पाचोरा येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्येबांबरुड(राणीचे)येथील युवकाची आत्महत्या

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |

pachora_1  H x
रिपोर्ट येण्याआधीच घडली घटना, सुरक्षेसाठी
नियुक्त पथकावर कारवाईची मागणी
पाचोरा : येथील पाचोरा- वरखेडी रोडवरील साईमोक्ष लॉन्स संशयित कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका युवकाने कोरोना तपासणी अहवाल येण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
 
हेे सेंटर अधिग्रहीत केल्यापासून क्वारंटाईन झालेल्या लोकांच्या सतत तक्रारी वाढत होत्या. यात प्रामुख्याने स्वच्छता, वेळो-वेळी डॉक्टर अथवा तज्ञ व्यक्तीच्या भेटी व तपासणी न होणे जेवण- नास्ता, पाणी यांच्या वेळेत अनिमीतता असणे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशिरा प्राप्त होणे आदी तक्रारी होत्या. या सर्व बाबींना त्रस्त होऊन मागील आठवड्यातच क्वॉरंटाईन रुग्णांनी जेवणावर बहिष्कार देखील घोषीत केला होता. त्यावेळी तातडीने स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने भेटी देऊन तेथील क्वारंटाईन लोकांची समजूत देखील काढली होती.
२१ जुलै रोजी साईमोक्ष लॉन्स क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रात्री १:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील विनोद रमेश कोकणे या (३३ )वर्षीय युवकाने जनरल बाथरूमच्या गेटला चादरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार महिला बाथरूमला गेल्या असता उघडकीस आला. या युवकास १९ जुलै रोजी येथे दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब देखील तपासणीसाठी २० रोजी घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पाचोरा न. पा.मुख्याधिकारी शोभा बावीस्कर, डॉ.अमित साळुंखे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी भेट देत परीस्थितीची पाहणी केली.
या युवकावर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.युवकाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
याप्रकरणी पालकमंत्री, खासदार, आमदार, वरीष्ठ अधिकार्‍यांनी कोणालाही पाठीशी न घालता कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कारवाई होणे गरजेचे आहे. कारण एखादा रुग्ण जर पॉझीटीव्ह आला तर त्याठिकाणी २४ तास पथकाची नियुक्ती करण्यात येते. मग अशा महत्वपुर्ण क्वॉरंटाईन सेंटरवर कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? या पथकात कोण? कोणचा समावेश होता? अशा सर्व जबाबदार घटकांची चौकशी होऊन कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. एवढेच नव्हेतर सदरचे क्वारंटाईन सेंटर हे शहरापासून लांब असल्याने या ठिकाणी क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीशी संपर्क करणे सुध्दा अडचणीचे ठरत असल्याने क्वारंटाईन व्यक्तींना एकांकीपणाही जाणवत आहे. पाचोरा शहराची परिस्थीती पाहता नागरीकांनी आपल्या जबाबदार्‍या सोडून दिल्या आहेत. कोणत्याही शासकीय नियम -अटीचे पालन करताना दिसून येत नाहीत. या घटनेबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात गोकुळ दत्तात्रय शिरसाठ (आरोग्य सेवक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहे.