नगरदेवळ्यात अखेर कोरोनाचा शिरकाव

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |

corona_1  H x W
 
तभा वृत्तसेवा
नगरदेवळा, ता.पाचोरा, १० जुलै
गावात कोरोना येऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,आरोग्य व पोलीस प्रशासनाकडुन विशेष खबरदारी घेण्यात आली असतानाही अखेर नगरदेवळा गावात एका ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाव व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
 
 
गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन वारंवार लॉकडाऊन तसेच संपूर्ण गावात सॅनिटायझर, हायड्रोक्लोराईड फवारणी एक ना अनेक प्रकारे कोरोना प्रतीबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळेच व्यापारपेठेचे गाव, परिसरातील मोठी बाजारपेठ व त्यामुळे होत असलेली गर्दी असतानाही आतापर्यंत कोरोना हा पोलीस प्रशासनास व ग्रामपंचायत प्रशासनास रोखण्यात यश आले होते. परंतू गेल्या तीन चार दिवसांपूर्वी येथील एका पुरुषाची तब्येत बरी नसल्याने औरंगाबाद येथील मुलाकडे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तब्ब्येतीत सुधारणा न झाल्याने तेथे ७ जुलै रोजी झालेल्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यांच्या पत्नीचाही स्वॅब अहवाल घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
 
 
पाचोरा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पाठोपाठ जास्त लोकसंख्या असलेल्या नगरदेवळा गावातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. यावर उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांना पाचोरा येथील कोविड कक्षात क्वारंटाईन करणार आहेत. परिसरातील १७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर यांनी दिली. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला आहे. यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे, वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील, सरपंच सिंधूताई महाजन, उपसरपंच सागर पाटील, प्रकाश परदेशी, सौ.दराडे , रुपाली पाटील आदी उपस्थित होते.