प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रोत्साहित करावे : जिल्हाधिकारी संजय यादव

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्ंगत खरीप हंगाम २०१९ मध्ये धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी एकूण ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो शेतकर्‍यांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीही अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून कृषी विभाग व विमा कंपनीने शेतकर्‍यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
 
 
NBR_Pik_Vima_1  
 
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जनजागृतीसाठी दोन चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांना आज सकाळी जिल्हाधिकारी यादव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक एस. डी. मालपुरे, धुळे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, तांत्रिक अधिकारी सुरेश अपस्वार आदी उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, गेल्या वर्षी पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील ६६ हजार ७६५ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला होता. या शेतकर्‍यांना मका, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, भात, ज्वारी, तूर, कांदा आणि कापूस या पिकासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. धुळे जिल्ह्यात कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. गेल्या वर्षी ३९ हजार ३४५ कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ७२ कोटी ६ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास पीक विमा योजनेतून भरपाई होवू शकते. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ३१ जुलै २०२० पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच शेतकर्‍यांनी बदलत्या काळानुसार नावीण्यपूर्ण आणि आधुनिक कृषी पध्दतीचा स्वीकार करावा. त्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना प्रोत्साहन द्यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव, अचानक उद्भवणार्‍या घटना यामुळे पिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून शेतकर्‍यांना विमा संरक्षण प्राप्त होते. तसेच शेतकर्‍यांना पाठबळही मिळते, असे सांगत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सविस्तर माहिती दिली.