धुंदी...सत्तेची आणि बेजबाबदारपणाचीही!

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
ncp_1  H x W: 0
 
जळगाव, २२ जुलै
‘आधीच मर्कट,
त्यातही मद्य प्याला;
मग तयाला झाली भूतबाधा..’
अशा अर्थाचा संत एकनाथ महाराज यांचा एक प्रसिध्द अभंग आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी जळगावला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रात मोठ्या हिकमतीने सत्तास्थानी बसलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्यावरून आणि सोशल मिडीयावर हे छायाचित्र आणि घटनेबद्दल ज्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यावरुन आला.
 
वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेते आणि पदाधिकार्‍यांनी अजितदादांच्या तसबिरीला चक्क दुधाचा अभिषेक करीत निष्ठेचे नव्हे, तर सत्तेने ते किती बेधुंद झाले आहेत, त्याचेच दर्शन घडविले.
 
आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात काहीही गैर नाही. परंतु तो कसा साजरा केला जातो, त्यावरून मात्र त्या कार्यकर्त्यांवरील संस्कार आणि परंपरा दिसून येतात, असे म्हणतात. मात्र एकदा सत्तेची नशा मस्तकात भिनली की, मग कुठले संस्कार आणि कुठली परंपरा. सगळे बाजूला गुंडाळून ठेवलेले आणि सगळ्यांवरच अंत्यसंस्कार झालेले आढळतात. बुधवारी कॉंग्रेस कार्यालयात अजितदादा यांचा जो दुग्धाभिषेक करण्यात आला तो यापेक्षा वेगळा नव्हता. कार्यकर्ते अत्यंत निष्ठापूर्वक आणि तन्मय होऊन त्यांच्या तसबिरीवर दुधाची धार सोडत आहे, त्याचा लोट बाहेरपर्यंत येत आहे, काहीजण या दृष्याकडे मोठया भक्तिभावाने पाहत आहेत आणि आता कोणत्याही क्षणी त्या तसबिरीतून अजितदादा प्रकट होतात की काय असे वाटावे - असाच हा सारा माहोल होता.
 
या कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावला होता त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरचे नेमके भाव वाचता आले नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंग हे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून होते की, खरोखरच विचार आणि तत्त्व पटत नाही, परंतु नाईलाजाने उपस्थित राहावे लागत आहे, म्हणून होते, तेही कळले नाही.
 
दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सध्या सर्वत्र कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटक जात, पात, पंथ, धर्म, उच्च-नीच असा सर्व भेदभाव विसरून काम करीत आहेत. त्यांना अन्न, औषधी आणि जीवनावश्यक वस्तू पुरवत आहेत.कामगारांची व त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून मार्ग शोधत आहेत. अशा स्थितीत अशा पध्दतीने वाढदिवस साजरा करणे किंवा दुधाचा असा अपव्यय करणे म्हणजे आपल्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत आणि सत्तासुंदरीने मेंदू आणि सद्सद्विवेकबुद्धी कशी संपविली आहे, याचेच दर्शन घडवणारे आहे.
 
दुधाचा असा अपव्यय करण्याऐवजी ते जर गरिबांच्या मुलांना किंवा रुग्णांना अथवा जे गरजू असतील त्यांना वाटले असते तर त्यांनी निश्चितच अजितदादांना त्यांच्या स्वास्थ्यासाठी मनापासून दुवा दिली असती. पण निष्ठा सिध्द करण्याच्या नादात हे कसे सुचणार? हा दुग्धाभिषेक कॉंग्रेस कार्यालयात का करण्यात आला ? की, या प्रकाराची समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळे हे घोंगडे कॉंग्रेसच्या खांद्यावर टाकले गेले याचेही उत्तर मिळत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. म्हणूनच, संत एकनाथ महाराज यांच्या ’त्या’ अभंगाची यथार्थता अशावेळीच पटते.