१०० हून अधिक टीव्ही चॅनेल्स् वर येणार ‘संक्रांत’!

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |
‘ट्राय’च्या नव्या आदेशाने टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स कंपन्या येणार संकटात?
 
मुंबई : ट्रायने (Telecom Regulatory ­Authority of India) आता सुधारित दर एनटीओ २.० लागू करण्याच्या हालचाली सुरु केल्यामुळे देशातील १०० ते १५० दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीव्ही ब्रॉडकास्टर कंपन्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्यात भवितव्याविषयी भीती व्यक्त केली जात आहे. टीव्ही चॅनेल्स् बंद झाल्यास त्यावर उपजिवीका अवलंबून असणार्‍यांवर हे मोठे संकट ठरेल.
 
 
TRAI_1  H x W:
.
केंद्र सरकारने सुधारित दराचा आदेश यावर्षी १ जानेवारी रोजी जाहीर केला होता. परंतु देशातील आघाडीच्या टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स, आयबीएफ (इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन) आणि फिल्म ऍण्ड टीव्ही प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया यांनी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, ब्रॉडकास्टर्सच्या आव्हानाला कोर्टाने कोणताही दिलासा न देता निर्णय राखून ठेवला आहे.
 
 
त्यानंतर २४ जुलैला ट्रायने ब्रॉडकास्टर्सना एनटीओ २.० च्या तरतुदीनुसार संदर्भ इंटरकनेक्ट ऑफरमध्ये फेरबदल करण्यास आणि त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यास सांगितले आहे. दरम्यान, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंडिया ब्रॉडकास्टर फाउंडेशनला आश्वासन दिले की, एनटीओ २.० इतक्यातच लागू करण्यात येणार नाही.
 
 
ट्रायने एनटीओ २.० अंतर्गत चॅनेलसाठी मासिक शुल्क १२ रुपये निश्चित केले आहे. चॅनेलच्या ग्रुपमध्ये देण्यात येणारी सवलतदेखील ३३ टक्क्यांपर्यंत मर्यादित केली आहे. ज्या चॅनेल जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाहीत त्यांचे मूल्यांकन होणार नाही. ते चॅनेल कोणत्याही समुहात जोडले जाणार नाही तसेच त्यांना जाहिरातीही मिळणार नाहीत. केवळ प्रेक्षकांकडून मिळणार्‍या मोबदल्याच्या उत्पन्नावर कोणतेही चॅनेल फार काळ चालू शकत नाही. त्यामुळे अशा १०० हून अधिक चॅनेल्स् या कायद्यामुळे येत्या काही वर्षात बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे ब्रॉडकास्टिंग उद्योगाचे नेते उदय शंकर म्हणाले.
 
ट्रायचा सुधारित दर लागू झाल्यास चॅनेलला स्पर्धेत टिकून राहणे कठीण होईल. त्याचा परिणाम केवळ इंग्रजी वाहिन्यांवरच होणार नाही तर क्षेत्रीय वाहिन्यांच्या उत्पनावरही होईल आणि त्यात त्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याचा धोका आहे.