अमळनेर कोविंडसेंटरमधूनतीन दिवसापासून रुग्ण बेपत्ता

    दिनांक : 13-Jul-2020
Total Views |

amalner _1  H x
 
 
 
 
कोविंड सेंटरमधील सावळा गोंधळ, माजी आ.स्मिताताई वाघ
यांनी प्रशासनाला धरले धारेवर
तभा वृत्तसेवा
अमळनेर,१३ जुलै
येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधून बापू निंबा वाणी नावाचा रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने माजी आ. स्मिताताई वाघ यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पोलीस बंदोबस्त असताना देखील या ठिकाणाहून व्यक्ती गायब कशी होते याचा जाब त्यांनी इनसिडन्ट कमांडर नात्याने उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांना विचारला आहे
 
याबाबत माहिती अशी की मंगेश दगडू वाणी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा याना ६ जुलै रोजी कोविड सेंटरला दाखल केले होते. त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि ते व मुलगा निगेटिव्ह आले होते म्हणून त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र परिवारातील काका बापू निंबा वाणी हे हमालीसाठी बाहेर गेलेले होते. म्हणून त्यांचा स्वॅब घेण्यात आला नव्हता पालिकेमधून त्यांना वारंवार काकांचा स्वॅब घेण्यासाठी कोविड सेंटरला आणा म्हणून फोन येत होता म्हणून मंगेश वाणी यांनी ९ रोजी बापू वाणी यांना कोविड सेंटरला दाखल करून त्याची नोंदणी केली. रूम नम्बर ६८ मध्ये बसवून आले होते.
 
११ रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते आदल्या दिवसापासून शनिवार दुपारपासून गायब असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत मंगेश वाणी यांनी विचारले असता तेथील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्हाला माहीत नाही ते काम पोलीस प्रशासनाचे आहे आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवू असे सांगण्यात आले. मंगेश वाणी मुलाला सोबत घेऊन काकांना शोधत आहेत. प्रशासन उत्तरे नीट देत नसल्याने मंगेश वाणी यांनी माजी आ. स्मिताताई वाघ यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यावरून स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तक्रार करून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.
 
 
बंदोबस्त ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे, प्रताप महाविद्यालयातून बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता असून देखील वृद्ध बाहेर जातो कसा पोलिसांचे लक्ष नव्हते की पोलीस बंदोबस्ताला नव्हते. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यापूर्वी देखील काही रुग्ण दाखल असताना घरी निघून जात होते. जळगाव येथे जसा प्रकार घडला तसा घडू नये म्हणून प्रशासनाने ताबडतोब त्याचा शोध घ्यावा आणि बेजबाबदार कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आ. स्मिताताई वाघ यांनी केली आहे.
स्मिताताई यांनी यात लक्ष घातल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली असून बापू वाणीची शोधाशोध सुरू झाली असून पोलीस देखील कामाला लागले आहेत. एकीकडे शहरात शेतीच्या कामाला येणार्‍या बँकेत जाणार्‍या , दवाखाण्यात जाणार्‍या व्यक्तींना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करणार्‍या पोलिसांना हा म्हातारा कुठेच कसा दिसला नाही याबाबतही वाघ यांनी जाब विचारला आहे.