उद्यापासून सक्तीचा लॉकडाऊन संपणार

    दिनांक : 13-Jul-2020
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांची घोषणा, जळगावसह भुसावळ, अमळनेरातील नियमांसह अनलॉक
 
raut_1  H x W:  
जळगाव, १३ जुलै
जळगावसह भुसावळ आणि अमळनेरमध्ये गेल्या सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सोमवारी संपला असून लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. त्यामुळे मंगळवारपासून या तिन्ही शहरांमध्ये शासकीय नियमांसह अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते, त्याचप्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील. त्यामुळे शहरातील व्यापारी संकुले बंदच राहणार आहेेत.
 
 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव तसेच भुसावळ आणि अमळनेर शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. यामध्ये किराणा दुकान, किरकोळ भाजीविक्री यासारख्या अत्यावश्यक सेवेची दुकानेदेखील बंद ठेवण्यात आली होती. शहरांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे बहुतांशी नागरिकांकडून पालन झाले आहे. सोमवारी लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्याने त्याला मुदतवाढ मिळेल की, अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमिवर, जळगाव, भुसावळ व अमळनेरात मंगळवार, १४ जुलैपासून शासकीय नियमांच्या अधीन राहून अनलॉक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
 
 
शहरातील व्यापारी संकुले राहणार बंदच
केंद्र व राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या नियमांच्या आधारे जळगाव, भुसावळ व अमळनेरात व्यवहार पूर्वपदावर येण्यास मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, ६ जुलैपर्यंतच्या नियमांनुसार जळगाव शहरातील सर्व व्यापारी संकुले बंद राहणार आहे. तसेच शॉपींग कॉम्प्लेक्स मधील दुकाने उघडण्यास मनाई असेल.
 
 
जिल्हाधिकार्‍यांनी जनतेचे मानले आभार
सक्तीच्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनाचे चक्र अक्षरश: थांबले असून यामुळे अर्थव्यवस्थाही ठप्प झालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, मंगळवारपासून जळगाव, भुसावळ व अमळनेरात मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी देखील अनलॉकची प्रक्रिया क्रमाक्रमाने सुरू होणार आहे. दरम्यान, तीन शहरांमधील लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढे ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते. त्याच प्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.