लाभार्थ्यांना मिळालेल्या भाकडबकर्‍यांवरून जि.प.ची सभा गाजली

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |

zp_1  H x W: 0  
 
जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी सर्वसाधारण सभेत
पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांना धरले धारेवर
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना पशुसंवदन विभागाकडून उस्मानाबादी शेळ्याऐवजी अमळनेरच्या भाकड बकर्‍या देण्यात आल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांना याप्रकरणी धारेवर धरले. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी त्यांच्या या प्रश्‍नावर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी याबाबत चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील रासायनिक खताच्या उपलब्धतेबाबत सदस्य सभेत आक्रमक झाले. जि.प.च्या या सभेत सदस्यांनी ऑनलाईन प्रश्‍न मांडले.
 
रासायनिक खतांचा तुटवडा जिल्ह्यात असल्याचे भाजपच्या सदस्यांनी सांगितले. कृषी अधिकार्‍यांनी चाळीसगावचे ४ खतांचे रॅक दुसरीकडे वळविण्यात आले अशी यावेळी माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह जळगावात सुरू आहे. याठिकाणी कार्यरत अधीक्षक व कर्मचारी यांना १४ महिन्यांपासून मानधन उपलब्ध नसल्याचा मुद्दा नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. त्याबाबत अतिरिक्त सीईओ गायकवाड यांनी स्पष्ट केले की, चौकशी करून संबंधित कर्मचार्‍यांचे मानधन कसे निघेल याविषयी त्वरीत व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. रासायनिक खतांचा भुसावळात तुटवडा असल्याचे पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला. जि.प.सदस्य पोपटतात्या भोळे यांनीही चाळीसगाव तालुक्यातील खताचा तुटवडा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत कृषी अधिकारी वैभव शिंदे म्हणाले की, चाळीसगाव येथील खतांचे रॅक मालधक्क्यावरील कर्मचारी कोरोना सकारात्मक निघाल्याने ते दुसरीकडे वळविण्यात आल्याचे सांगितले.
ऑनलाईन सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी चर्चा झाली. यात ८ कोटी ६१ लाख रुपये सर्व सदस्यांना गटनिहाय समान वाटप करण्याच्या विषयावर चर्चा झाली. अमळनेर येथील गटविकास अधिकारी यांना वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे कार्यमुक्त करावे अशी मागणी मधुकर काटे, नंदकिशोर महाजन यांनी केली. तशी बदली करण्याचे प्रावधान नाही असे सीईओंनी सांगितले.
ऑनलाईन सभा झाल्याने सदस्य, अधिकारी सभेत उपस्थित होते. यावेळी मात्र अनेकवेळा तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच अनेक सदस्य महत्वाच्या विषयांवेळी हाताळणी माहीत नसल्याने तांत्रिक कारणाने सभेतून बाहेर पडत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन गुगल मिट ऍपच्या माध्यमातून जि.प.ची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला माळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड, उपमुख्य सीईओ कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.
सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता
सभेच्या ठरावाविरोधात मॅटमध्ये
सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्याविषयी दोनवेळा ठराव मंजूर असूनही त्यांना आता कामावर हजर करू नये अशी मागणी सदस्य नानाभाऊ महाजन, नंदकिशोर महाजन, अरुणाताई पाटील यांनी केली. तसेच संबंधित कार्यकारी अभियंता हे मॅट न्यायालयात गेल्याचे सदस्यांनी यावेळी सांगितले. याबाबत आदेश प्राप्त आहे काय? असा प्रश्‍न सीईओ डॉ.पाटील यांना केला. त्यावर, अद्याप आदेश प्राप्त नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.