जामनेरला एकाच घरातील १० जणांना कोरोना

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
एकाच दिवशी शहरात १३ बाधित, एकूण संक्रमित झाले ४०
 
Corona_1  H x W
 
जामनेर : शहरात व तालुक्यात हळुहळु लॉकडाऊन शिथील करण्याच्या पाठो-पाठ कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येतही वाढ होतांना दिसत आहे,
 
 
८ रोजी एकाच दिवशी एकाच घरातील तब्बल १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील इतर भागांमधे तीन जणांचे रिपोर्टही सकारात्मक आले असल्याने कोरोना संसर्गाची लागण झालेल्या एकुण रूग्णांची तालुकाभरातील संख्या ४० झाली आहे. तीन-चार दिवसांपूर्वी घरातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला जळगांव हलविण्यात आले.त्यानंतर घरातील त्या रूणाच्या संपर्कातील इतरांचा स्वॅब घेण्यात आला होता.त्यांचा अहवालही पॉझिटीव्ह आल्याने एकाच घरातील रुग्ण संख्या दहा झाली. इतर भागातील आणखी तिघांचा समावेश झाल्याने एकाच दिवसाची रूग्णसंख्या १३ वर जाऊन पोहचल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अनलॉकचा तिसर्‍या टप्प्याला सुरूवात झाल्याने बहुतांश बाजारपेठ खुली झाल्याने नागरीक आता प्रशासनाने दिलेल्या आवश्यक कोणत्याही सूचनांचे पालन करतांना दिसत नाही. नागरीक विविध वस्तू-किराणा आदींच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यावेळी सामाजिक अंतर तर सोडाच पण बरेच नागरीक मुखपट्टीचाही वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. इकडे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जेथे-जेथे कोरोनाबाधीत रूग्ण निष्पन्न होत आहे. त्या-त्या परीसराला लोखंडी बॅरेकेटस् लाऊन प्रतिबंधीत करण्यात येत आहे. शिवाय येथील पालीकेतर्फेही परीसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी, ध्वनीक्षेपकावरून सुचना शहरवासीयांना दिल्या जात आहेत. रस्त्यावरील नागरिकांची गर्दी मात्र कमी होत नसल्याने जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.