पेट्रोल, डिझेल, सीएनजीला पर्याय ‘एचसीएनजी’

    दिनांक : 26-Jul-2020
Total Views |
 
 
केंद्रीय मोटार वाहन कायद्यात होणार सुधारणा
 
 
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीला भविष्यातील पर्याय आणि त्यांच्या दरात सातत्याने होणारे चढउतार लक्षात घेता, हायड्रोजन सीएनजीच्या वापराबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत असून रस्ते आणि वाहतूक विभागाद्वारे एक आराखडा तयार करण्यात आला आहे.
 
 

HCNG_1  H x W:  
 
दिवसेंदिवस वाहनांमध्ये वापरण्यात येणार्‍या इंधनामुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या आणि केंद्र सरकार यांच्यात भविष्यातील विचार करून रणनिती ठरवली जात आहे. एचसीएनजी इंधनाचा वापर सर्वांत व्यवहार्य मानण्यात येतो. विशेषत: देशातील मोठ्या शहरांमध्ये ही योजना आखली गेली आहे. आराखड्यात ऑटोमोबाईल इंधन म्हणून हायड्रोजन सीएनजीचा समावेश करण्याबाबत सूचना मागविण्यात आल्या असून केंद्रीय मोटार वाहन कायदा १९७९ मध्ये याबाबत सुधारणा करण्यात येणार आहे.
 
एचसीएनजी काय आहे?
एचसीएनजी हे कंप्रेस्ड नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजनचे मिश्रण आहे. एचसीएनजी कंपोजिशन फिगरबद्दल बोलायचे झाल्यास, १८ टक्के हायड्रोजनचे या इंधनात मिश्रण असते. हे इंजिन ऑप्टिमायझेशननंतर, हेवी ड्युटी सीएनजी वाहनात सहज वापरले जाऊ शकते. दरम्यान, सुरुवातीच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), मिथेन आणि एकूण हायड्रोकार्बन (टीएचसी) उत्सर्जन एचसीएनजीचा वापर कमी करू शकते. सीएनजीपेक्षा इंधन वापराच्या बाबतीत एचसीएनजी चांगले आहे.
 
 
एचसीएनजीचा फायदा म्हणजे ते सहजपणे सीएनजी पाइपलाईन आणि बस डेपोमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. दिल्लीत एचसीएनजीच्या किटसह रेट्रोफिटेड ५० बसमध्ये प्रारंभिक पायलट चाचणी होणार आहे. दिल्लीची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड यासाठी केली कारण, याठिकाणी सीएनजी बस, पंप आणि सीएनजी इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे जाळे आहे. एचसीएनजीकरीता मंत्रालयाने मसुदा जनतेच्या सूचनांसाठी खुला केला आहे. नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत ईमेल किंवा पोस्टमार्गे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांकडे (एमव्हीएल) टिप्पण्या आणि मते पाठविले जाऊ शकतात.