष्टप्रद जीवन त्यांच्या वाट्याला आले. मुंबई त्यांची कर्मभूमी बनली. वाटेल ते काम करू लागले. दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध प्रस्थापित केला. खर्‍या अर्थाने अंतःप्रेरणेला साक्षी ठेवून अक्षरशत्रूचे अक्षरयात्री बनले. कित्येक दिवसाचा उपाशी एखादा सिंह शिकार मिळताच जसा तुटून पडतो अगदी तसं अण्णाभाऊंच्या बाबतीत झाले.
 
 
 
मिळेल त्या कागदावरचे अक्षरे वाचणे, दुकानावरच्या पाट्या वाचणे, चिंतन, मनन करणे, वर्तमानपत्र वाचणे असे करता करता पुस्तके वाचण्यास प्रारंभ केला. अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून हाता वेगळे करायचे. त्यातूनच त्यांच्या उपजत काव्य प्रतिभेला खतपाणी मिळाले. अक्षरांना संजीवनी मिळाली. अण्णा भाऊ कविता, गाणी, पोवाडे वाचू लागले. स्वतः रचना करू लागले. एवढेच नव्हे तर त्यांना मधुर आवाज देवाचा प्रसाद म्हणून मिळाला होता. ते खडया आवाजात गायचे. शाहीर अमर शेख, गव्हाणकर व अण्णाभाऊ साठे या त्रिमूर्तीनी ‘लाल बावटा’ कला पथकाची निर्मिती केली. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे कार्यक्रम होऊ लागले होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. कथासंग्रह, कादबंर्‍या, कविता संग्रह, पोवाडे, नाटक, वगनाटये, प्रवास वर्णन यांचा त्यात समावेश आहे. अण्णा भाऊच्या साहित्यात समाजातील दबलेल्या, वंचित, श्रमिक, कामगार, हलाखीचे जीवन जगणार्‍यांच्या जीवनाचे चित्रण मिळते. त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा बंडखोर नायकही त्यांनी रंगवला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत संघर्ष करणार्‍या वीरांचेही त्यांनी आपल्या साहित्यात स्मरण केले आहे.
 
 
 
प्रथम मायभूच्या चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनि गातो
त्यांच्या कवणा॥
असा अभिनव प्रारंभ करीत असत.
 
 
अण्णा भाऊ बहुजन समाजातले कलावंत, कलाकार, साहित्यिक होते. जीवनाच्या विद्यापीठातून, घामाच्या संस्कारातून, कष्टांच्या काटयाकुट्यातून आणि मानवाच्या मोठेपणाच्या ध्यासातून त्यांच्यातील लेखक घडला व उदयाला आला. त्याच्या लेखनाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता.
 
 
ही अवनी आदिवाशांची
कोळी भिल्लाची,
मांग रामोशांची |
कैक जातींची प्राणाहून प्यार
परंपरा असे अपार ॥
असे स्मरण ते करीत .
संयुक्त महाराष्ट्राच्या अग्रभागी अमर शेख, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक कलापथक होते.
अण्णा भाऊंची कवणे, गीते जनमानसाला आकर्षित व प्रभावीत करणारी होती.
 
 
अमळनेरचे अमर हुतात्मे लाल नऊ तारे
रक्ता माजी विझले निखारे ते धगधगणारे
असे शब्दांच्या ज्वालेतून अन्यायाविरुद्ध आग ओकत होते.
अण्णा भाऊंना जनमानसाची नाडी कळली होती. त्यांची सुख-दुःखे, स्वप्ने, आकांक्षा, गरजा आणि निकड यांचा परिचय होता. त्यांचे प्रत्येक शब्द शोध व बोध घेणारे होते.
माणसाला माणूस खातं
तुटतं आणि लुटलं जातं
भडकून उठती आधी मधी
दंगेखोर होऊन कधी
आपसामधून करून गर्दी
मुडदे पडती.
अशा वास्तवाचा करारीपणा त्यांच्या साहित्यात होता. प्रतिभेचे असे अलौकिक लेणे अण्णाभाऊंना मुळातच लाभले होते.
अण्णाभाऊच्या कथा, काव्यामध्ये दलित, अन्यायी , स्त्री व तिचे शील, कामगार, श्रमिक, शेतकरी, पीडित यांना स्थान मिळाले आहे.
शाहिरी जीवन हा महाराष्ट्राला दिलेला अनमोल नजराणा अण्णाभाऊंनी सार्थकी लावला. त्यांची शाहिरी प्रतिभा जळैत्या निखार्‍यासारखी फुलत होती.
शाहिरानं जनमन सागरात सर्वत्र संचार करुन नव्हे तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन त्यात चाललेल्या भावनोद्रेकाचा आविष्कार लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त करायचा असतो.
अण्णा भाऊंच्या समग्र साहित्यात अन्यायाला वाचा फोडण्याचे सामर्थ्य आहे. माणसाविषयी त्यांच्या मनात
जिव्हाळा, कळवळा आहे.
‘तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या तळहातावर आहे याची जाणीव असू दे-’
हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दीनदलित, पीडित, श्रमिक, कामगार यांच्या तळहातावर तरली आहे, असे ते म्हणत.
अण्णा भाऊंची कवणे, गाणे , पोवाडे हे शृंगाराचे, कारुण्याचे नव्हे तर वीररसाचे होते. त्यांचा प्रत्येक शब्द, कवणे हे तात्पुरती मलमपटटी करणारे नव्हते तर अन्याय, अत्याचाराच्या विषारी मुळावर घाव घालणारी शस्त्रक्रियाच होते.
अण्णा भाऊंनी आयुष्यभर जीवनातल्या भेसूर, दाहक सत्याचा कधी बाजार मांडला नाही. उदध्वस्त मानवातून पराक्रमी, न्यायी व्यक्तिमत्त्व निर्माण झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील दीनदलित, पीडित, श्रमिक, सोशिक यांना स्वातंत्र्य मिळालं का ? असा सवाल अण्णा भाऊ करतात. आणि मग पहाडी आवाजात म्हणतात
ये आझादी झुटी है | देश की जनता भुकी है ॥
अण्णाभाऊंचे कार्य, त्यांचे शब्द म्हणजे कवी कल्पना नसून ह्रदयाला झालेल्या जखमा आहेत. अण्णाभाऊ आपल्या साहित्यात रक्ताने माखलेल्या माणसाच्या वेदना मांडतात. त्यांचे साहित्य म्हणजे विचारांनी लखलखणार्‍या खड्गाच्या पात्याचीच धार आहे.
त्यांचे पोवाडे वीररसपूर्ण असून वाक्ये, शब्द म्हणजे भरतीच्य लाटांचे, कोसळणार्‍या पावसाचे, उफाळणार्‍या ज्वाळांचे आणि मेघगर्जनेच्या तालावर तांडव करणार्‍या चंचल चपलेचे असत.
अण्णाभाऊ साठे ध्येयवादी साहित्यिक, जिददीने जीवनप्रवास करणारा व आयुष्यभर इमान राखणारा खरा साहित्यिक होता.
त्यांच्या जयंती व जन्मशताब्दीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
 
- भगीरथ हायस्कूल, जळगाव
९८२२२८७४५५