बोदवड न.पं.च्या मुख्याधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
बोदवड : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना बुधवार २२ रोजी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 

Bodwad_Dhamki_1 &nbs 
 
२२ रोजी दुपारी ११.४५च्या सुमारास मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या दालनात शेख अकिल शेख इमाम (रा.बोदवड) व शेख जावेद शेख इमाम आले असता त्यांना मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी विचारणा केली. त्यांनी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही असे सांगितल्याने मुख्याधिकार्‍यांनी सदर कागदपत्रांची पडताळणी केली. त्यांनी ६ जुलै २०२० रोजी दिलेला अर्ज हा अपूर्ण आहे. तसेच सिंगल फेज कनेक्शन मागणीचा अर्ज होता परंतु संबंधितांना त्याबाबत त्रुटीसंबंधी तोंडी कळविले होते. त्याबाबत १६ जुलै रोजी दस्तावेजापैकी काही कागदपत्रे परिपूर्ण दिसून येत नव्हते असे सांगितले असता त्यांनी मुख्याधिकार्‍यांशी अरेरावीची भाषा करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून आले. त्यावेळी नगराध्यक्षांचे पती शे.सईद बागवान, सहाय्यक कार्यालय अधीक्षक राजूसिंग चौहान, अंकुश मराठे उपस्थित होते. या प्रकरणी शेख जावेद शेख इमाम व शेख अकिल शेख इमाम या दोघांविरुद्ध मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.
 
 
या आधी काही दिवसांपूर्वी असेच घडले होते. तत्कालीन मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनासुद्धा धमकी देऊन काही लोक मारण्यासाठी अंगावर धावून आले होते. असे प्रशासकीय अधिकार्‍यांवर जर हल्ले होत असतील तर कसे होणार? असे हल्ले त्वरित थांबवले जावेत आणि हल्लेखोरांविरुद्ध ताबडतोब कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायत कर्मचारीवर्गाकडून केली जात आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बोदवड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
 
दरम्यान, ना हरकत दाखल्यासाठी येथे पैसे मागितले जातात असा आरोप आरोपींनी केला आहे.
 
 
शासकीय अधिकार्‍यांसोबत अरेरावी करणे कितपत योग्य?
शहरात अशी परिस्थिती आहे की, अधिकारी गेले की अधिकारी मिळण्यासाठी निवेदन द्यायचे. आधीच बोदवड शहरात प्रत्येक शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. शहरात येण्यास अधिकारी तयार होत नाहीत. शासकीय अधिकार्‍यांसोबत अशी अरेरावी होतच राहिल्यास येथे येण्यास कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तयार होणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.