दोन कोरोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती

    दिनांक : 09-Jul-2020
Total Views |

civil_1  H x W:
 
जळगाव, ९ जुलै
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात दाखल असलेल्या दोघा कोरोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती झाली. दोघांनी दोन गोंडस बाळांना जन्म दिला असून बाळांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. सद्य:स्थितीत दोन्ही माता व बाळांची प्रकृती स्थिर आहे.
 
 
तांबापुरा येथील एका महिलेचा १ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बुधवारी दुपारी महिलेस तीव्र कळा जाणवू लागल्या. याबाबत स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने दाखल झाले. या महिलेची नॉर्मल प्रसूती केली. बाळाच्या मानेभोवती नाळेचे दोन वेढे होते, ते यशस्वीपणे काढले. बाळाला बालरोग तज्ज्ञाकडे दाखल करण्यात आले.
 
 
तर दुसरी महिला निमखेडी येथील असून ती ४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. गुरुवार, ९ रोजी दुपारी तिला तीव्र कळा जाणवायला लागल्या. बाळाचे वजनही जास्त होते. त्यामुळे महिलेचे सीझर करणे गरजेचे होते. तसा निर्णय डॉ. बनसोडे यांनी घेतला व ‘क्विक इन क्विक आउट’ या प्रणालीद्वारे यशस्वीपणे सीझर केले. या बाळाच्या मानेभोवतीही नाळेचे तीन वेढे होते, ते काढण्यात आले. बाळास बालरोग तज्ज्ञाकडे दाखल केले आहे. दोन्ही बाळांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.
 
 
दोन्ही कोरोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. बाळांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचारही सुरू आहेत. आमच्या टीमचे त्याबद्दल अभिनंदन.
- डॉ. संजय बनसोडे, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय