दु:ख कशाचे? आनंदच!

    दिनांक : 11-Jul-2020
Total Views |
 
 
60 गंभीर गुन्हे नावावर असलेला, आठ पोलिसांना ठार करणारा गुंड विकास दुबे मारला गेला! त्याने 8 पोलिसांना मारले आणि पोलिसांनी त्याचा बदला घेतला. बस्स. एवढीच बातमी आहे आणि ती तेवढीच हवी. आता त्याला फाटे फोडणारे फोडत बसतील. आम्ही मात्र कुठल्याही संशयाला थारा देता कामा नये. याची अनेक कारणे आहेत. किती म्हणून सांगायची?

Vikas_Dubey_1   
 
 
पालघर येथे दोन साधू आणि एका वाहनचालकाची जिवाचा थरकाप उडविणारी हत्या झाली, तेव्हा बिळात धसून बसलेले सर्व लिबरल्स आता एकदम फणा काढून बाहेर आलेले आहेत. विकास दुबेने आठ पोलिसांना ठार करून पळ काढला, तेव्हा यांच्या प्रतिक्रिया होत्या- योगी सरकार त्याला पकडणारच नाही. तो त्यांचा माणूस आहे. काहींचे म्हणणे होते की, योगी सरकार दुबेचे ‘एन्काऊंटर’ करणार नाही. त्याचे नाव सोहराबुद्दीन किंवा इशरत जहॉं थोडीच आहे! उज्जैनमध्ये दुबेला पकडल्यावर या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या- बघा, म्हटले होते ना ‘एन्काऊंटर’ करणार नाही म्हणून! पण दुबे पकडला गेला की शरण आला? पाच लाखांचे बक्षीस कुणाला देणार? आता दुबे उत्तरप्रदेशच्या तुरुंगात आलिशानपणे राहील. ज्या उत्तरप्रदेशच्या पोलिसांना त्याने मारले, त्याच राज्याचे पोलिस त्याचे संरक्षण करतील आणि तो तुरुंगातून आपले राज्य चालवेल. या प्रतिक्रिया कालपर्यंतच्या होत्या. शुक्रवारी सकाळी पळून जात असताना दुबे पोलिसांकडून मारला गेला, हे समजताच, एकदम विरुद्ध प्रतिक्रिया यायला लागल्या. लिबरल म्हणू लागले की, त्याच्याकडे अनेक राजकीय गुपिते होती आणि ती बाहेर येऊ नये म्हणून त्याला मारण्यात आले. अपघातात गाडी उलटली वगैरे खोटे आहे. योगी सरकारची ‘पोलखोल’ वाचली. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्या पक्षाचा विकास दुबे कार्यकर्ता होता असे सांगण्यात येते त्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, कार उलटली आणि योगी सरकार उलटणे वाचले. प्रतिक्रिया देणारे इतके उलटसुलट मत व्यक्त करीत आहे की, सर्वसामान्यांचे डोके भणभणले नाही तरच नवल! घटनाक्रम इतका वेगवान होता की, ठेवणीतील प्रतिक्रिया व्यक्त करून ही लिबरल मंडळी निवांत बसली होती. परंतु, असे काही अचानक घडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे ही मंडळी चांगलीच गडबडली आहे.
 
 
काही बिदू लक्षात ठेवू या! गुंड विकास दुबे. उत्तरप्रदेश. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. भाजपाचे मुख्यमंत्री. दुबे सापडला तो मध्यप्रदेशात. तिथेही भाजपाचे राज्य. आता लक्ष तेलंगणात वळवूया. स्मरणशक्तीला थोडा ताण देऊन तिथली एक घटना आठवायचा प्रयत्न करायचा आहे. हैदराबादजवळील शमशाबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह 28 नोव्हेंबर 2019 रोजी सापडला. या घृणित घटनेचा देशभरात संतप्त निषेध करण्यात आला. ठिकठिकाणी प्रदर्शनेही झालीत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फूटेजवरून चार संशयितांना अटक केली. पोलिस म्हणाले की, या चौघांनी गुन्हा कबूल केला आहे. त्या चौघांना घटनास्थळी नेत असताना, दोघे पोलिसांना हुलकावणी देत पळाले व सोबत पोलिसांच्या बंदुकापण नेल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते चौघे संशयित आरोपी मरण पावले. देशभरात विशेषत: महिलांनी विजयोत्सव साजरा केला. तेलंगणा पोलिस रातोरात हिरो झालेत. या घटनेत राज्य तेलंगणा आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आहेत. ते भाजपाचे नाहीत. त्यामुळे लिबरल चूप. मानवाधिकारवाले, राजकीय नेतेमंडळी देखील चूप. या अशा दोगल्या लोकांच्या प्रतिक्रियांवरून आम्ही आमचे मत बनवायचे का? निश्चितच नाही.
 
 
काहींनी सावध पवित्रा घेतला आहे. विकास दुबेला मारल्याचे त्यांनाही दु:ख आहे. परंतु, यांना वेगळीच काळजी आहे. दुबेकडे राजकारणातल्या ज्या प्रभावी व्यक्तींची गुपिते होती, त्याचे काय? ती आता कायमची नष्ट झालीत. पोलिस चौकशीत राजकारण आणि गुन्हेगार यांचे संबंध उघड झाले असते. त्यामुळे त्याला मारणे योग्य नव्हते. असे यांचे म्हणणे आहे. हा युक्तिवाद निश्चितच प्रभावी आहे. परंतु, यावरून विकास दुबेला पोलिसांनी खोटी चकमक करून ठार केले, हे काही सिद्ध होत नाही. विकास दुबेकडे राजकीय गुपिते होती, हे मान्य केले तरी, ती कुठल्या राजकीय नेत्यांची असतील? तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपा नेत्यांची असतील की, आतापर्यंत त्याला पोसून फोफावू देणार्‍या आधीच्या राजवटीतील नेत्यांची असतील? विकास दुबे योगी आदित्यनाथांचा खास माणूस असता तर त्याला पकडण्यासाठी योगींनी कशाला धडपड केली असती? त्या 8 पोलिसांचे प्राण तरी वाचले असते ना! म्हणजे, ज्याच्याकडे गुपिते आहेत त्याला जगातूनच संपविले जाते, असे यांना म्हणायचे आहे. हा फसवा युक्तिवाद आहे. लोकांनाही विकास दुबे मरायला हवा होता. विकास दुबे मारला गेला नसता तर तो आपल्या न्यायव्यवस्थेच्या कृपेने एखाद्या तुरुंगात राहिला असता. तिथून त्याने आपला कारभार सुरू केला असता. पोलिस खाते त्याच्या खिशात होते, असे हेच लोक म्हणत आहेत. त्यामुळे त्याला कसलीच अडचण आली नसती. कदाचित पुढच्या लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुकीला तो उभा झाला असता आणि निवडूनही आला असता. असे तुरुंगात असूनही निवडून आलेले बरेच आमदार भारतात आहेत. तुरुंगात असल्यामुळे गँगवॉर होऊन मरण्याचीही भीती नाही. कारण, संरक्षणाला पोलिस आहेत. विकास दुबेचेही हेच झाले असते. आता ते टळले आहे. ‘विकास दुबे कानपूरवाला’ हे नाव जाऊन आता तिथे ‘विकास दुबे, मृत’ असे झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि आपण ती मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे. दुबेसोबत झालेल्या चकमकीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. आपण त्यांचीही काळजी केली पाहिजे. प्रतिक्रियांचा धुराळा आता सुरूच राहील. राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते आपापल्या सोयीनुसार डावे-उजवे ठरवीत असतात.
 
 
आपल्या भारतात पोलिस प्रामाणिक आहेत की नाहीत, हे देखील त्या राज्यात सत्ता कुठल्या राजकीय पक्षाची आहे, यावरून ठरविले जात असते. तेलंगणाचे पोलिस प्रामाणिक. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशचे अप्रामाणिक. महाराष्ट्राचे पोलिस काही महिन्यांपर्यंत अप्रामाणिक होते. आता तर त्यांच्यासारखे पोलिस पूर्ण देशात नाहीत. आपले मुख्यमंत्री नाहीत काय देशात सर्वोत्कृष्ट? तसे. पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकविल्यानंतरही, भारतीय लष्कराकडून पुरावे मागणारी ही जमात आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. यांच्यासमोर हनुमंताने छाती फोडून दाखविली असती तरी यांनी विश्वास ठेवला नसता. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकार व पोलिस यांनी कितीही सांगितले तरी त्यावर ही मंडळी विश्वास ठेवणार नाहीत. मग या लोकांच्या प्रश्नांवर, शंकांवर सर्वसामान्यांनी तरी का म्हणून विश्वास ठेवावा?
 
 
योगी सरकारने आतापर्यंत 118 चकमकीतून अनेक गुंडांना जिथे पाठवायचे तिथे पाठविले आहे. गुंडांमध्ये एवढी दहशत पसरली की, ते स्वत:हून शरण येऊ लागले. उत्तरप्रदेशात गुन्हेगारांचा किती वचक होता, याची कल्पना बाहेरच्या लोकांना येणारच नाही. ते आपल्या कल्पनेच्या बाहेरचे आहे. त्यामुळे इतकी जीर्ण व्याधी औषधोपचाराने नाही, तर शस्त्रक्रिया करूनच दूर करणे शक्य होते. योगींनी योग्य मार्ग निवडला आहे. त्यामुळे आज उत्तरप्रदेशात गुंडांचे राज्य जवळपास संपल्यातच जमा आहे. सर्वसामान्य निर्भयतेने मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. इतका जुना रोग तीन वर्षांत संपेल अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे. पण योगी सरकारची पावले योग्य दिशेने पडत आहेत.
 
 
विकास दुबे मारला गेला म्हणून उत्तरप्रदेश आनंदला आहे. वीरमरण आलेल्या आठ पोलिस कर्मचार्‍यांचे कुटुंबीय देखील आनंदी झाले आहेत. त्यांनी देखील दुबेला मारण्याचे समर्थन केले आहे. आपल्या प्रियजनांच्या हत्येचा बदला घेतला गेला, याचे त्यांना समाधान आहे. त्यांच्या भावनेला जर-तरचे फाटे फोडण्यात अर्थ नाही. आम्ही देखील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी झालो पाहिजे.