धुळ्याचे जिल्हाधिकारी पोहोचले शेतकर्‍यांच्या बांधावर

    दिनांक : 07-Jul-2020
Total Views |
 
 
शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांची कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त केली विचारपूस
 
 
धुळे : कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पीपीई कीट घालत जिल्हा रुग्णालय व श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुगणालयातील अलगीकरण कक्षात जावून या रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणारे जिल्हाधिकारी संजय यादव आज थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. एवढेच नव्हे, तर त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोटाव्हेटर चालविले. निमित्त होते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या होणार्‍या कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपाचे.
 
 

Dhule_Krushi_Saptah_1&nbs 
 
कृषी विभागातर्फे एक ते सात जुलै २०२० या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा आज समारोप झाला. यानिमित्त जिल्हाधिकारी यादव यांनी शिंदखेडा तालुक्यातील बाभळे, डाबली या भागात जावून तेथील शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
 
 
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र, धुळेचे प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, प्रा.डॉ. जगदीश काथेपुरी, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, मंडळ कृषी अधिकारी एन. एन. साबळे, बी. डी. देसले, लालन राजपूत, कृषी सहाय्यक कांतिलाल साळुंखे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यादव यांनी आदिवासी शेतकरी बांधवाच्या शेताला भेट दिली. त्यांनी कापूस पीक पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत कामगंध सापळे, बोंड अळी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
 
 
 
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्य शासन बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करावी. कृषी विभागाने शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. या भागात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बोंड अळी नियंत्रणासाठी व्यापक स्वरुपात मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. नांद्रे, तालुका कृषी अधिकारी श्री. बोरसे यांनी कामगंध सापळ्यांची सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी लोकप्रतिनिधी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.