अविश्वसनीय ड्रॅगन!

    दिनांक : 24-Jul-2020
Total Views |


गलवान खोऱ्यातून सैन्य माघारी घेऊन चीनने भारतापुढे गुडघे टेकले, असा निष्कर्ष काढण्याची शाई वाळते वाळते तोच चीनने सीमेवर ४० हजार सैनिक तैनात करून भारताविरुद्ध पुन्हा एकदा षड्डू ठोकले आहेत. गलवान प्रकरणात भारताने मुत्सद्दीक पातळीवरही यश मिळविले होते. एकीकडे आपल्या सैनिकांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजविले आणि दुसरीकडे भारतीय मुत्सद्यांनी चर्चेच्या टेबलावर योग्य भूमिका मांडल्याने चीनला रक्तरंजित संघर्षानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करायची तयारी दर्शवावी लागली होती. पण, चीन कुठल्याही भूमिकेबाबत प्रामाणिक नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. शेजारी देशांच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याची त्याची जुनी सवय आहे. विस्तारवादाची तर या देशाला चटकच लागली आहे. तैवान, हाँगकाँग, तिबेट, गलवान, नेपाळ, भूतान येथील त्याच्या विस्तारवादाचे चटके त्या त्या देशांच्या प्रशासनाला आणि नागरिकांनाही बसले आहेत.

 

Agralekh-Dragan_1 &n 
 

अरुणाचल प्रदेशही त्याला अपवाद नाही. काहीही करून आपली अधिसत्ता विस्तारित करण्याच्या चीनच्या धोरणामुळे हाँगकाँगवासी त्रस्त आहेत. नागरिक अधिकारांचे हनन करणारे चिनी कायदे मोडून काढण्यासाठी हाँगकाँगमध्ये सातत्याने लोक रस्त्यांवर उतरताना दिसत आहेत. आताही गलवान खोऱ्यातून एकदा माघार घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर पुन्हा चीनने सीमेवर सैन्यतैनाती केली असून, एकीकडे सैन्य हटविल्याचा आभास निर्माण केला आणि फिंगर-, हॉट स्प्रिंग आणि गाग्रा भागातही सैनिक कायम ठेवले आहेत. या परिसरात भारत आपल्या तुकड्या तैनात करण्याची शक्यता वाटल्यानेच त्यांनी पूर्णतः घरवापसी केलेली नाही. ड्रॅगनची हीच अप्रामाणिकता भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार चर्चेसाठी तयारी दर्शवायची, चर्चा करायची, काही अटी मान्य करण्याची आश्वासने द्यायची आणि काही दिवसातच दिलेल्या शब्दांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, असे ड्रॅगनचे विश्वासघातकी राजकारण सुरू असते.

या ना त्या कारणाने चीन सातत्याने भारताला घाबरविण्याचा प्रयत्न करीत असतो. कधी घुसखोरी करून, कधी शेजारच्या देशांना आर्थिक मदत करून, कधी पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देऊन, तर कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या संधी हिरावून तो आपला मुखभंग करण्याची एकही संधी सोडत नाही. पण, भारताने आता चीनविरोधात एक चांगली आघाडी उभारण्याचे प्रयत्न चालविले असून, त्याला यश येतानाही दिसत आहे. भारताच्या याच ताकदीची कल्पना येऊ लागल्याने, भारताला रोखण्यासाठी चीन आता निरनिराळ्या नव्या योजना आखू पाहात आहे. सीमेवरील हजारो सैनिकांची तैनाती, हा त्याच धोरणाचा एक भाग समजायला हरकत नाही.

चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या विषाणूने ज्या वेळी जगाला कवेत घेणे सुरू केले, त्याच वेळी हा दुसरातिसरा कुठलाही प्रकार नसून जैविक हल्ल्याचाच एक भाग असल्याची जगाला खात्री झाली होती. त्यामुळे ज्या वेळी एकापाठोपाठ एक अशी साऱ्या देशांमध्ये कोरोनाची लागण वाढत गेली आणि त्यानंतर मृत्युसंख्याही वाढत गेली, त्या वेळी सारे जग चीनविरोधात एकवटू लागल्याचे चित्र दिसू लागले. चीनमध्ये कोरोनाकाळात शांतता अनुभवायला येण्याची कारणे हा देश स्पष्ट करणार नसला, तरी जागतिक नेतृत्वाला या मागील कटाचा सुगावा लागला होता. यातूनच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इटली, इराण, जपान, ऑस्ट्रेलिया अशा देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि गलवान प्रकरणातही हे देश भारतासोबत उभे राहिलेले दिसले.

सीमेवरील झटापटीत भारतीय सैन्याने चीनचे नाक चेपून काढण्याच्या घटनेनंतर पंतप्रधानांनी निमू-लेह दौरा करून चीनला, आम्ही २०२० चे खेळाडू आहोत, हे दाखवून दिले. आम्ही श्रीकृष्णाच्या मुरलीधर रूपाची आराधना करतो, त्याच वेळी आमच्यापुढे त्याचे सुदर्शनचक्रधारी रूपही असते, हे त्यांनी खडसावून सांगितले.

भारताची सैनिकी ताकद वाढत असल्यानेही चीनचा रक्तदाब वाढलेला आहे. त्याला २०५० पर्यंत जगात महासत्ता व्हायचे आहे. पण, त्याच्या या मार्गात भारत सर्वात मोठा अडथळा आहे, हे तो जाणून आहे. भारताने लडाख वादानंतर इथल्या सीमेवर नेहमीपेक्षा अधिक म्हणजे ४५ हजार सैनिक तैनात केल्याने चीन धास्तावला आहे. भारताने केवळ सैनिक तैनात करून विश्राम घेतलेला नाही. त्यासोबत विविध हत्यारे शस्त्रास्त्रांसह भीष्म रणगाडे, मिग-२९, मिराज-२०००, सुखोई-३०, जग्वार ही लढाऊ विमाने आणि अपाचे चिनुक ही हेलिकॉप्टर्स चीनला लक्ष्य करण्यासाठी आणली आहेत. चीनसोबत झालेल्या युद्धातून भारताने अनेक धडे घेतले आहेत. त्यातूनच सैनिक तैनातीचे धोरण आखले गेले आहे. चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी हे आवश्यकही होते. पण, या अशा तैनातीमुळे त्याचा तोल गेलेला आहे.

एकीकडे पंतप्रधानांनी लडाखचा दौरा करून ती आघाडी मजबूत केली असताना दुसरीकडे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचा दौरा करून त्या देशाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम लवकर देण्याचे आश्वासन मिळवले. त्याचप्रमाणे रशियाकडून आणखी ३३ लढाऊ विमाने खरेदीला मंजुरी दिली. चीनच्या पोटात गोळा उठण्याचे आणखी एक कारण म्हणजे, येत्या काळात राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने स्वित्झर्लंडहून भारतीय सैन्यात दाखल होत आहेत. याच विमानांच्या किमतीवरून संसदेत रणकंदन झाले होते.

सरकारने या विमानांची खरी किमत सांगणे नाकारले होते. पण, आता ज्या वेळी ही विमाने भारतीय सैन्यात अधिकृतपणे दाखल होतील, तेव्हा पूर्वीच्या लढाऊ विमानांपेक्षा ही कितीतरी अत्याधुनिक, अनेक सोयींनी युक्त आणि संहाराच्या बाबतीतही इतरांना मात देणारी राहणार असल्याची कुणकुण चीनला लागलेली आहे. या विमानोड्डाणाच्या प्रशिक्षणासाठी भारतीय वायुसेनेचे अनेक वैमानिक गेल्या सहा महिन्यांपासून फ्रान्समध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. ही विमाने आपलेच वैमानिक उड्डाण भरून भारतात आणणार आहेत. राफेलची ही विमाने पाचव्या पिढीची असल्याने, त्याने शेजारचा देश पाकिस्तानसुद्धा घायाळ होणार आहे, जी अवस्था भारतासाठी फायद्याची ठरणार आहे.

चीनला आटोक्यात आणण्यासाठी भारताने या देशाच्या ५९ ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे चीनची कोंडी होत आहे. अनेक कंपन्या हा देश सोडून जाण्याच्या विचारात आहेत. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तर भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलेले बघायला मिळत आहे. भारतातील प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांची हकालपट्टी सुरू झालेली आहे. केंद्रासह हरयाणा, महाराष्ट्र आदी सरकारांनी तर चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याची पावलेही उचललेली आहेत.

चीनविरोधी मोट बांधण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचे नेतृत्व भारताकडे येण्याची दाट शक्यता आहे. पण, भारतीय नेतृत्वाबाबत डाव्या पक्षांची सुरू असलेली कुरबुर थांबलेली नाही.

चीनने भारतातील अनेक माध्यमांचे खुशीकरण केल्याने qकवा त्यांना आर्थिकदृष्ट्या अनुग्रहित केल्याने ते चीनविरोधात तोंड उघडायला तयार नाहीत. या माध्यमांना चीन इतर देशात करीत असलेली ढवळाढवळ दिसत नाही, पण ते मोदींवर टीका करण्यास तत्पर दिसतात. मोदी सरकारच्या धोरणावर टीका करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना तर वैचारिक क्षय झाल्याचीच शंका येऊ लागली आहे. ते चीनच्या बाजूने उभे आहेत की मायभूमीवर त्यांचे प्रेम आहे, ही बाब एकदा स्पष्ट झाली पाहिजे.

२०१४ पासून पंतप्रधानांच्या सतत होणाèया चुका आणि अविवेकी निर्णयांमुळे भारत कमकुवत झाला आहे. भूराजकीय जगात केवळ पोकळ शब्दांना कुठेही स्थान नाही, असे राहुल गांधी यांचे विधान आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गंध नसल्यापोटीच येत असावा, अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. चीनच्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी तूर्तास भारताने आपली अण्वस्त्रे अविश्वसनीय ड्रॅगनच्या दिशेने वळवून, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, हे कृतीतून दाखविले आहे.