मुक्ताईनगर येथे खडसे महाविद्यालयात नवीन कोविड सेंटरचा प्रारंभ

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
 
एकनाथराव खडसे आणि रोहिणीताई खडसे यांनी वसतिगृह करून दिले उपलब्ध
 
 
मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण केले आहे. आजपावेतो तालुक्यात २०० रुग्ण आढळून आले असून त्यातील ३ रुग्ण मृत झाले आहेत तर ६७ जणांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. १३० रुग्ण उपचार घेत आहेत.
 
 

corona_1  H x W 
 
 
सदरील रुग्ण आणि क्वारंटाईन केलेले रुग्ण यांना ठेवण्यासाठी प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले होते. परंतु दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याकारणाने येथील व्यवस्था अपूर्ण पडत होती. ही बाब लक्षात घेऊन माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह कोविड सेंटरला देण्यात आले होते. तशी सूचना त्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदारांना केली होती. तालुका प्रशासनाने श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटर म्हणून अधिग्रहित केले असुन मुलींच्या वसतिगृहात जवळपास २०० रुग्णांची व्यवस्था झाली आहे.
 
 
यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने वसतिगृह आणि पलंग कोविड सेंटरला उपलब्ध करून दिले आहेत. सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेले हे वसतीगृह उंच टेकडीवर असल्याकारणाने पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी नैसर्गिक हवा रुणांना मिळणार आहे. वसतिगृहाची इमारत स्वतः पुढाकार घेऊन कोविड सेंटरला उपलब्ध करून दिल्याबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे. तसेच तालुका लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी तालुकावासिय प्रार्थना करत आहेत.