तो तुझा प्रवेश संपला...

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |
हे जग एक रंगभूमी आहे आणि आपण सारे त्यावरचे काम करणारे नट आहोत. आमची भूमिका संपली की, आम्हाला एक्झिट घ्यावीच लागते. प्रख्यात नाटककार शेक्सपिअर यांचं हे तितकंच माहिती असलेलं वाक्य आहे. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटात हे वाक्य थोडं फिल्मी करून वापरलं होतं- ‘‘कौन, कब और कैसे मरेगा... कोई नही जानता!’’ नटाने त्याचा प्रवेश संपला की रंग पुसून बाजूला व्हायचे असते. आता कोरोनामुळे सार्‍या जगाला प्रत्येक वेळ मृत्यूचीच िंचतने सुचत आहेत. मृत्यूच्या विचारछायेत सगळेच वावरत असतानाच्या काळात काळजी घेणे, सावधता ठेवणे यापलीकडे अद्याप तरी कुणाच्याच हातात काहीही नाही. कोरोना विषाणू नेमक्या काय स्वभावाचा आहे, हेही अद्याप जगाला कळलेले नाही. तो कुठल्या हवामानात क्षीण असतो आणि वातावरण कसे असले की जोर पकडतो, हेही काही अनुभवांतीही हाती लागलेले नाही. त्यावर औषधही सापडलेले नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे यापलीकडे सध्यातरी फारसे हातात नाही. अंदाजपंचे दाहो दरसे, या पद्धतीनेच सध्या औषधोपचार केले जात आहेत. या आधी जगाने ज्या म्हणून विषाणूंचा सामना केला त्यांचाही स्वभाव असाच अनप्रेडिक्टेबल होता. याचा जरा जास्तच आहे. त्यामुळे आता सगळेच कसे चाचण्या आणि अनुभव या आधारावरच ठरविले जाते आहे. कोरोना नेमका कुणाला होतो आणि कसा होतो, हे कळत नाही. संपर्कातूनच होऊ शकतो म्हणून आतावर आम्ही संपर्क टाळत राहिलो आहोत. आताही तेच करतो आहोत. त्यामुळे आमची अर्थघडी विस्कळीत झालेली आहे. जगायचे असेल तर चार पुरुषार्थांसहच जगावे लागणार. त्यात मोक्ष हा अखेरचा. त्यामुळे आधीचे तीन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यात अर्थ तर व्यवहारी जीवन व्यापून उरलेला पैलू. जगण्याची धडपड ही मरण्याच्या पावलांपेक्षा जास्त तीव्र असते. त्यामुळे आता जगण्याची धडपड सुरू झालेली आहे. कोरोनाचे काय करायचे पाहू; पण आधी व्यवहार करायला हवेत, म्हणून आता जग रस्त्यावर उतरू लागले आहे. त्यासाठी उतावीळ आहे.
 
 

Drama_Mime_1  H 
 
जगायचे असेल तर अखेरची म्हणा, पण मनोरंजन ही गरज आहे. टाळेबंदीच्या काळात या मनोरंजनानेच जगवले आहे. आम्ही एकमेकांचे मनोरंजन केले. कविता, गाणी ऐकविली, कथा सांगितल्या, नृत्यं केलीत, अभिनय केला... हे सगळेच आम्ही आमच्या साहित्यातून आणि चित्रपट-नाटकांमधून उचललेले. काही आम्हाला हवे ते चित्रपटही या काळात अनेकांनी पाहिले. जुन्या मालिका नव्याने दाखविल्या गेल्या. आता पुन्हा चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. अर्थात, काही अटी घातल्या आहेत. आधी म्हटल्यानुसार, कोरोनाची लागण कशी होऊ शकते, याचा अनुभव आणि तोकडा अभ्यास यावरून काळजी काय घ्यायची, हे ठरविले गेले आहे. त्यामुळे साधारण 10 वर्षे वयापर्यंतची मुले आणि 60-65 वर्षे वयानंतरची ज्येष्ठ मंडळी यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो, असे निष्कर्ष आहेत. त्यामुळे आता चित्रीकरणासाठी 65 वर्षांच्या वर वय असलेल्या अभिनेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. चित्रीकरणाला परवानगी देताना काही अटी घातल्या होत्या. निर्माता संघाने, त्यातील काही अव्यवहार्य वाटलेल्या अटींचा पुनर्विचार करा, अशी विनंती सरकारला केली. त्यानुसार काही मवाळ धोरण स्वीकारले गेले, मात्र 65 वर्षांच्या नटांना प्रतिबंध ही अट काही कमी केली नाही. त्यावर प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांच्या शैलीतली तिरकस प्रतिक्रिया दिली आहे- ‘‘तर मग 65 वर्षांच्या वरच्या राजकारण्यांनीही निवृत्ती घ्यावी,’’ असे ते म्हणाले.
 
 
त्यांच्या विधानामागच्या भावना समजून घेतल्या, तरीही तर्क आणि बुद्धीच्या पातळीवर त्याचे समर्थन करता येत नाही. त्याचा परामर्श घेऊ या; पण त्यासाठी हिंदी मालिका आणि चित्रपटातील बर्‍यापैकी रुळलेले नाव प्रमोद पांडे या अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. त्यांचे म्हणणे हेच की, हे म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणेच झाले.
 
 
ही याचिका आणि कलावंतांचे हक्क हा विषय आहेच. आधी विक्रम गोखले यांच्या त्र्याग्याबद्दल... राजकारण्यांवर उगाच राग काढण्यात काही अर्थ नाही. एकतर शासन आणि प्रशासनाला आपत्तीच्या काळात निर्णय घेण्याचा अधिकार असतोच. सत्तेचा सोपान राजकारणाच्या मार्गानेच चढावा लागतो, हे खरे आहे. पण सत्ताधारी म्हणजे केवळ राजकारणी उरत नाहीत. त्यात ज्येष्ठ नेते हे पुरेशी काळजी घेऊनच आपले काम करत आहेत. या काळात काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे, तो त्यांचा व्यवसाय नाही. आदेश केवळ या काळापुरताच आहे. कुठल्याच कलावंताला वयाच्या पात्रतेनुसार निवृत्ती घेण्याचा तो आदेश नाही. या काळापुरतेच त्यांना चित्रीकरणापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ राजकारणी नेतेही आहे तिथूनच त्यांचे काम करत आहेत. आभासी पद्धतीनेच काम करत आहेत. जनतेशी संवादही आभासी पद्धतीनेच करत आहेत. त्यात कुठेही नियम मोडत नाहीत. असे असताना विक्रम गोखले यांच्यासारख्या विचारी अभिनेत्याने असला त्रागा व्यक्त करावा, हे आश्चर्यकारकच आहे. राहिले ते प्रमोद पांडे यांच्या याचिकेच्या संदर्भात, त्यात एखाद्या व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय नियमांच्या चौकटीत राहून करण्याचा सार्वकालिक अधिकार आहेच. एकुणातच 65 वर्षांच्या वरील ज्येष्ठांची या काळात विशेष काळजी घ्या, असे सांगण्यात आले आहे. तो वैद्यकीय सल्ला आहे. चित्रपट किंवा मालिकांचे चित्रीकरण करताना अनेक दृश्यांत भौतिक दूरता पाळली जाऊ शकत नाही. अशा वेळी ज्येष्ठांना जास्त धोका असू शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे मात्र नक्की की, मधल्या काळात इतर व्यवसायांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रालाही फटका बसला आहेच. अनेक चित्रपट आणि मालिकांची चित्रीकरणे अर्ध्यातच थांबवावी लागली आहेत. त्यात ज्येष्ठ कलावंतांच्या भूमिका आहेत. ही चित्रीकरणे आता नव्याने सुरू करायची झाल्यास कन्टिन्युटीचा विचार केल्यास, ज्येष्ठ कलावंतांना चित्रीकरणाला परवानगी द्यायलाच हवी. ती दिली नाही तर नव्या कलावंतांसह आधी झालेले चित्रीकरण पुन्हा करण्याचा तोट्याचा निर्णय निर्मात्यांना घ्यावा लागेल. प्रमोद पांडे म्हणतात तसे, आता ज्येष्ठांच्या भूमिका कमी वयाच्या कलावंतांना दिल्या जातील आणि त्यात मग ज्येष्ठ कलावंतांच्या वाट्याला बेरोजगारी येईल. तरुण कलावंत मेकअप करून जसा म्हातारा दिसू शकतो तसेच ज्येष्ठ कलावंत मेकअपने तरुणही दिसू शकतात. दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत याचे जिवंत उदाहरण आहेत. देवानंदपासून अशी अनेक उदाहरणे देता येतील. शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करत असताना वयाची अट निवृत्तीसाठी असू शकते. अनेक नोकरदारांना निवृत्तीनंतरही काम दिले जातेच. कोरोना काळात मधुमेही, रक्तदाबाचा त्रास असणार्‍या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली होतीच. मात्र सार्वजनिक जीवनात, तुमच्या अंगात रग आहे आणि तुम्हाला मागणी आहे तोवर काम करत राहता येते. त्याला काही वयाचे बंधन नाही. आपत्तीच्या काळात मात्र काही नियम/बंधने पाळावीच लागतात. कलावंतांच्या बाबत वेगळा निर्णय घ्यावा का, हा सांस्कृतिक निकष असू शकतो. चित्रीकरणाचे सगळे नियम पाळून एखादा कलावंत काम करत असेल आणि त्याची त्या कथानकाला संहितात्मक गरज असेल, तर त्याला तशी परवानगी द्यायला हवी, असे वाटते. काम करण्याची क्षमता आणि ऊर्जा आहे, मागणीही आहे, तर केवळ ज्येष्ठतेच्या नावावर त्यांना घरी बसविणे ही कलात्मक चूक असू शकते... प्रमोद पांडे यांना, अनेक ज्येष्ठ कलावंतांनी याचिका दाखल केल्यावर पािंठबा दिल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे. याचिका न्यायालयाच्या निर्णयाधीन असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. तसेही कुठल्याही सृजनाला त्याचे सृजनाचे काम आणि क्षमता संपल्यावर नैसर्गिक थांबा येतच असतो. एका नेमक्या वेळी नियतीच त्याला सांगत असते- ‘‘तो तुझा प्रवेश संपला, रंग तेवढे पुसून जा...!’’