एका ऐतिहासिक स्वप्नाची पूर्तता

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |
5 ऑगस्टची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल, यात आता शंका उरली नाही. यावर्षी 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन होत आहे. या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एक इतिहास घडणार आहे. याआधी गतवर्षी 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 तसेच 35 ए कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने घेतला होता. यावर्षीच्या 5 ऑगस्टला राममंदिरांचे भूमिपूजन होणार आहे, त्यामुळे पुढील वर्षीच्या 5 ऑगस्टला मोदी देशवासीयांना कोणती भेट देतील, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

Ram-Mandir-1_1  
 
 
अयोध्येच्या रामजन्मभूमीवर भव्यदिव्य अशा राममंदिरांचे स्वप्न देशातील कोट्यवधी लोकांनी शेकडो नाही, तर हजारो वर्षापासून पाहिले होते. नुसतेच स्वप्न पाहिले नाही, तर त्यासाठी अनेकवेळा संघर्ष आणि बलिदानही केले. ते स्वप्न साकार होण्याची वेळ आता आली आहे. ‘याची देही याची डोळा’ आणि कृतकृत्य भावनेने हा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी कोट्यवधी भारतीय उत्सुक झाले आहे. मात्र काही राजकीय पक्ष आणि त्याचे नेते जनतेच्या या आनंदावर विरजण घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यात आघाडीवर आहेत. काँग्रेसही यात मागे नाही. पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी असले तरी राष्ट्रवादाची कोणतीच भावना त्यांच्या पक्षात आणि त्याच्या नेत्यातही कधी दिसली नाही. या दोन्ही पक्षांचे राजकारण देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूच्या कोणत्याही कार्यक्रमाला विरोध करण्याचे, त्यात बिब्बा घालण्याचे राहिले आहे. अयोध्येतील राममंदिरांच्या भूमिपूजनाऐवजी देशाच्या एखाद्या भागात मशिदीच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ असता, तर शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते तेथे आनंदाने बेभान होऊन नाचले असते.
शरद पवारांना आता देशातील कोरोनाच्या साथीची आठवण आली आहे. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या संकटातून देशाला बाहेर काढणे आमच्यासाठी महत्वाचे आहे, त्यांच्यासाठी मंदिर महत्वाचे आहे, आपत्तीच्या काळात कशाला प्राधान्य द्यायचे याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो, मंदिर बांधल्याने कोरोना जाईल, असे सरकारला वाटत असावे, या शब्दात पवारांनी एकीकडे सरकारवर टिका केली, आणि दुसरीकडे मंदिराच्या निर्माणाला असलेला आपला विरोधही व्यक्त केला. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आवश्यक ती सर्व उपाययोजना केली आहे, आणि अजूनही करत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगातील कोरोना प्रभावित देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना संक्रमितांची, तसेच त्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या कमी आहे, तर बरे होणार्‍या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.
कोरोनाची जाणिव असल्यामुळेच अयोध्येत राममंदिरांच्या भूमिपूजनाचा सोहळा मर्यादित प्रमाणात होणार आहे. परिस्थिती सामान्य असती, तर देशातील लाखो नाही, तर कोट्यवधी लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ‘पावले चालती अयोध्येची वाट’ म्हणत अयोध्येकडे निघाले असते.मर्यादापुरुषोत्तम भगवान राम हे देशातील कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचा आणि श्रध्देचा विषय आहे. प्रभू रामचंद्राने सर्व भारतीयांचे चराचर विश्व व्यापले आहे. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवर रामायण मालिकेचे पुनर्प्रसारण करण्यात आले, त्यावेळी कोट्यवधी लोकांनी ही मालिका पुन्हा एकदा अतिशय भक्तिभावाने पाहिली. पवार आणि काँग्रेसनेते करतात, त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी हा राजकारणाचा विषय नाही. अन्यथा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत आपल्या पायावर दगड पाडून घेतला नसता.
 
 
सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी मानल्या जाणार्‍या जमिनीची मालकी हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निर्वाळा दिल्यामुळे राममंदिरांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. राममजन्मभूमीवर बाबराने आक्रमण करत ती आपल्या ताब्यात घेत तेथे मशिद उभारण्याचा प्रयत्न केला. हिंदूच्या सर्वच तीर्थक्षेत्रावर आक्रमण करत ते ध्वस्त करायचे आणि त्याठिकाणी मशीद बांधण्याची मुस्लिम राज्यकर्त्यांची जुनी सवय आहे. मग ते अयोध्या असो, काशी असो की मथुरा. ही तिन्ही देशातील हिंदूंसाठी अतिशय पवित्र क्षेत्र होती आणि आहे. पण तिन्ही ठिकाणी मुस्लिम राज्यकर्त्यांनी आक्रमण करत मशिदी बांधल्या. सुदैवाने कांशी आणि मथुरेत नंतरच्या हिंदू राजांनी मशिदीच्या बाजूला पुन्हा भव्य अशी मंदिर बांधली, आणि भाविकांच्या दर्शनाची सोय केली.पण अयोध्येत तसे होऊ शकले नाही.
 
 
अयोध्येची रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा संघर्ष झाला. उत्तरप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमिंसह यादव यांची भूमिकाही मुघल साम्राज्याचे शेवटच्या उत्तराधिकारी असल्यासारखी राहिली. 1990 मध्ये कारसेवेसाठी येणार्‍या रामभक्तांना अयोध्येत शिरता येऊ नये म्हणून मुल्ला मुलायम यांनी अयोध्येची नाकेबंदी केली. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी मुल्ला मुलायम यांची दर्पोक्ती रामभक्तांनी उदध्वस्त केली. मुल्लायमच्या पोलिसांनी केलेल्या अंदाधूद गोळीबारात शरयूचे पाणी लाल झाले, कोठारी बंधूंसह अनेक कारसेवक शहीद झाले. मुलायमिंसह तसे म्हणायला हिंदू पण त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत राजकारण मात्र मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचेच केले. त्याची किमंतही त्यांना राजकारणात चुकवावी लागली.
 
 
रामजन्मभूमी मुक्तीचा वर्तमानकाळातील अंंतिम लढा 6 डिसेंबर1992 ला झाला. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमीसाठी सोमनाथ ते अयोध्या अशी ऐतिहासिक रथयात्रा काढत देशात ‘बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का’, असे वातावरण निर्माण केले. देशातील रामभक्तांच्या मनात खदखदणार्‍या असंतोषच्या उद्रेकाने तथाकथित बाबरी मशिदीचे तिन्ही घुमट जमीनदोस्त झाले.‘मात्र त्यानंतरही जन्मभूमीवर राममंदिराचे भूमिपूजन व्हायला जवळपास 28 वर्षाचा कालावधी लागत आहे. मात्र आता ‘देर आये दुरुस्त आये’ याप्रमाणे राममंदिरांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा देवदुर्लभ क्षण पाहायला विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी िंसघल आज आपल्यात नाही. आयुष्यभर त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राममंदिरासाठी संघर्ष केला. आज राममंदिराच्या भूमिपूजनाची वेळ आली तर ते जिवंत नाही, हे आपले दुर्देव म्हटले पाहिजे.
 
 
स्वत: हिंदूंची बाजू घ्यायची नाही, आणि दुसर्‍याने घेतली तर राजकारण करायचे ही काँग्रेसची जुनी सवय. त्यामुळे सरदार पटेल यांनी सोरटी सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोध्दार केला, तेव्हा त्यांच्या उदघाटनासाठी जाण्याचे पहिले काँग्रेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी टाळले होते. मुळात नेहरुंचा विरोध या मंदिराच्या जीर्णोध्दारालाच होता. त्यामुळे मंदिराच्या उद्घाटनाला नेहरु स्वत: तर गेले नाही, पण तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनीही त्या समारंभाला जाऊ नये, असा प्रयत्न त्यांनी केला. नेहरुंचा विरोध डावलून राजेंद्रप्रसाद या समारंभाला उपस्थित राहिले, हा भाग वेगळा. आज पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी नेहरुंचे उदाहरण देत राममंदिरांच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी यांनी जाऊ नये, असा अनाहूत सल्ला दिला आहे. हिंदूंचा तिटकारा असायला मोदी म्हणजे काही नेहरु नाही.त्यामुळे ते भूमिपूजनाला उपस्थित राहतील, याबद्दल कोणी शंका घ्यायचे कारण नाही.
भूमिपूजनानंतर राममंदिराचे बांधकाम सुरु होईल, मंदिराचे पूर्ण बांधकाम व्हायला तीन ते साडेतीन वर्ष लागतील, असा अंदाज आहे. अयोध्येतील राममंदिरांच्या निर्माणाने देशातील रामराज्याचा मार्ग प्रशस्त होईल, यात शंका नाही. आतापर्यंत चौथर्‍यावरील तंबूत विराजमान असलेल्या रामाचे दर्शन भाविकांना दुरुन घ्यावे लागत होते. राममंदिरांच्या निर्माणामुळे भाविकांना आता जवळून रामाचे दर्शन घेता येईल. प्रभू रामचंद्राचीही सुरक्षेच्या चौकीपहार्‍यातून सुटका होत गर्भगृहात त्याची प्राणप्रतिष्ठा होईल. याची क्षणाची वाट देशातील कोट्यवधी जनता कित्येक वर्षापासून पाहात होती. तो क्षण आता जवळ आला आहे.