ज्ञानयज्ञाला लागले कोरोनाचे ‘ग्रहण’

    दिनांक : 17-Jul-2020
Total Views |
 वय आणि शिक्षणाची सांगड : ‘आजीबाईंची शाळा’!
 
SHALA_1  H x W:
 
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असे म्हटले जाते, ते खरे आहे. कारण असाच एक अनुभव ठाणे जिल्ह्यातील फांगणे या गावात दिसून येतो. येथे आहे चक्क ‘आजीबाईची शाळा’. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योगेंद्र बांगर यानी अत्यंत परिश्रम घेतले आहे. जगभरात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, सध्या डिजीटल युगाकडे वाटचाल सुरू आहे. योगेंद्र बांगर यांनी कुठल्याही कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या, तसेच शिक्षण घेता न आलेल्या आजीबाईंना साक्षर करण्याचा विडा उचलला. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टचे दिलीप दलाल यांच्या सहकार्याने त्यांनी जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर 8 मार्च, 2016 रोजी फांगणे येथे आजीबाईंच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आज या शाळेत 30 वयोवृध्द आजी मोठ्या उत्साहाने शिक्षण घेत आहेत. या शाळेने ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ पर्यंत मजल मारली असून या शाळेची विक्रमांमध्ये नोंद करण्यात आलीय. त्याचबरोबर सुमारे 15 देशांतील प्रतिनिधींनी या शाळेला भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुकही केले आहे. 
 
 
‘आना’ शाळेत आजी आणि नातवंडे शिकणार सोबत
 
 
SHALA 1_1  H x  
 
 
या यशस्वी उपक्रमामुळे बांगर यांचा उत्साह आणखी वाढला असून आता ते वडाची वाडी येथे ‘आना’ शाळा सुरू करीत आहेत. या शाळेसाठी त्यांना पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशनचे सहकार्य लाभले असून, हीच संस्था या शाळेचे व्यवस्थापन सांभाळणार आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि त्यांच्या मुलांपुरतीच कुटुंबं मर्यादित राहिली आहेत. त्यामुळे आजी-नातू-नात यांच्यातील संवाद संपला असल्याने ग्रामीण भागात आजही एकत्रित कुटुंबं नांदत असली तरी तेथील जुन्या पिढीतील साक्षरतेचे प्रमाण तुलनेत कमी दिसते. ‘आना’ शाळेच्या संकल्पनेतून या दोन पिढ्यांमधील ही दरी संपुष्टात येईल, असा त्यांचा प्रयत्न आहे.
या शाळेत वडाची वाडी येथील 70 आजी आणि त्यांची इयत्ता पहिली ते पाचवीतील नातवंडे एकत्र शिक्षण घेणार आहेत. मनोरंजन केंद्राप्रमाणे या शाळेचे स्वरूप असेल. आजी जुन्या गोष्टी, संस्कृती, परंपरा तसेच त्यांचे अनुभव आपल्या नातवंडांना सांगतील-तर, नातू-नात आपल्या आजींना लिहायला, वाचायला शिकवतील, अशी त्या शाळेमागील एक भन्नाट कल्पना आहे.
शिक्षणाला वयाचे बंधन नसते. लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, तसेच आजींकडील मौैखिक ज्ञानाचे भांडार जतन व्हावे, या उद्देशाने वडाची वाडी येथील एका जागेत ‘आना’ शाळा सुरू करीत आहोत. त्यात काही पुस्तके, खेळणी, एक लॅपटॉप, जुना टेपरेकॉर्डर आणि दोन हजार कॅसेट आदी साहित्य असेल. आंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील यांचे त्याकरिता सहकार्य
लाभले.
 
 
कोण आहेत योगेंद्र बांगर
 
आजीबाई शाळेचे प्रणेते, जि.प. प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘युगांतर’ पुरस्कार महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा येथे प्रदान करण्यात आला असून बांगर हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील जि. प. मुरबाड नं 2 शाळेत गेल्या 23 वर्षांपासून शिक्षक आहेत. अनेक वर्षापासून सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिलीप दलाल यांच्या कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टद्वारे मुरबाडच्या फांगणे गावात भारतातील पहिली आजीबाईची शाळा सुरू करण्याचे धाडसी काम त्यांनी केले. त्याचबरोबर फांगणे येथे सांडपाणी-घनकचर्‍याचे अभिनव प्रयोग करून हे गाव सांडपाणीमुक्त केले आहे. निसर्ग शाळा सुरू करून निसर्गातील वस्तूंचा कलात्मक आविष्कार केला आहे. यापूर्वी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, नेहरू युवा केंद्र भारत सरकार जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वृध्द आणि मुलांमध्ये संवादाचा सेतू कायम असावा...योगेंद्र बांगर

YOGENDRA SIR_1   
 
जेथे येण्या-जाण्यासाठी काहीही सोय नाही अशा आदिवासी डोंगराळ भागातील गावात आम्ही ‘आजीबाईंची शाळा’ही संकल्पना मांडली. तेथील आजीबाईं आणि आपल्या नातवातील संवाद कुठेतरी हरवल्याचे आणि काही आजीबाईंनी माझ्याकडे आम्हाला लिहिता-वाचता येत नसल्याची खंत व्यक्त केल्याने आजीबाईंसाठी काहीतरी करावे, जेणे करून त्या आपल्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल असे वाटल्याने या शाळेची मी संकल्पना मांडली. जगभरातील लोकांडून त्याला प्रतिसाद मिळाला. सर्वत्र त्याचे कौतुकही केले जातेय. मुरबाडच्या आजीबाईंना अमेरिकेत मानाचा पान थेट इंग्रजी मासिकेत मिळाले स्थान. ज्यांनी कधी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेल्या नव्हत्या त्या आजीबाईंनी आपले स्वत:चे जग निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्या आता कोणाशीही बोलताना न घाबरता आत्मविश्वासाने ठामपणे सांगतात. आजीबाईंची शाळाही लॉकडाऊनमध्ये त्यांच्या संपर्कात असून काय हवे, नको आणि त्यांच्या अभ्यासाची काळजी घेतो. आर्थिक स्थिती अनुकूल नसल्यास त्यांना ऑनलाईन अभ्यासाशी सांगड घालण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आता बर्‍याचजणी शिक्षित झाल्या असून स्वत: इतर व्यवहारही करतात. ‘आजीबाईंची शाळा’ची सध्या सर्वत्र चर्चा असून त्यांच्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.
 
 
(योगेंद्र बांगर सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ‘तरूण भारत’ प्रतिनिधी
मिनल खैरनार हिच्याशी साधलेला संवाद)