‘लालपरी’तून होणार माऊली, तुकोबांच्या पादुकांचे प्रस्थान

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


सोलापूर : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एसटी बसमध्ये ठेऊन ३० जूनला पालखी मार्गाने पंढरपूरला नेण्यात येणार आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जणांना बसण्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका पारंपरिक रस्त्याने दशमीला मार्गस्थ होणार आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत.

 
 

Paduka_1  H x W 
 

३० जूनला पहाटे सहाच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर कापूर ओढ्याजवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल. यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार आहे. रोटी घाटात सकाळी वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या अभंग आरतीसाठी काही वेळ एसटी बस थांबणार आहे. तेथून हा सोहळा वाखरी येथे दुपारी १२ वाजता पोहोचणार आहे. याठिकाणी संतभेट, चौथी अभंग आरती होईल, संस्थानच्यावतीने नैवद्य दाखविण्यात आल्यानंतर पादुका पंढरपुरात सायंकाळी चारच्या सुमारास पोहचणार आहे. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काल्याचे किर्तन होणार असून पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येणार आहे.

 

 
पालन करावयाचे नियम

पादुकांसोबत बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना जाता येणार नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्टही करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.