चोरीच्या घटना थांबविण्यासाठीसाईनगरवासीयांचे गस्ती पथक

    दिनांक : 24-Jul-2020
Total Views |
 
 
 
पहूर ता .जामनेर : पहूर येथील साईनगरात स्थानीक रहीवाश्यांच्या गस्ती पथकामुळे चोर्‍यांच्या घटनांना लगाम लागला असून पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक रहीवाशी आपल्या भागाचे आळी - पाळीने रक्षण करण्यासाठी सज्ज झाले आहेत .
पहूर येथील साईनगरमध्ये बहूतांश व्यापारी व सधन लोकांची वस्ती आहे. त्यामुळे अधूनमधून भूरट्या चोर्‍यांचा त्रास या वस्तीत सुरूच होता . तथापी एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस व नेपाली गोरखा अबिर बहादूर खत्री यांची रात्रीची गस्त असूनही त्यांच्या येण्याची वेळ टाळून भुरटे चोर संधी साधून घेत असत.
 
अन् स्थानिक रहीवाश्यांनीच घेतला पुढाकार
या सगळ्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी साईनगर वासियांनी एक महिन्यापासून एकत्र येत आळीपाळीने स्वत: गस्त घालण्याचा निर्णय घेतला . अगदी पाऊस असला तरीसुद्धा दररोज रात्री १२ ते सकाळी ४ वाजेपर्यंत ३ जणांची गस्त सुरू असते.त्यांच्या जोडीला रात्री २/३ वेळा पोलिस , होमगार्ड, गोरखा सर्व परिसरावर लक्ष ठेवून असतात. रात्रीची सर्व अपडेट्स वेळोवेळी फोटोसह व्हॉट्स ऍप गृप वर टाकली जाते. सर्व घरांचे मागे - पुढे मोठे लाईट रात्रभर सूरू असतात. दिवसा साईनगर मध्ये येणार्‍या फेरीवाल्यांचाही फोटो आयडी ( ओळखपत्र ) सह माहीती घेऊन गृपवर पाठविली जाते. ओळखपत्र व मास्क नसेल तर सदर फेरीवाल्यास परत पाठविले जाते. या उपक्रमात साईनगरमधील नागरिकांनी आनंदाने महिन्यातून २ दिवस गस्त घालून एक स्तूत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे या भागातील चोर्‍यांचा सुळसुळाट थांबला असून निश्चिंत झोप घेऊ लागले आहे. आपल्या स्वतः च्या सुरक्षा, रक्षणासाठी स्वतः पुढाकार घेणार्‍या साईनगरवासियांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
 
 
पहूर येथील साईनगर भागात लहान -मोठ्या चोर्‍या व्हायच्या. आता मात्र स्थानिक रहिवाश्यांच्या जागरूकतेमुळे त्यावर आळा बसला असून आमचीही रात्रीची गस्त सुरुच आहे. जनता आणि पोलीस एकत्र आले तर गुन्हेगारी नियंत्रित होऊ शकते याचा वस्तुपाठच साईनगरवासीयांनी घालून दिला.
- राकेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ,
पहूर , ता . जामनेर .