पहूरसह परिसरातील खेड्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
 
वडगाव, हिवरखेडा येथेही आढळले कोरोनाबाधित रुग्ण
 
 
पहूर, ता.जामनेर : जामनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून तालुक्यातील खेड्यापाड्यातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. पहूर कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरले असून लोण शहरासह परिसरातील खेड्यांमध्येही पसरत आहे.
 

coro_1  H x W:  
 
बुधवार १५ रोजी ५ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी दिली. पहूर येथे कोरोनाबाधितांची संख्या ५७ वर पोहोचली आहे. पहूरपेठ येथील कोरोना योद्धा प्राथमिक शिक्षकांची ड्युटी काही दिवासांपूर्वी जळगाव-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोष्टवर होती. त्यांना त्रास जाणवल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. पहूरपेठमधील मेनरोडवर राहणार्‍या मुलगा व आई तसेच संतोषीमाता नगरातील पिता-पुत्रास कोरोनाची लागण झाली आहे. असे एकूण ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या अगोदर पहूरपासून जवळच असलेल्या वडगाव येथील तरूणास तर त्यापाठोपाठ हिवरखेडा येथील वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने नागरिकांना घरी रहा सुरक्षित रहा, मास्कचा वापर करा, कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
 
 
 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, शिक्षक, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर्स, सफाई कामगार, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते हे सर्व कोरोना योध्ये कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. कर्तव्य बजावतांना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डॉ. हर्षल चांदा, वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल ऑफिसर, ग्रामीण रूग्णालय, पहूर