चोपड्यात आजपासून ५ दिवस कडकडीत बंद

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |

Chopda Band_1  
 
चोपडा : शहरात दररोज कोरोनाचा आकडा वाढत असताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज ९ वाजता चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचा एकमुखी स्वयंस्फूर्तीने पाच दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बंद सर्वात वेगळा आणि कडक शिस्तीचा असणार आहे.यात दूध, मेडिकल व कृषी केंद्र, व पावसाळी प्लस्टिक दुकाने वगळता काहीच सुरू असणार नाही. जे दुकाने बंद काळात सुरू सापडली त्याच्यावर पालिकेकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
पालिका दहा हजाराचा दंड देऊन ती दुकाने सील करण्यात येतील असे एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला, फळे, हातगाडीवर मिळणार्‍या वस्तू मिळणार नसून या व्यावसायिकानी देखील बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे. बैठकीला सर्व व्यापारी, शहरातील प्रमुख संस्थेचे पदाधिकारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष आदी उपस्थित होते. सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी शहर, ग्रामीण भागातून मोटरसायकली या बस स्टँड मध्ये पार्किंग कराव्यात. लॉकडाऊन उघडल्यानंतर देखील गावात बाजारात जाताना आपल्या मोटारसायकली दुकानासमोर न लावताना त्या कायमस्वरूपी बसस्थानक, ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राउंड, मच्छी मार्केट पुल, गांधी चौक अशा मोकळ्या ग्राउंडवरच गाड्या लावून बाजारात यायचे आहे. अत्यावश्यक कामे सोडून कायमसाठी लोकडाऊन संपल्या नंतरही रिकाम्या फिरणार्‍या लोकांवर,मोटार सायकलीवर कडक कारवाई पालिका व पोलीस करणार आहेत. यात दूध विक्री ही सकाळी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ व मेडिकल दुकाने ही सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ आणि कृषी केंद्र व पावसाळी प्लास्टिक दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेतच सेवा देता येतील.
 
 
यावेळी नगराध्यक्षा मनीषाताई चौधरी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नागरीकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. बैठकीला चोपडा तालुका व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव, न.पा.गटनेते जीवन चौधरी उपस्थित होते.