ए.टी. झांबरे शाळेतील क्वारंटाईन सेंटरचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

    दिनांक : 12-Jul-2020
Total Views |
आनंद हौसिंग सोसा.तील रहिवाशांचा सेंटरला विरोध
 
qurantine _1  H 
 
जळगाव, १२ जुलै
जळगाव शहर आणि जिल्ह्यातीलही कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यावर यथायोग्य उपचार करण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागही प्रयत्न करीत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून एम.जे.कॉलेज जवळील ए.टी. झांबरे शाळेत होणारे क्वारंटाईन सेंटर म्हणजे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी मृत्युघंटा ठरण्याची शक्यता असल्याने ते येथून त्वरित हलवावे अशी मागणी या परिसरातील अनंत हौसिंग सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.
 
कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याने आता जिल्हाधिकारी राऊत आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांनी शहरात काही ठिकाणी क्वारंटाइन सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी आधी बांभोरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विचारणा केली , मात्र त्यांनी यासाठी नकार दिल्याचे कळते.त्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांचे राजकीय वजन वापरले गेल्याचीही चर्चा आहे.
 
एम.जे.कॉलेजमध्ये विचारणा
बांभोरीनंतर या अधिकार्‍यांनी केसीई सोसायटीच्या एम.जे.कॉलेजमध्ये क्वारंटाईन सेंटरसाठी विचारणा केली. मात्र त्यांनी हमरस्त्यावरील ए.टी.झांबरे स्कूलमध्ये यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यादृष्टीने आता प्रशासन तेथे व्यवस्था करीत आहे.
 
रहिवाशांचा विरोध
अत्यन्त वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या शाळेत होणारे हे सेंटर आमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणारे आहे. कारण हवा जेव्हा पूर्व -पश्चिम वाहते तेव्हा येथील औषधे आणि रुग्णांचा दर्प लगतच्या परिसरातील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरून प्रसंगी त्यांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अनंत हौसिंग सोसायटीतील या रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. हमरस्त्यांवरील लोकांनाही रस्त्यापासूनचे सामासिक अंतर कमी असल्याने आरोग्यास धोका आहे.
 
 
या रहिवाशांच्या मते, हे क्वारंटाईन सेंटर एम.जे.कॉलेजमध्ये आतील कोणत्याही जागेत केल्यास त्याचा कुणालाही त्रास होणार नाही. शिवाय तेथे जागाही मुबलक आणि सध्या रिकामीच आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याचा विचार करून आमच्या जीवितावर आलेले हे संकट दूर करावे, अशी कळकळीची विनंतीही केली आहे. प्रशासन आता नेमके काय करते त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
 
 
भविष्यातील संकट मोठे
हा संपूर्ण परिसर तसाही शैक्षणिक परिसर म्हणूनच ओळखला जातो.या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, शाळा आणि होस्टेलही आहेत. शिवाय रहिवाशांची संख्याही मोठी आहे.येथे असे क्वारंटाईन सेंटर झाले आणि रहिवाशांना, त्यातही लहान मुले आणि वृद्धांना त्याचा त्रास झाल्यास भविष्यात या परिसरात राहायला वा शिक्षणासाठीही कुणी येण्यास तयार होणार नाहीत. हा संभाव्य धोका लक्षात न घेतल्यास आरोग्यासाठी अत्यंत असुरक्षित अशीही या भागाची बदनामी होऊ शकते. हे टाळणे प्रशासनाच्याच हाती आहे.