अमळनेर शहरात पुन्हा कोरोनाचा कहर; कोरोनाची वाटचाल आता खेड्यांकडे

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |

Amalne Corona VijayRath_1 
 
कळमसरे ता.अमळनेर : जिल्हात कोरोना रुग्णांनी एक हजारी पार केली असून त्यात १७० पेक्षा जास्त रुग्ण हे एकट्या अमळनेर शहरातील आहे. जिल्ह्यात सर्वात आधी कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले शहर हे अमळनेर होते. त्यामुळे अमळनेर शहरात तात्काळ प्रताप कॉलेज येथे कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले. शहरात झपाट्याने रुग्ण वाढत असतांना काही दिवसातच तालुक्यात कोरोनाने शंभरी पार केली. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनीही अमळनेर शहराकडे पाठ फिरवली. लोकांना अमळनेर शहराची भीती वाटू लागली. हळूहळू अमळनेर कोविड सेंटरमधील रुग्नांची संख्या कमी होऊ लागल्याने अमळनेर शहराची कोरोनामुक्तिकडे वाटचाल सुरु झाली. अमळनेरात बोटावर मोजले जातील एवढेच रुग्ण राहिले. अमळनेरातील लॉकडाऊन हा शिथिल होत गेला. त्याचप्रमाणे लोकांमधील कोरोनाविषयी असलेली भीती कमी होत होती. त्यातच अमळनेर शहरात पूर्वीसारखे सर्व व्यवसाय सुरळीतपणे सुरु होत असतांना अमळनेर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. अमळनेर शहरात कोरोनाने पुन्हा कहर केला आहे. ६ रोजी सकाळपर्यंत १२ आणि रात्री ८ असे एकाच दिवसात २० रुग्णांची वाढ झाली. तसेच ७ रोजी दुपारपर्यंत पुन्हा त्यात ६ रुग्नांची भर पडली आहे. अमळनेर शहराची पुन्हा हॉटस्पॉट आणि रेड झोनकडे वाटचाल सुरु झालेली असतांना यात अजून प्रशासनाचे टेंशन वाढविणारी बाब म्हणजे अमळनेर तालुक्यात खेड़े गावतही कोरोनाने एंट्री केली. खेडयांमधेही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. ’खेडयाकडे चला’ म्हणत शहरातील बेरोजगार झालेले कामगार हे गावात येऊन मिळेल ते काम करीत आहे आणि आपला संसार चालवत आहे. आधी अमळनेर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. परंतु कोरोना आता खेड़्यात येऊन पोहचला म्हटल्यावर कोरोनाची भीती अधिकच वाढली आहे.
कोरोना अन् विजयरथ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कोरोनाचा विजय रथ तयार केला आहे. ग्रामीण भागातील लोकही कोरोनापासून स्वतःला जपत आहे. गटविकास अधिकारी वायाळ यांनी सुरुवातीपासून कोरोनावर मात करण्यासाठी हटके काम सुरू केले आहे. चारचाकीवर या रथाची सजावट करण्यात आली आहे. रथाची सजावटच मुळात आकर्षक अशी करण्यात आली आहे. त्यात विविध जनजागृतीचे स्लोगन लिहिले आहेत. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी या कोरोना रथावर लिहिलेले प्रत्येक स्लोगन हे माणसाला प्रेरित करणारे ठरले आहे. त्यात ताप, किंवा खोकला असलेल्या व्यक्तींशी नजीकचा संपर्क टाळा, खोकल्यावर किंवा शिंकल्यावर आधी हात स्वच्छ धुवा, कोरोना हरनार आणि अमळनेकर जिंकणार, महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करा, घरात रहा, सुरक्षित राहा. फळे व भाजीपाला कोमट पाण्याने पुसून सेवन करा. सावधानता बाळगा, सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवा, असे संदेश दिले आहेत. तर काही समस्या असेल तर पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. यासाठी मोबाईल नंबरही त्यांनी या रथावर दिले आहेत.