राजकारण कलुषित करताहेत राहुल!

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
कॉंग्रेसचे माजी अपयशी अध्यक्ष राहुल गांधी चीनचे नागरिक आहेत की भारताचे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भारत-चीन सीमेवर ज्या प्रकारचा तणाव सध्या अनुभवास येत आहे, त्या पृष्ठभूमीवर राहुल गांधी यांच्याकडून येत असलेली वक्तव्ये लक्षात घेता, त्यांना स्वदेशापेक्षा चीनवरच जास्त भरवसा असल्याचे दिसते आहे.
 
 
rahul-gandhi_1  
 
कॉंग्रेसची नौका बुडवण्याचे काम त्यांनी आधीच सुरू केले आहे. कॉंग्रेसच्या नौकेत पाणी भरत असताना आणि ती बुडण्याची भीती असतानाही राहुल गांधी जागे व्हायला तयार नाहीत, हे त्या पक्षाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेच्या बाबतीत सरकार खोटे बोलत आहे, असे एकच रडगाणे गाताना राहुल गांधी दिसत आहेत. याआधीही त्यांच्याकडून अशी वक्तव्ये आली आहेत. त्यामुळे त्यांचा ना सरकारवर विश्वास आहे, ना भारतीय सेना दलांवर. केंद्रातल्या मोदी सरकारने फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी वेगवेगळे आरोप केले होते.
 
 
 
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची काय गत झाली होती, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वस्तुस्थिती काय आहे, याबाबत राहुल गांधी जे बोलत आहेत, तेच खरे आहे आणि त्यावरच देशवासीयांनी विश्वास ठेवला पाहिजे, हा त्यांचा खाक्या आहे. एकप्रकारे त्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. मी जे म्हणेल तेच सत्य, इतरांना काही समजत नाही, सरकार बेजबाबदार आहे आणि लष्कराची काही करण्याची क्षमताच नाही, हेच त्यांना सांगायचे असावे कदाचित. मी जे सांगतो आहे, तेच अंतिम सत्य आहे आणि तेच सत्य मानले पाहिजे, हा त्यांचा हेका देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही आणि का म्हणून राहुल गांधी यांचे म्हणणे सत्य मानायचे? राहुल गांधी स्वत:चे आणि पक्षाचे नुकसान तर करीतच आहेत, स्वत:ला हसण्याचा विषय बनवत आहेत. हे त्यांच्याही लक्षात येत नाही आणि त्यांच्या अवतीभवती फिरणार्‍या चौकडीच्याही लक्षात येत नाही, यावर विश्वास ठेवता येत नाही. भलेही माझे राजकीय भवितव्य संपुष्टात येईल, पण चीनच्या म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्यावर मी खोटे बोलत नाही, असे त्यांचे म्हणणे हे त्यांना आणि कॉंग्रेसला विनाशाकडेच घेऊन जाणारे आहे. राजस्थानात जे काही सुरू आहे, त्यालाही राहुल गांधींचे नेतृत्वच जबाबदार आहे. ज्या सचिन पायलटना कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले, त्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक िंजकून कॉंग्रेसची सत्ता आणली, त्याच पायलटना बाजूला सारत, आधी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गहलोत यांनाच मुख्यमंत्री बनविले. असे करून कॉंग्रेसने एका तरुण नेत्याचे खच्चीकरण केले आणि आता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या प्रयत्नात पक्ष स्वत:चेही खच्चीकरण करून घेत आहे.
 
 
 
भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा जो सौदा केला होता, त्या वेळी राहुल गांधी यांनी केलेले बेछूट आरोप देश विसरलेला नाही. कसे विसरणार? संसदेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात सरकारविरुद्ध बोलण्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अधिकारच आहे. विशेषत: शत्रुराष्ट्राकडून बाह्य सुरक्षेला धोका निर्माण झाला असताना, राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याने अतिशय सांभाळून बोलण्याची गरज असते. चीनने भारतीय सीमेवर सैन्य जमवले असताना, शस्त्रास्त्रे तैनात केली असताना राहुल गांधींसारख्या नेत्यांनी अतिशय जबाबदारीने बोलायला हवे. राष्ट्रहित नजरेआड करून राहुल गांधी चीनला पोषक वक्तव्ये करणार असतील, तर ईश्वरही त्यांचे भवितव्य सावरू शकणार नाही. राफेल विमान खरेदीच्या मुद्यावर तर राहुल गांधी ठरवून खोटे बोलत होते, निवडून निवडून खोटे बोलत होते.
 
 
 
असे करून त्यांनी काय साध्य केले, हे संपूर्ण देश पाहतोय्‌. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरही त्यांनी सांभाळून बोलू नये, हा केवळ कुयोग आहे! राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली आहे, ती तर त्यांच्या पक्षातील अनेकांना मान्य नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. पण, उघडपणे त्यांच्याविरोधात कुणी कधी बोलण्याचे धाडस करीत नाही. ही बाबही त्यांच्या लक्षात येत नसल्याने वा ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने, सातत्याने सरकारविरोधात बोलताना राष्ट्रहित दृष्टिआड करीत आहेत. आजही कॉंग्रेस पक्षावर गांधी घराण्याचे गारूड आहे. त्यातून बाहेर पडायला जुनेजाणते नेतेही तयार नाहीत. राहुल गांधी यांनाही कसली िंचता सतावते आहे, असेही दिसत नाही.
 
 
 
गांधी घराण्याची दादागिरी सहन करून जुनेजाणते नेते स्वत:सोबतच देशातील सर्वात जुन्या कॉंग्रेस पक्षालाही अधोगतीकडे नेत आहेत, याचेही आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे. राहुल गांधी सातत्याने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची करता येईल तेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न करताना भाषेची मर्यादाही त्यांनी ओलांडली आहे. आपण देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतो आहोत, त्यांचा अपमान करतो आहोत, अभद्र भाषेचा प्रयोग करतो आहोत, याचेही भान त्यांनी जाणीवपूर्वक सोडलेले दिसते. एखादा नेता जेव्हा जमिनीशी जुडलेले नाते तोडतो वा त्याच्या ठायी प्रचंड अहंकार भरला जातो, तेव्हाच तो सगळ्या मर्यादा तोडून, ओलांडून बेभान बोलायला लागतो. नेमके राहुल गांधी यांच्या बाबतीत हेच झाल्याचे दुर्दैवाने अनुभवास येत आहे.
 
 
 
राहुल गांधी यांना बालिशबुद्धीचा नेता संबोधले जाते, ते याच कारणामुळे. अनेकदा ते काय बोलतात, हेच कुणाला कळत नाही. मागे, डॉ. मनमोहनिंसग पंतप्रधान असताना त्यांनी एक अध्यादेश सार्वजनिक ठिकाणी फाडून फेकला होता. आपल्याच पक्षाच्या सरकारचे प्रमुख अध्यादेश काढतात आणि आपण तो फाडून फेकतो आहोत, याचेही भान त्यांना त्या वेळी राहिले नव्हते. आताही त्यांना कसलेच भान असल्याचे दिसत नाही. आपल्या बोलण्याला लोक हसतील, आपल्या कृतीने पक्षाचे नुकसान होईल, राष्ट्रहिताला बाधा पोहोचेल, याची जराही तमा न बाळगता ते बोलत असतात. राहुल गांधी हे केवळ सार्वजनिक चर्चेचा दर्जाच घसरवत आहेत असे नव्हे, तर देशातील राजकीय वातावरणही दूषित करीत आहेत.
 
 
 
लडाखला लागून जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, तिथे काय समस्या निर्माण झाली आहे, समस्या किती जटिल झाली आहे, हे जाणून घ्यायलाच ते तयार नाहीत. कालपर्यंत त्यांनी जे व्हिडीओ जारी केलेत ना, त्यावरूनच ही बाब स्पष्ट होते. मूळ समस्या काय आहे, त्यावर उपाय काय आहे, सरकार आणि लष्कर काय करत आहे, हे जाणून घेण्याची तयारी न ठेवता ते सरकारवर एकतर्फी वार करीत आहेत. यातून त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे, याचेही दर्शन घडते. राष्ट्रीय संकटाच्या घडीला सरकार आणि सेनादल यांच्यासोबत राहण्यातच देशहित जोपासले जाते, याचे भान त्यांना राहू नये, याचेही आश्चर्य आता वाटत नाही. कारण, लोकांनी त्यांना बालिशबुद्धीचे नेते म्हणून स्वीकारले आहे.
 
 
 
भारत सरकार एकामागोमाग कसे चीनला नामोहरम करणारी पावलं टाकत आहे आणि जगातले सगळे प्रमुख देश भारताला साथ देत आहेत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा दिसत नाही. त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरण्याचे आणि राष्ट्रहित दुर्लक्षित करण्याचे एककल्ली काम हाती घेतले आहे. चीनचे जे काही इरादे आहेत, ते लक्षात घेत राहुल गांधी मोदी सरकारवर एकामागोमाग हल्ले करीत आहेत. पण, चिनी कम्युनिस्ट पार्टीशी कॉंग्रेस पक्षाने काय समझोता केला होता, हे सांगायला ते तयार नाहीत, ही विडंबनाच नाही का? राजीव गांधी फाऊंडेशनने कम्युनिस्ट चीनकडून वर्गणी का घेतली होती, हे सांगायलाही ते तयार नाहीत. घेतलेल्या वर्गणीमुळे झालेले उपकार फेडण्यासाठी तर ते मोदी सरकार आणि पर्यायाने देशाच्या विरोधात चीनची तळी उचलत नाहीयेत? काही समजायला मार्ग नाही. जे काही समजते आहे, त्यावरून एक स्पष्ट आहे की, कॉंग्रेसमुक्त भारताचे आधीचे गांधीजींचे आणि आता मोदींचे स्वप्न राहुल गांधीच पूर्ण करतील!