कोरोना प्रतिबंधक 21 औषधे सापडली

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
शास्त्रज्ञांचे मोठे यश
 
 
नवी दिल्ली : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या सगळ्या शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांना एक मोठे यश मिळाले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखू शकणारी सुमारे 21 औषधे शास्त्रज्ञांना सापडली आहेत. ही औषधे कोरोना विषाणूचे एकमेकांमध्ये होणारे संक्रमण रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहॅम प्रीबिस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.
 
 
 
Corona-inhibitors_1 
 
शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोना विषाणूच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना विषाणूची प्रतिकृती रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी औषधांचे विश्लेषण केले. प्रयोगशाळेतील चाचणीत अँटिव्हायरल ॲक्टिव्हिटी असलेले 100 रेणू (मॉलिक्युल्स) आढळले. हे अध्ययन नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
 
 
 
प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार यातील 21 औषधे विषाणूंच्या पुनरुत्पादनास प्रतिबंध करतात आणि ही औषधे रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. यापैकी चार संयुक्त (कंपाऊंड) रेमडेसिव्हिरसोबत एकत्रित करून कोरोनाचा उपचार केला जाऊ शकतो.
 
 
रोगप्रतिकारशक्ती कार्यक्रमाचे संचालक सुमित चंदा यांनी सांगितले की, रेमेडिसिव्हिर औषध रुग्णालयात रुग्णांचा बरे होण्याचा कालावधी कमी करण्यास सक्षम आहे. मात्र, हे औषध सर्व लोकांवर समान परिणाम दाखवत नाही. अद्यापही स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध होणारी औषधे आहेत जी रेमेडिसिव्हिरसारखी काम करू शकतात, असेही चंदा यांनी सांगितले.
या अध्ययनात वैज्ञानिकांनी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या बायोप्सिसवरील औषधांच्या परिणामाची देखील तपासणी केली. या व्यतिरिक्त, रेमेडिसिव्हिरसह इतर औषधांचे मूल्यांकन देखील तपासण्यात आले. या 21 औषधांपैकी कोरोनाची प्रतिकृती होण्यापासून रोखणारी 13 औषधे क्लिनिकल चाचणीत आहेत, असेही शास्त्रज्ञांना आढळले व कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास ती प्रभावी आहेत, हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यापैकी एस्टेमिझोल आणि क्लोफाझॅमिन या दोन औषधांना यापूर्वीच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. तर आपात्कालीन परिस्थितीत रेमेडिसिव्हिर वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.