भाषा : मोदींची आणि कॉंग्रेसची...

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |
भाषा साडेबारा मैलांवर बदलते, असे म्हणतात. वास्तवात ती माणसागणिक बदलते, असाच अनुभव आहे. त्याचा वेश, परिवेश, वाट्याला आलेले जगणे आणि त्याच्यावरचे भाषिक संस्कार यावरून भाषा बदलत जाते. त्यामुळे भाषा समजून घ्यायची असेल, तर माणसे समजून घेण्याची गरज असते. निष्णात माणसे मौनाचीही भाषांतरे करतात. कुठल्याही क्षेत्रात नेतेपदी असलेल्या व्यक्तीला मात्र सार्‍या समाजाचीच भाषा समजून घेण्याची कुवत असावी लागते. त्याच्यात ही क्षमता जितकी जास्त तितके त्याचे प्रभावक्षेत्र खोल आणि विस्तारलेले असते. देशाच्या जनतेची भाषा समजून घेतली, तर जनताही त्या नेत्याचे बोल समजून घेते, स्वीकारते आणि त्या नेत्याचे शब्द जनतेसाठी मंत्र असतात. वर्तमानात जगात असा प्रभावी नेता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत! ते ‘मन की बात’ करतात आणि जनतेच्या मनातलेच ते बोलत आहेत, असे जनतेला वाटते. कधीकाळी कॉंग्रेसचा हा प्रभाव होता. महात्मा गांधींनी अवघा देश पायी फिरून या देशाची भाषा समजून घेतली होती. त्यामुळे त्यांची कृती म्हणजे पूजा आणि शब्द म्हणजे मंत्र वाटत होते जनतेला. मूठभर मीठ उचलून ते जनतेला योग्य तो संदेश देऊ शकत होते. स्वातंत्र्यानंतर हा प्रभाव ओसरत गेला आणि आता तर जनता आणि कॉंग्रेसचे नेतृत्व (ते आहे का?) यांच्यात कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. जनतेची भाषाच त्यांना कळत नाही म्हणून मग त्या पक्षाची पडझड काही थांबत नाही. त्याचे नैराश्य आणखी वाढत जाते आणि मग कॉंग्रेसचे नेतृत्व आणखीच चुका करत जाते.
 
 

modi_1  H x W:  
कुठे, कसे आणि किती, काय बोलावे हे मोदींना नेमकेपणाने कळते. त्यामुळे ते नेमक्या वेळी अचूक तेच बोलतात. जनतेला ते कळते. ‘मोदी बोले तैसी जनता चाले,’ असे अलीकडे झालेले आहे. त्याचे कारण हेच की मोदी, ‘बोले तैसा चाले’ या उक्तीनुसार वागत असतात. भाजपाच्या विरोधकांमध्येही, कॉंग्रेससारखा दीर्घकाळ सत्तेत राहणारा आणि प्रमुख पक्ष म्हणून संभावना असणारा पक्ष वेगळा पडलेला आहे. परवा चीनसोबतच्या तणावाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशालाही संबोधित केले आणि त्या आधी त्यांनी देशातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा केली. अशा परिस्थितीत कुठल्याही देशाच्या प्रमुखाने जेवढे आणि जे बोलायचे असते तितकेच आणि तेच मोदी शुक्रवारच्या सर्वपक्षीय बैठकीत बोलले. त्या आधी खरेतर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शहाणी भूमिका घेतली होती. आम्ही या काळात सरकार आणि सैन्य यांच्या सोबत आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, नंतर सत्ताधार्‍यांच्या भूमिकेचा स्वीकार करणे म्हणजे कमीपणा आहे, असे त्यांना वाटले की काय त्याच जाणोत; पण त्यांनी नंतर सरकारला या संदर्भात प्रश्न विचारणे सुरू केले. ते विचारावेतही, पण ते अनाठायी नसावेत. त्यात देशाचे काही अहित होणार असेल, तर ते खोडून काढण्याची तळमळ असावी. सत्ताकारणाच्या नैराश्यातून उगाच राजकारण करण्यासाठी काही बोलल्याने आता पुन्हा एकदा कॉंग्रेसप्रमुखांचा मुखभंग झालेला आहे. बरे, त्या बोलल्या तेवढे कमी होते की काय; पण कायम अपयशी ठरलेले राहुल गांधी हे साधे खासदार असूनही थेट आपल्या खुजेपणाचे भान न ठेवता, उंचावरच्या नेत्याला भिडत असतात. आजकाल त्यांच्या आक्षेपांना मोदी उत्तरे देणे तर दूर, लक्षही देत नाहीत! पार्टीचे इतर नेतेच त्यांचा समाचार घेतात. शुक्रवारच्या बैठकीत पंतप्रधानांनी नेमकी माहिती दिली. खरेतर पंतप्रधानांनी त्या बैठकीत दोनच वाक्यांत माहिती दिली. त्यांच्या दोन वाक्यांवर कॉंग्रेसी आणि मोदीद्वेषाचा कावीळ झालेल्या समाजमाध्यमांवरील कल्पकांनी उगाच मल्लिनाथी केली. ‘भारताच्या भूमीवर कुणीही अतिक्रमण केलेले नाही’ आणि ‘भारताच्या भूमीवर कुणीही आपली चौकी स्थापन करू शकलेले नाही...’ याचा अर्थ काय होतो, ते समजून घेण्यासाठी भाषाप्रभुत्व असले पाहिजे असे अजिबात नाही, तरीही त्यावरून गदारोळ माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘चीनचे सैनिक भारतीय भूमीत आलेच नव्हते, तर मग चकमक कशाला झाली?’ ‘भारताचे सैनिक शहीद का झाले?’ चीनने भारताची भूमी बळकावली आहे, हे सरकार लपवीत आहे, असा निष्कर्ष काढून मग चीनने मागे जावे, यासाठी उच्चस्तरावर चर्चा का करण्यात आली, असले प्रश्न विचारण्यात येऊ लागले. पंतप्रधानांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की, चीनने घुसखोरीचा आणि जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या लष्कराने तो विफल ठरविला. भारतीय जनतेला या संदर्भात संबोधित करताना वास्तवात मोदींनी हेही स्पष्ट केले. चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण तो आपण तोडीस तोड प्रत्युत्तर देत अपयशी ठरविला. यात 42 चिनी सैनिकांना कंठस्नान घातले. त्यांनी तसा प्रयत्न केला म्हणूनच चकमक घडली... लष्कराच्या सामरिक बाबींबद्दल सर्वकाही खुलेआम सांगायचे असते का? जगजाहीर करायचे असते का? युद्धनीती काय असते... हेही, देशावर इतका दीर्घकाळ सत्ता गाजविणार्‍या पक्षाला कळू नये का? म्हणजे चकमक नेमकी कुठे झाली? तो भूभाग कोणता, हे सांगायलाच हवे असते का? एअर स्ट्राईकच्या वेळीही कॉंग्रेसने असलेच मूर्खासारखे आक्षेप घेतले होते. वरून असा काही एअर स्ट्राईक भारताने केलाच नाही, असे पाकिस्तानने करावे तसे वक्तव्य राहुल गांधी यांनीच करून टाकले. मोदींनीही चीनशी संपर्क ठेवला, संवाद वाढविला, पण त्यात नेहरूंसारखा भाबडेपणा नव्हता आणि नाही. त्यामुळे 1962 साली आपण जसे तोंडघशी पडलो होतो, विश्वासघाताच्या आघातानेच पुरते घायाळ झालो होतो, त्यात आपली भूमी गमावून बसलो होतो, तसे आता झालेले नाही. होऊ शकत नाही. कारण मोदी सावध आहेत!
 
 
अशा परिस्थितीत विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचे असते, हा केवळ शिष्टाचार नाही. अशा वेळी पंतप्रधान जे काय बोलतात ते विरोधकांनी समजून घेणे, हा समंजसपणाचा भाव झाला. ते राष्ट्रप्रेमच आहे. त्यांच्या चुका काढण्यापेक्षा योग्य तो मार्ग सांगणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्यच असते. अशी शहाणूक शरद पवार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन या भाजपाच्या विरोधक असणार्‍या नेत्यांनीही समजून घेतली. मोदी जे बोलले ते या नेत्यांना जसे कळले तसे ते कॉंग्रेसला का कळले नाही? तितके शहाणपण त्यांच्याकडे नाही म्हणूनच आज ते वर्तुळाच्या बाहेर आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना मोदींच्या बोलण्यातला नेमका तपशील हवा होता. तसा तो देता येत नाही, तो समजूनच घ्यायचा असतो, हे इतर नेत्यांना कळले. राष्ट्रीय सुरक्षाविषयक रणनीतीनुसार असले तपशील देणे योग्य नसते. त्यामुळे मोदींनी तो दिला नाही अन्‌ मग ‘मोदीजी चूप हुए’ असा डांगोरा पिटण्यात आला. या बैठकीत सर्वच पक्षांनी सर्वसंमती दिली. त्यातून केवळ कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट हे दोनच पक्ष वेगळे राहिले. वास्तवात, अशा वेळी ‘105’ व्हायचे असते, ही खरी राष्ट्रभावना, तीच खरी नीती आणि तेच समंजसपणाचे वास्तव असते.
 
 
एकीकडे म्हणायचे की, आम्ही सरकार अन्‌ सैन्याच्या पाठीशी आहोत अन्‌ दुसरीकडे असे द्वेषाचे तेच तुणतुणे वाजवायचे. भाजपाशी असलेले मतभेद वेगळे. मोदींना विरोध करणे हा लोकशाहीतला हक्क आहे. मात्र, यावेळी ते दोन्ही बाजूला ठेवून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, असा प्रस्ताव संमत करायला हवा होता. त्या प्रस्तावाचे नेतृत्वच कॉंग्रेसने करायला हवे होते. तरच इतके वय असलेल्या अनुभवाची पिपाणी वाजविणार्‍या पक्षासाठी ते सकारात्मक राहिले असते. सोनिया गांधींबद्दलचा आदर दुणावला असता. जनतेशी सुसंवादी होण्याची एक संधी कॉंग्रेसकडे आपसुक चालून आली असती. मात्र, व्यक्तिद्वेष, सत्तेचे राजकारण यामुळे कॉंग्रेसने वैचारिक भूमिकाच गमावली आहे. भाषा- मोदींची आणि कॉंग्रेसची- यातली तफावत जनतेला नेमकेपणाने कळू लागली आहे.