पाण्याच्या तक्रारीमुळे उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाणी पुरवठा सभापतींकडून पाहणी

    दिनांक : 24-Jul-2020
Total Views |
स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत स्वतः पाण्याची चव घेत केली तपासणी
 
watter_1  H x W
 
जळगाव, २४ जुलै
शहरात अनेक ठिकाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शिवसेनाकडून करण्यात आली होती. गुरुवारी मनपा पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांची तर शुक्रवारी स्थायी समिती सभापतींसह उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
 
 
शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेनेकडून करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत गुरुवारी पाणी पुरवठा सभापती अमित काळे यांनी शहरातील विविध जलकुंभाची पाहणी केली होती. शहरातील जलकुंभ काही दिवसांपूर्वीच स्वच्छ करण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शहराला उमाळे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होत असल्याने शुक्रवारी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा व पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी पाहणी केली.  यावेळी नगरसेविका दिपमाला काळे, मिनाक्षी पाटील, शहर अभियंता सुनील खडके, शाम भांडारकर आदी उपस्थित होते.
 
दूषित पाणीपुरवठ्याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
उमाळे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी स्वच्छतेची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडली जात आहे. शहरवासियांना मिळणारे पाणी शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी पाणी पुरवठा सभापती अमित काळे यांनी स्वतः त्याठिकाणी पाणी प्राशन केले. पाण्यात कोणतीही घाण नव्हती किंवा त्याला दुर्गंधी येत नसल्याचे त्यांनी अनुभवले. शहरात एखाद्या ठिकाणी पाईपलाईनला गळती लागलेली असल्यास दूषित पाणीपुरवठा होतो. जर कुणाला दूषित पाणीपुरवठा होत असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी केले आहे.